Bluepadसावधान....... आज देव सुट्टीवर आहे.
Bluepad

सावधान....... आज देव सुट्टीवर आहे.

डॉ अमित.
डॉ अमित.
19th Jul, 2020

Share

सावधान....... आज देव सुट्टीवर आहे.आज सकाळी योगा वरून घरी आलो.
सहज देवघरात लक्ष गेलं आणि पाहतो तर काय देवघरात एकही देव नाही..क्षणभरं बुचकळ्यातच पडलो जणू....आज रविवार ....सुट्टीचा दिवस..देवही सुट्टीवर आहेत की काय असे काही मनात आले.हा माझा भ्रम काही क्षणातच दूर झाला....बाजूलाच आमची सौ. देवघरातून देव बाहेर काढून स्वच्छ करत होती..थोडं हायसं वाटलं.
सहज विचार चमकुन गेला खरंच जर देव सुट्टीवर गेला तर?रोज किती जण त्याला आपली गाऱ्हाणी ऐकवत असतात,आपले सुख दुःख त्याच्याशी वाटून घेत असतात....त्याला पण थोडी विश्रांती नको का मग?

आपण कसे थोडा कठीण प्रसंग आला,संकट आले,काही विपरीत घडले की लगेच देवाजवळ धाव घेतो...त्याचा मनोमन धावा करतो...तसे तो स्वतः तर येतंच नाही मदत करायला किंवा भेटायला..पण तेवढीच आपली मनाची समजूत आणि मनाला दिलासा.
आपण असे बरेच वेळा बघतो की कोणीतरी येतो आणि आपल्याला संकटातून बाहेर काढतो...आपली अडचण सोडवतो..आपण त्याला म्हणतो देखील की बाबा रे अगदी देवासारखा धावून आलास बघ..हो की नाही?
तो देवासारखा धावून येणारा कधी आपला मित्र असतो,कधी नातेवाईक,कधी तर कोणी अनोळखी देखील असतो...हेच तर गमक आहे.
खरा देव माणसातचं तर असतो..कधी कधी आपण त्याला ओळखू शकत नाही इतकाच काय तो फरक...
मी तर म्हणतो देव म्हणजे जो देतो वचन तो..
जो आपल्याला असे वचन देतो... की तू माणसाशी माणसा सारखे वागावे...संकटात एकमेकांना मदत करावी...भुकेलेल्याला खाऊ घालावे,वृद्धांची सेवा करावी,प्राणी मात्रांवर प्रेम करावे,एकमेकांचा द्वेष राग राग,तिरस्कार करणे सोडावे...हे जर तू केलेस तर मी सतत तुझ्या सोबतच आहे...नव्हे मी तुझ्यातच आहे...तुला मी कोणत्याच संकटात कधीही एकटं सोडणार नाही...हेच वचन जो देतो तोच देव.
अशीच एक जुनी गोष्ट आहे..एक माणूस स्वर्गात गेल्यावर आपले आयुष्य उलगडताना देवाला विचारतो की माझ्या पावलांसोबत हे दोन पाऊल कोणाचे आहेत..देव म्हणतो ते माझे आहेत...थोडे पुढे गेल्यावर फक्त दोनच पाऊल दिसतात...तो माणूस देवाला म्हणतो हा तर माझ्या आयुष्याचा खडतर काळ होता. तेंव्हा तु मला एकट्याला सोडलेस?
देव हसतो आणि म्हणतो ती माझी पावले आहेत आणि त्यावेळी मी तुला माझ्या खांद्यावर घेतले होते...
तर सांगायचे तात्पर्य हेच की तुमची श्रध्दा आणि तुमचे सत्कार्य जर चांगले असेल तर देव
पावलो पावली, ठायी ठायी आहे आणि माणसां माणसात देवत्वं दडलेले आहे.
मग आपला खरा देव थोड्या दिवस सुट्टीवर गेला तर काय हरकत आहे...आपण आपल्या देवाला माणसातचं पाहूया...
रोज सकाळी उठून आरश्यात स्वतः लाच पाहून एक छानसे स्माईल देवून स्वतःला सांगुयात की बाबारे आज देव सुट्टीवर आहे आणि तू त्याला माणसात शोधून त्याची सुट्टी सत्कारणी लावत त्याला प्रसन्न करूयात..... देऊयात वचन देवालाच की आजपासून मी माझ्या गाऱ्हाण्याने तुला त्रास देणार नाही....


तुझे रूप हेच माझे स्वरूप
तुझी शक्ती हीच माझी प्रेरणा
तुझी ईच्छा तेच माझे सत्कार्य
मानवसेवा हीच माझी ईश्वरसेवा.


चला तर मित्रांनो आपणही देवाला सुट्टी एन्जॉय करू देवू आणि रफी साहेबांच्या काही ओळी गुणगुणू.....


शोधिसी मानवा
राऊळी मंदिरी
नांदतो देव हा
आपल्या अंतरी..डॉ अमित.

14 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad