Bluepadनीला सत्यनारायण यांचा मृत्यू म्हणजे एका रसिकतेवर पूर्णविराम
Bluepad

नीला सत्यनारायण यांचा मृत्यू म्हणजे एका रसिकतेवर पूर्णविराम

Vinisha Dhamankar
Vinisha Dhamankar
29th Nov, 2021

Shareकोरोनाचा हा काळ म्हणजे मृत्युचा जणू झंझावातच घेऊन आला आहे. हा लेख लिहिपर्यंत किमान ८ लाख लोक संपूर्ण जगात ह्या विषाणूला बळी पडले आहेत. लहान मोठा, गरीब श्रीमंत असा कोणताही भेद ह्या विषाणूने ठेवला नाही. या किलर विषाणूपासून दूर राहण्याचा, चांगली काळजी घेण्याचा आणि सरकारने ठरवून दिलेली सर्व मार्गदर्शक सूचना पाळण्याचा प्रयत्न आपण सर्व करीत असतो. पण तरीही काही ना काही चूक राहून जाते आणि तो विषाणू आपल्या शरीरात शिरण्याचा मार्ग शोधून काढतो आहे. त्यामुळे अनेक मोठी माणसं आपल्यातून निघून जात आहेत. सनदी अधिकारी आणि निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला माजी आयुक्त नीला सत्यनारायण ह्या अशाच आपल्याला सोडून गेल्या. त्यांनी १६ जुलै २०२० रोजी पहाटे ४ वाजता मुंबईतील सेवन हिल्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
आज त्यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर अनेक लहान थोर लोक त्यांना आदरांजली अर्पण करीत आहेत. त्यातून खरं तर नीलाताईंच्या ज्ञात असलेल्या व्यक्तिमत्वपेक्षा अगदी वेगळ्या, शिस्तप्रिय, रसिक, कलाप्रेमी आणि तितक्याच कठोर नीलाताई दिसत आहेत.
सुशीला आणि वासुदेव आबाजी मांडके ह्या माता पित्याच्या पोटी नीला यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९४९ रोजी मुंबईत झाला. वडील पोलीस खात्यात होते. त्यांच्या बदल्यांमुळे नीला यांचं शालेय शिक्षण मुंबई, पुणे, नाशिक इथे झालं. त्यांनी शालान्त परीक्षा दिल्ली बोर्डातून दिली. त्या परीक्षेत त्या १९६५ साली संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवून बोर्डात पहिल्या आल्या. नंतर त्यांनी इंग्रजी वाङ्मय या विषयात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यास पूर्ण केला. बाबांची इच्छा म्हणून नीलाताईंनी १९७२ साली आय.ए.एस.ची परीक्षा दिली आणि त्या पास झाल्या. त्याचवेळी भारतीय स्टेट बँकेच्या अधिकारी आणि भारतीय प्रशासकीय अधिकारी ह्या परीक्षांमध्ये सुद्धा त्या पास झाल्या. अशावेळी त्यांच्यापुढे दोन पर्याय उभे राहिले होते. त्यातील जनसेवा करण्यासाठी सनदी अधिकार्‍याची नोकरी त्यांनी स्वीकारली. त्या जुलै १९७२ मध्ये भारतीय प्रशासकीय अधिकारी म्हणून भारत सरकारच्या सेवेत दाखल झाल्या. या सेवेत त्यांनी महाराष्ट्राच्या विविध प्रांतात सहाय्यक जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि पुढे मंत्रालयात समाज कल्याण, सांस्कृतिक विकास आणि युवा कार्य, अन्न आणि नागरी पुरवठा, पर्यटन, वस्त्रोद्योग, महिला आणि बालविकास, सामान्य प्रशासन आणि माहिती व जनसपर्क, गृह, महसूल व वने ह्या विभागात सचिव, प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव अशी एक एक पायरी चढत त्यांनी सेवा केली. धारावीत काम करताना तिथल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना त्यांनी निर्यातक्षम चामड्याच्या वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येणाऱ्या स्त्रियांना सक्षम करण्यासाठी क्रांतिज्योती महिला प्रशिक्षण अभियान सुरू केले.
राज्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची पाच वर्षांची कारकीर्द लक्षणीय ठरली. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त होण्याचा मान त्यांना मिळाला. या काळात महिला लोकप्रतिनिधींनी सक्षमपणे काम करावं यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले.
नीलाताईंचे काव्यसंग्रह, ललित लेख, कथा, कादंबर्‍या अशी एकूण ३५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. “जजमेंट” हा मराठी सिनेमा त्यांच्या “ऋण” ह्या कादंबरीवर आधारलेला आहे. त्यांच्या “बाबांची शाळा” ह्या कथेवर त्याच नावाचा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला. यातील गीत आणि संगीतात सुद्धा नीलाताईंनी सहकार्य केलं आहे. याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांना आणि मालिकांना गाणी दिली आहेत आणि त्यांच्या इतर गाण्यांच्या १० सीडीज प्रकाशित झाल्या आहेत. त्यांनी सखी सह्याद्री ह्या दूरदर्शनवरील कार्यक्रमासाठी स्त्रियांसाठी ४ भागांचं लिखाण केलं. येत्या दिवाळीत त्यांच्या “रात्र वणव्याची” ह्या कथेवर आधारित आणि विक्रम गोखले दिग्दर्शित मालिका छोट्या पडद्यावर येणार आहे. “वन हाफ वन फूल” हे त्यांचे आत्मचरित्र आहे. नीलाताईंचा गतिमंद मुलगा चैतन्य वर लिहिलेलं “एक पूर्ण अपूर्ण” हे पुस्तक म्हणजे स्वानुभवाचं संकलन आहे. उद्योजक पती सत्यनारायण यांच्या जीवनावर लिहिलेलं “सत्य-कथा” ही असेच प्रेरणादायी आहे. सनदी अधिकार्‍यांच्या परीक्षेला बसणार्‍या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी “आरोही” ही संस्था स्थापन केली आहे.
नीलाताईंच्या आयुष्यकडे पहिलं की वाटतं, सनदी अधिकार्‍यांच्या कामात त्यांनी कधी कुचराई केली नाही, मुलांचं योग्य पालनपोषण केलं शिवाय आपले सर्व छंद नुसते जोपासलेच नाहीत तर त्यात उत्तम कामगिरी केली. अशी सृजनशील व्यक्ती कधीच एका यशाने समाधान मानणारी नसते. त्यांना नवीन क्षितिजे पार करण्याचे जणू वेध लागलेले असतात. पण शेवटी माणसाचं आयुष्य त्याला एक पूर्णविराम देतंच. नीलाताईंनाही आता चिरविश्रांती मिळाली आहे. नीलाताईंचा पुढील प्रवास सुखकर होवो ही प्रार्थना...

16 

Share


Vinisha Dhamankar
Written by
Vinisha Dhamankar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad