Bluepadकोरोनाने बदललं जीवन
Bluepad

कोरोनाने बदललं जीवन

S
Shubham Yadav
29th Nov, 2021

Share


एखादं संकट माणसावर येतं तेंव्हा त्याला त्याच्या क्षमतांची खर्‍या अर्थाने जाणीव होते. मुंगी जशी कितीही अडथळे आले तरी आपले अन्न बिळापर्यन्त घेऊन जातेच, नदीच्या मार्गात कितीही दगड धोंडे आले तरी ती धबधबा बनून वाहते आणि पाहिल्यापेक्षा अधिक सुंदर दिसते. माणसाचंही तसंच आहे. परिस्थितीच्या वणव्यात हिर्‍याप्रमाणे तावून सुलाखून निघलेला माणूस जगात चमकून उठतो. आज कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग एका ऐतिहासिक संकटातून जात असताना त्याला स्वत:च्याच नाही तर आज वर दडपून राहिलेल्या निसर्गाच्या सामर्थ्याचे आणि सौंदर्याचे दर्शन होत आहे.


देव ही मानवनिर्मित संकल्पना आहे हे संतांनी सांगून सुद्धा एखाद्या असीम सामर्थ्यासमोर झुकण्याची गरज किंवा आपली सहज प्रकृती वाढीस लागली. ही प्रकृती इतकी जहाल आहे की एखाद्या झाडाखाली शेंदूर फसलेला दगड दिसला की सहज त्याच्या पुढे हात जोडले जातात. कोरोनाच्या संकटाने अटीतटीच्या वेळी ईश्वर धावून येत नाही तर डॉक्टर आणि मेडिकल स्टाफ धावून येतो हे सिद्ध झालं. आपल्या संरक्षणासाठी ग्रह तारे नसतात तर पोलीस आपल्या जिवाची पर्वा न करता खंबीर पणे उभे असतात. कोरोना हा विषाणू आहे आणि तो कोणालाही ग्रासू शकतो ह्याची कल्पना असतानाही हे मेडिकल स्टाफ, आरोग्याकर्मी, पोलीस आणि स्वच्छता कर्मी आपापल्या कर्तव्यावर रात्रंदिवस काम करीत आहेत. आपल्या देशात शाळा आणि रुग्णालयांपेक्षा जास्त प्रार्थना गृह आहेत. आणि आज ह्या महामारीच्या काळात ती सर्व प्रार्थना गृह बंद ठेवावी लागली आहेत तर रुग्णालयांची मोठ्या प्रमाणात उणीव भासत आहे. ह्या कोरोनाच्या काळात मानवसेवा कोणत्याही श्रद्धेपेक्षा मोठी आहे आणि ती सेवा करणारे हे ईश्वरपेक्षा कितीतरी पटीने महान असतात हे सिद्ध झालं आहे.

आपल्याला कळलं आहे की आपण घरी बसून सुद्धा अनेक कामं करू शकतो. आरोग्य, पोलीस, स्वच्छता, परिवहन आणि भाजीपाला, दूध अशा अत्यावश्यक सेवा ही अशी काही कामं आहेत ज्यांच्यासाठी बाहेर जाऊनच काम करावं लागतं. अन्यथा बाकी अनेक कामं घरून किंवा परिसरातच राहून करता येऊ शकतात. यासाठी मुंबई सारख्या शहरात रोज ट्रेनचा जीवघेणा प्रवास करण्याची गरज नाही. जेंव्हा एखाद्या व्यक्तीची कार्यालयात गरज असेल तेंव्हाच त्याला बोलावता येऊ शकतं. रस्त्यांवर होणारी अनावश्यक गर्दी आणि गर्दीमुळे निर्माण होणार्‍या समस्या टाळता येऊ शकतात. यामुळे घरातील लोकांना जास्त वेळ देता येतो. फावल्या वेळात आपले छंद जोपासता येतात.

लोकांचा प्रवास कमी झाला तर पेट्रोल डिझेल सारख्या इंधंनांचा वापरही कमी होतो त्यामुळे वातावरणातील प्रदूषणाचं कमी झालेलं प्रमाणही आपण पहिलं. यामुळे काही सुंदर दृश्य आपल्याला पाहता आली. यात चंदिगढ इथल्या एका घरच्या गच्चीवरून थेट हिमालयाच्या चंदेरी शिखर रांगेचा फोटो पहिला. मोर, हरिण, सिंह यासारखे सहसा लोकवस्तीत न येणारे प्राणी पक्षी आपण पहिले. हे त्यांचंच घर आहे. आपण त्यात घुसखोरी केली आहे. हे ही आपण मान्य केलं. पण हे नुसतं मान्य करण्यावर राहता कामा नये. आज गाळाने भरलेल्या नद्या संतत प्रवाहामुळे निर्मळ झाल्या आहेत. किती निष्ठुर होतो आपण? एका वाहत्या नदीला असं बांधून ठेवलं होतं? याचा परिणाम आपल्या जीवनावर होतोच कारण आपण सुद्धा त्याच अन्न साखळीतून आपल्या जीवनावश्यक गोष्टी घेत असतो. आपणच दूषित केलेल्या नद्या, विहीरींचं पाणी आणि त्या पाण्यावर पोसलेल्या शेतीतील धान्य आपल्या शरीरात जाऊन अपाय करतेच. पण निसर्ग चक्र जर निसर्गनियमाप्रमाणे चाललं तर खूप चांगला परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. हा परिणाम कायम ठेवण्यासाठी लोकांना प्रवास आणि निसर्गाची लुबाडणूक थांबवण्यासाठी काही तरी ठोस उपाय योजना केली पाहिजे.

ह्या कोरोना काळात आपण पहिलं की आपण उपलब्ध वस्तूं वरच खूप सुंदर जीवन जगू शकतो. आपल्या आयुष्यात मॉल्स, हॉटेल्स, मोटेल्स, पब्स, क्लब्ज नसले तरी आपल्याला काही फरक पडत नाही. मुलांना पिझ्झा, बर्गर, कोक आणि वयाने वाढलेल्या लोकांना दारू, सिगरेट, गुटखा ह्या जीवनावश्यक वस्तु नाहीत हे कळून चुकलं आहे. आपण भाजीपाला, घरातील अन्नधान्य खाऊन घरातील लोकांसोबत बसून जेवण घेतलं, विविध पदार्थ मिळून बनवले तर पैश्यांची बचत आणि आनंदाची लयलूट करता येते.

आणखी एक गोष्ट आपल्याला कळली. ती म्हणजे आपल्या धकाधकीच्या काळात आपलं आयुष्य सुकर करतो तो सदैव अभावात जगणारा कामगार वर्ग. तो डोळ्यात स्वप्न घेऊन मुंबईत येतो पण त्याच्या हातात मोलमजुरीशिवाय काही पडत नाही. त्यांच्याकडे पाहण्याची आपली नजर ही द्वेष, घृणा मिश्रित होती. यापुढे ती बदलेल अशी अपेक्षा आहे.

ह्या कोरोनाने दाखवून दिलं की महासत्ता आणि पुढारलेले म्हणवणारे अमेरिका, इंग्लंड, फ्रांस, जर्मनी, इटली सारखे देशसुद्धा एका विषाणूपुढे हतप्रभ होतात. आपल्याकडे ह्या देशांमध्ये जाणार्‍या लोकांचं कोण कौतुक केलं जातं. पण एका विषाणूने दाखवून दिलं आहे की वरवरची प्रगती म्हणजे प्रगती नाही. दुसर्‍या देशात जाऊन शिक्षण आणि नोकरी करणार्‍यांचं निश्चितच कौतुक करावं, पण त्यांच्या तिथे असण्याला फार मिरवू नये. त्या देशांमध्ये ज्या कारणासाठी जात आहात त्या गोष्टीला महत्व द्यावं, त्या देशात जाण्याला नाही. याशिवाय जगावर राज्य करण्याची महत्वाकांक्षा बाळगणारे चीन सारखे देश सर्व जगाला एका भयंकर संकटात ढकलत असतात. तेंव्हा ह्या बलाढ्य देशांचे गोडवे गाणार्‍यांनी यापुढे तारतम्य बाळगूनच त्यांची स्तुती करावी.

ह्या एवढ्याशा कोरोना विषाणूने आपल्याला फार मोठ्या शिकवण्या दिल्या आहेत. त्या आपण इतक्या अमलात आणल्या पाहिजेत की पुढील अनेक पिढ्यांना त्यांचा फायदाच होईल.

16 

Share


S
Written by
Shubham Yadav

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad