यारो दोस्ती बडीही हसीन है .... ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिदंगी है......खंरच आहे ना ते. आयुष्यात प्रत्येकाला मित्रमैत्रिणी पाहीजेतच. त्यांच्या बरोबर शाळेत येता जाता केलेली गंमत जंम्मत, वर्गात तास चालू असताना केलेली मस्ती, क्रिडा स्पर्धेत हादरून सोडलेल मैदान, मधल्या सुट्टीत चार हातांनी मिळून फस्त केलेला एकच डब्बा. नुसतं आठवलं तरी मन सुखावतं आणि गालावर गोड हंसू येतं......तुमच्याही आलं ना ? मित्र पाहीजेत यार त्यांच्या बरोबर असलांत की तुम्ही तरूणच राहतात. मित्र म्हणजे असे असतात की आपण जगातील कोणत्याही फालतू विषयांवर त्यांच्या बरोबर बोलू शकतो. प्रत्येकाच्या लहानपणीच्या आठवणी खास असतात. आयुष्याच्या वाटेवर पुढे चालताना ह्या आठवणी मात्र कोसो लांब राहतात आणि उरते फक्त निखळ निस्वार्थ मैत्री.
शाळा संपते. कॉलेज मध्ये नविन मित्रांची बेरीज होते. पण जुने ते सोने या उक्ती प्रमाणे ती लहानपणीची मैत्री खास असते. कारण त्यांच्या बरोबर लहानपणी घालवलेले ते दिवसही खास असतात. त्यांच्याबरोबरच तर आपण लहानाचे मोठे होतो. आणि मग वाटत रहाते "लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा" पण ते शक्य नसते. अशा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर आपण जिवनातल्या प्रत्येक गोष्टी शेअर करतो. साले सगळ्यांच गोष्टींचे राजदार असतात पण तेवढ्याच भरवश्याचे पण असतात. कुणाला मुलगी पटली तर सुखात पार्टी करणारे, कुणाचा ब्रेकऑफ झाला तरी दुखात सहभागी होणारे असे एक ना अनेक प्रसंगाचे ते साक्षीदार असतात. आपल्या गरीब मित्राची पिक्चरची तिकीट काढणारे मित्र, एखाद्याचे वडील आजारी असतील तर धावपळ करणारे, त्याला धीर देणारे मित्र, दोन घोट पोटात गेल्यावर आपली व्यथा सागूंन त्याच्या कुशीत शिरून ढसाढसा रडणारेही मित्रचं असतात.
पुढे प्रत्येकजण आपआपल्या आयुष्यात रममाण होतो. लग्न होतं, मुलं होतात. कामानिमित्त किवां इतर कारणांमुळे स्थलांतर होते. आणि आयुष्य एका वेगळ्या वळणावर येऊन पोहचतं. प्रपंच वाढतो, जबाबदा-या येतात. आपसुकच नकळत वागण्यात, बोलण्यात प्रगल्भता येते. आपण आपल्याच व्यापात इतके गुंतलेलो असतो की जरी मित्रांच्या संपर्कात असलो तरी गाठीभेठी दुरवतात. आणि मग त्याच त्याच आयुष्याचा उब येतो. आयुष्य धीर गंभीर होऊन जात. शेवटी मनोसोक्त कधी हसलो होतो, कधी सारे विचार सोडून मनमोकळं वावरलोय हेही नीट आठवत नाही. अशावेळी एकांतात त्या मित्रांचा विचार जरी मनात आला तरी सगळ्या जुन्या आठवणी, सोबत घालवलेले ते दिवस डोळयांसमोर येतात. आणि मग नकळत तोडांतून बाहेर येतं "काय दिवस होते ते यार......." मग वाटत राहतं ते दिवस पुन्हा जगता यावं. म्हणून सांगते जिवनात प्रत्येकाला
मित्रमैत्रिणि असावेत. नुसते असून उपयोग नाही त्यांच्या संपर्कात रहा. त्यांच्या बरोबर पिकनिकला जा. निदान महिन्यात एकदा तरी त्यांची भेट घ्या. त्यांच्याशी गुजगोष्टी करा. त्याने गतकाळात एकत्र घालवलेल्या सहवासाचा फिल येतो, परत चिरतरूण झाल्यासारखं वाटतं. थोडा वेळ सा-यां व्यापाचां विसर पडतो. त्यांच्याबरोबर घालवलेला थोडा वेळही त्यांच्या पुढच्या भेटी पर्यंत व आपल्या रोजच्या कामाशी दोन हात करायला उभारी देतो. निघताना "काही लागलं तर कळवं रे...." अशी काळजीने पाठीवर थाप मारणारे हे जिवा भावाचे मित्र ! ह्यांना गमवून कसं चालेल त्यांची निस्वार्थ मैत्री विसरून कसं चालेल.... ह्यांना जिवापाड जपलं पाहीजे..........