Bluepadअभिरुचि संपन्न करणारी ही पाच पुस्तकं वाचाच
Bluepad

अभिरुचि संपन्न करणारी ही पाच पुस्तकं वाचाच

Surekha Bhosale
Surekha Bhosale
6th Jul, 2020

Shareमाणसाचा सर्वात जवळचा मित्र कोण असेल तर ते पुस्तक. पण जसे प्रत्येकाचा मित्र परिवार वेगळा असतो तसंच वाचनाची आवड देखील भिन्न असू शकते. आपण जे वाचतो त्यानुसार आपली आभिरुची घडत असते. त्यामुळे तुम्ही वाचत असलेलं पुस्तक तुम्हाला हर तर्‍हेने समृद्धच करीत असतं. चला अशा काही पाच पुस्तकांविषयी जाणून घेऊया.

अमृतवेल – लेखक वि. स. खांडेकर : या कादंबरीचा प्रकाशन काळ आहे १९६७ चा. आपल्या प्रियकरच्या आकस्मिक निधनाने सैरभैर झालेली नंदा आपली पीएचडी पूर्ण करण्यासाठी विलासपूरची तिची जहागीरदार मैत्रीण वसुंधरा गुप्तेच्या वाड्यात राहायला येते आणि तिला माणसाच्या स्वभावाचे अनेक पैलू दिसू लागतात. वसुंधरा तिच्या पतीचा, देवदत्ताचा दु:स्वास करते तर देवदत्त आपल्या आईचा. त्याच्या मनावर हे बिंबलं आहे की त्याच्या आईमुळेच त्याचे वडील घर सोडून गेलेत. पण सत्य काही वेगळंच असतं. नंदा आणि दासबाबू यांचे संवाद हे पूर्ण वैचारिक खाद्य आहे. ह्या संपूर्ण कादंबरीवर शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’चा प्रभाव आहे. माणसाचे बदलत जाणारे स्वभाव, लोकांसमोर असलेली प्रतिमा आणि प्रत्यक्ष ती व्यक्ती यात किती अंतर्बाह्य फरक असतो हे नंदा आणि दासबाबू यांच्या विश्लेषणात्मक चर्चेतून समोर येतं. प्रेमाची अमृतवेल किती तरी वेळा विषप्राशन करत तगून असते, हा अप्रतिम अनुभव ही कादंबरी देते.

अग्निपंख – ए.पी.जे. अब्दुल कलाम : हे अर्थातच आत्मचरित्र आहे. एक घरोघरी पेपर टाकणारा मुलगा देशात मिसाईल मॅन म्हणून ओळखला जाऊ लागला, राष्ट्रपति बनला आणि करोडो तरुणांचं प्रेरणा स्थान बनला. त्यांचं आत्मचरित्र कोणत्याही थरार चित्रपटपेक्षा कमी नाही. त्यांनी अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या भारताच्या शिरपेचातील मोरपिसं ठरलेल्या क्षेपणास्त्रांची जडणघडण ही फार सुंदरपणे वर्णन केली आहे. हे पुस्तक म्हणजे जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची कहाणी आहे. स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी चित्र आहे.

पुतीन (महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान) - गिरीश कुबेर : आज रशिया मध्ये व्यक्तिकेंद्रित हुकुमशाही नांदते आहे. पुतीन या हुकूमशाही व्यक्तिमत्वाची ओळख मराठीतून करून देणारं आणि रशियाचा इतिहास सांगणारं हे पुस्तक आहे. १९५३ च्या स्टालिनच्या गूढ मृत्यूनंतर सुरु होतं ते निकिता ख्रुश्चेव्ह प्रकरण. ख्रुश्चेव्ह यांच्या नंतर लिओनिद ब्रेझनेव्ह, मिखाईल गोर्बाचेव्ह, बोरिस येल्त्सिन यांचे पर्व येतं. रशियात लोकशाही नांदलीच नाही. तिथं सत्ता होती ती एककल्ली, स्वतःवर प्रेम करणाऱ्या सत्ताधीशांचीच. येल्त्सिन यांनी गोर्बाचेव्ह यांच्याकरवी रशियाचं विभाजन करून घेतलं आणि याचं येल्त्सिन यांचं बोट धरून पुतीन आधी पंतप्रधान आणि नंतर राष्ट्रपती झाले. वेगवेगळे रंग आणि ढंग वाचताना अंगावर काटा येतो.

मेलुहा – आमिष त्रिपाठी : मूळ इंग्रजीत लिहिल्या गेलेल्या या शिव त्रयीमध्ये मेलुहा नंतर नाग, वायुपुत्राची शपथ ह्या तीन पुस्तकांचा समावेश आहे. कधी आपल्या जगापासून काही वेगळं आणि हलकं फुलकं वाचण्याची इच्छा झाली तर ही कादंबरी अप्रतिम आहे. शंकराला ईश्वर म्हणून मान्यता मिळेपर्यंत तो कसा होता, कसा तो सतीच्या प्रेमात पडला याचं फार मनोवेधक चित्र यात उभं केलं आहे. याशिवाय मेलुहा ह्या नगराची रचना वर्णन करताना लेखकाने बारीक सारिक तपशील दिले आहेत ज्यामुळे ती नगरी आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते.

मदर इंडिया – कॅथरीन मेयो : १९२७ साली प्रकाशित झालेल्या ह्या पुस्तकाने त्याकाळात भारतातील वैचारिक समूहात वादळ उठवलं होतं. कॅथरीन यांनी त्यावेळी भारतभर फिरून भारतातील स्त्रियांची अवस्था नेमकी कशी आहे हे आपल्या प्रत्यक्ष भेटीचे दाखले देऊन सांगितलं आहे. आधीच क्षीण असलेल्या मुलींची लहान वयात होणारी लग्न, त्यामुळे कमजोर निपजणारी पुढची पिढी, अन्न नाही शिक्षण नाही अशा अवस्थेत धर्माचा पगडा मात्र खूप मोठा. धर्माच्या नावावर चाललेली बजबजपुरी ही विषण्ण करणारी होती. मात्र या सत्याला तत्कालीन धर्म मार्तंडानी नाकारलं आणि कॅथरीन ह्या भारताचा दुष्प्रचार करीत आहेत असं म्हणत त्यांच्यावर जहरी टीका केली. पण काही विचारवंतांनी हे पुस्तक उचलून धरलं. भारतातील स्त्रियांची अधोगती थांबण्याला हे पुस्तक करणीभूत होतं असं म्हटलं तर वावगं होणार नाही. याची अनेक भाषात भाषांतरे उपलब्ध आहेत.

62 

Share


Surekha Bhosale
Written by
Surekha Bhosale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad