Bluepad | Bluepad
Bluepad
ते बालपण कुठे हरवलं?
R
Ramya Deshpande
3rd May, 2020

Share


ते बालपण कुठे हरवलं?

अनेक वर्षांनी मिळालेल्या ह्या लॉकडाउनच्या ‘फुरसत के पल’मध्ये जुन्या मित्र मैत्रिणींच्या गप्पा नक्कीच निघाल्या असतील. नाही का? आपले बालपणीचे दिवस आणि आताची मुलं यात फक्त एका युगाचं अंतर नाही तर एका उत्क्रांतीचं अंतर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

आताची मुलं ही डिजिटल माध्यमात उपलब्ध असलेल्या खेळांमध्ये इतकी गुंतली आहेत की त्यात त्यांचं अक्षरश: लॉकडाउन झालं आहे. हातातल्या ह्या मोबाइल नावाच्या खेळण्याने त्यांना प्रत्यक्ष “खेळ” ही गोष्टच माहीत नाहीये असं एकंदर चित्र दिसत आहे. आता किमान पस्तीशी - चाळीशी पार केलेल्या लोकांचं बालपण असं नव्हतं. फार फार वेगळं होतं.
लहानपणी आम्ही मुली भातुकली खूप खेळायचो. आमच्याकडे बार्बी नव्हती पण संसार खूप असायचा. आमच्या खेळात मुलांना मज्जाव असायचा. कोणी जबरदस्तीने आलाच तर आम्ही त्याला “मुलीत मुलगा लांडोरा, शिजवून खातो कोंबडा,” असं चिडवत असू. हीच गत मुलांमध्ये मुलगी खेळायला गेली की तिची व्हायची. पण त्यातही आम्ही मुली भोवरे आणि गोट्या खेळून घेत असू.

काही खेळांची अशी मुलं मुलींमध्ये विभागणी झालेली असली तरी काही खेळ हे दोघांसाठी असायचे. त्यात लगोरी, पकडा पकडी, साखळी, चोर पोलीस, लपाछपी, डोंगराला आग लागली, आईचं पत्र हरवलं, तळ्यात मळ्यात, कावळा उड चिमणी उड, छप्पीन उडी, दोरी उड्या, कॅरम, पत्ते हे खेळ खेळायचो. याशिवाय लंगडी, खो खो, कबड्डी, डॉजबॉल आणि कधीतरी हॉकी आणि क्रिकेट खेळायचो. झाडावर चढण्याची सुद्धा पैज लागायची. खरी गंमत तर बॅडमिंटन ह्या खेळाची असायची. आमच्याकडे ना रॅकेट असायची ना शटल कॉक. मग कागदाच्या गोळ्याचा शटल कॉक व्हायचा आणि वहीच्या पुठ्ठ्याची रॅकेट. या सगळ्या खेळात दोन गोष्टी मात्र होत्या त्या म्हणजे खेळातली एकाग्रता आणि दुसरी म्हणजे खूप वाद घालण्याची क्षमता. मग, कट्टी काय नी बट्टी काय!

हे झालं खेळासंबंधी. ऐंशी नव्वदच्या दशकाचा काळ सामाजिक संक्रमणाचा होता. अनेक नव्या गोष्टी येत होत्या. तेंव्हा टीव्ही फक्त आर्थिकदृष्ट्या थोड्या बर्‍या लोकांकडे तो असायचा. आणि ते लोक टीव्ही बघायला प्रत्येकाकडून चार-चार आणे घ्यायचे. आम्हीही घरी भांडून ते चार आणे घ्यायचो आणि टीव्ही बघायचो. त्यात काय डोंबलं कळायचं? पण बघायचं. नंतरनंतर टीव्हीवाले कोणत्या वेळी कोणता कार्यक्रम असेल ते सांगू लागले. मग आपल्या आवडत्या कार्यक्रमाच्या त्या त्या वेळी आम्ही चार चार आणे घेऊन जायचो. अशी ही टेस्ट डेवलप झाली. त्याच दरम्यान व्हीसीआर म्हणजे विडिओ कॅसेट रेकॉर्डर आले. ह्यात त्यावेळचे चित्रपट असायचे. त्यावेळी आम्ही वर्गणी काढून एका वेळी ३ ते ४ चित्रपटांच्या कॅसेट आणत असू आणि रात्रभर बघत असू. यात “आपल्या” चित्रपटांसोबत त्या त्या वेळी लोकप्रिय ठरलेले “हनी आय श्रंक द किड्स” सारखे इंग्रजी चित्रपट देखील पहायचो. बॉलीवूड हॉलीवूड ह्या संकल्पना त्यावेळी नव्हत्या. याशिवाय आम्ही गल्ली गल्लीत लागणारे पडद्यावरचे चित्रपट पहायचो. माझ्या आजीच्या कॉलनीत किंवा एखाद्या मोठ्या ठिकाणी त्यादिवशी कोणते चित्रपट लावणार हे फळ्यावर लिहिलं जायचं. मग आम्ही आमची गोणपाटं घेऊन शक्यतो प्रॉजेक्टरने पडद्यावर ज्या बाजूने किरणं पडणार आहेत त्याच बाजूची जागा अडवायचो. पडद्याच्या मागे चित्रपट उलटा दिसायचा. म्हणजे उजवा हात उचलला तर डावा दिसायचा.

आताच्या डिजिटल तंत्रज्ञानात सर्वात मोठी गदा आली आहे ती पत्रव्यवहारावर. आमच्यासाठी मात्र पत्र लिहिणं ही फार आनंदाची गोष्ट असे. मी दिवाळीचे किमान शंभर एक ग्रिटींग्ज हाताने बनवून ते सर्व मित्र मैत्रिणींना पाठवायचे. सोसायटी सोडून गेलेल्या मैत्रिणीला, दूरच्या शहरात ट्रेनिंगसाठी गेलेल्या बाबांना पानं भरभरून पत्र पाठवायचे. गावाला पत्र पाठवण्यासाठी आजी सांगेल तसं लिहून ते व्यवस्थित पोस्ट करण्याची जबाबदारी माझी असायची.

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्हाला कधीच समर कोर्समध्ये घालण्याची गरज पडली नाही. कारण चांदोबा, गुलबकावली, चंद्रकांत खाडे यांची गोष्टीची पुस्तकं, जातक कथा, येशू ख्रिस्ताच्या गोष्टी यांच्यासोबत चाचा चौधरीसारखी हिन्दी आणि इंग्लिश कॉमिक्स पुस्तकं पण असायची. वाचन झालं की पाळी यायची आंबे, पेरु, चिंचा, बोरं, करवंदं यांची. सर्दी तेंव्हाही व्हायची पण तो आनंद अविस्मरणीय होता. त्यांची चव कायमसाठी जिभेवर ठाण मांडून बसली आहे.

या सगळ्यासोबत आम्ही सर्व चुलत, मामे, मावस, जवळचे, दूरचे नातेवाईक एकमेकांना पूर्वसूचना न देता एकमेकांच्या घरी जात होतो. आज डिजिटल तंत्रज्ञानाने लांब गेलेले व्हर्च्युअली जवळ आले आहेत. तंत्रज्ञानामुळेच वाड्या वस्त्यांवर मॉल उभे राहिले, लोक विखुरले आणि आता तेच तंत्रज्ञान असं लोकांना जवळ आणत आहे. जी मुलं एकत्र येऊन बागडायला हवी होती ती आता विविध माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात असतात, त्यामुळे धड एकलकोंडीही नाहीत आणि धड मिसळणारी ही नाही अशा एका विचित्र अवस्थेत ती दिसत आहेत. आजच्या पालकांना याची जाण आहे, म्हणूनच एके काळी दम देऊन घरी बोलवणार्‍या आई बाबांची जागा आता “अरे मैदानात जा खेळायला” असं कानी कपाळी ओरडणार्‍या मम्मा डॅडानी घेतली आहे. अच्युत गोडबोले यांच्या शब्दात सांगायचं तर पूर्वीचे दिवस आता ‘बीफोर कोरोना’ अर्थात बीसी तर लॉकडाउननंतरचे दिवस ‘आफ्टर कोरोना’ अर्थात एसी म्हणून ओळखले जाणार आहेत. जग पूर्णपणे बदलणार आहे. आशा आहे की आजच्या मुलांचं जगही तंत्रज्ञानाच्या सोबतीने का होईना पण ते अधिक समाजाभिमुख असेल आणि त्यात खूप बाल्य असेल.

56 

Share


R
Written by
Ramya Deshpande

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad