Bluepadसरोज खान – एका मनस्वी अदाकारीचा अंत
Bluepad

सरोज खान – एका मनस्वी अदाकारीचा अंत

Vinisha Dhamankar
Vinisha Dhamankar
4th Jul, 2020

Share


प्रथितयश चित्रपट दिग्दर्शकांना त्यांच्या चित्रपटाला हमखास सुपरहीट करण्यासाठी एकच नाव का आठवावं? साधना, वैजयंतीमाला, मधुबाला ते मीनाक्षी शेषाद्री, माधुरी दिक्षित, मनीषा कोइराला आणि आजची सोनाक्षी सिन्हा यांना आपल्या नृत्याला प्रेक्षक पसंती हवी असेल तर एकच व्यक्ती नृत्य दिग्दर्शक म्हणून का हवी होती? १०१ रुपयांचं बक्षीस आणि पाठीवरची थाप ही करोडो रुपये कमावणार्‍या बॉलीवुड मधील मोठमोठ्या नटनट्यांना लाख मोलाची का वाटावी? कारण ती थाप आणि ते पैसे देणारी कोणी साधारण व्यक्ती नव्हती. तर ती होती आपल्या कार्यक्षेत्रात तब्बल साडेसहा दशकं काम करून सरोज खान. आज आदराने उच्चारलं जाणारं हे नाव कमवण्यामागे तेवढीच प्रचंड मेहनत आहे.


आपल्या कामाएवढी प्रसिद्धी आपल्याला मिळत नाही ही खंत मनाशी बाळगून सुद्धा सरोजने आपलं कामच इतकं बोलकं केलं की त्यांना काही बोलण्याची गरजच भासली नाही. त्यांच्या तालमीत तयार झालेल्यांनी एका रात्रीत खूप लोकप्रियता कमावली पण पडद्याच्या मागे राहून अनेक नृत्य दिग्दर्शकांप्रमाणेच सरोज खान यांना देखील यश सहज मिळालं नाही. खडतर वैयक्तिक आयुष्य, आपल्या क्षेत्रात सुरू असलेली जीवघेणी स्पर्धा, काम मिळाले तर पैसे नाही, पैसे मिळाले तर नाव नाही. अशा अनेक अडथळ्यांना सामोरं जात सरोज खान यांनी केवळ स्वत:ची ओळखच निर्माण केली नाही तर त्यांनी नृत्य दिग्दर्शकांसाठी पुरस्कारांचे दालन सुद्धा उघडले. अशा या मनस्वी नर्तिकेला १७ जून रोजी त्यांना श्वासोश्वासाचा त्रास सुरू झाला म्हणून वांद्रे इथल्या गुरु नानक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ३ जुलै २०२० रोजी वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांना हृदय विकराचा झटका आला आणि त्यांनी या आयुष्याच्या रंगमंचावरून एक्झिट घेतली.

सरोज खान म्हटलं की आठवतं ते माधुरीची “एक दो तीन”, “धकधक”, “चोली के पिछे”, “हमको आज कल है” “हमपे ये किसने हरा रंग डाला” ही गाणी किंवा ऐश्वर्याची “निंबुडा” “डोला रे डोला” अशी एका पेक्षा एक सरस गाणी. पण तुम्हाला १९६२ साली आलेल्या डॉ. विद्या या वैजयंतीमाला अभिनीत चित्रपटाचं सहायक नृत्य दिग्दर्शन आणि १९६३ साली आलेल्या दिल ही तो है या नूतन अभिनीत चित्रपटातील “निगाहें मिलने को जी चाहता है” या गाण्याचं मुख्य नृत्य दिग्दर्शन सुद्धा सरोज खान यांनीच केलं होतं असं सांगितलं तर विश्वास बसेल? मग तर तुम्हाला सांगायला हवं की १९६३ सालच्या ताज महल चित्रपटातील “चांदी का बदन” किंवा १९५८ साली आलेल्या हावरा ब्रिज मधल्या “आइये मेहरबान” ह्या आणि अशा अनेक गाण्यात त्यांनी स्वत: नृत्य केलं आहे. मुख्य अभिनेत्री पेक्षा काकणभर सरस असलेल्या सरोजच्या वाट्याला मात्र पाठीमागे नाचणार्‍या मुलींच्या घोळक्यात नाचणंच आलं होतं.
कोणाला मिळणार नाही असं भाग्य सुद्धा सरोजच्या वाट्याला आलं आणि ते म्हणजे वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी त्यावेळचे नावाजलेले नृत्य दिग्दर्शक सोहनलाल यांची सहायक म्हणून काम करण्याचं. अर्थात हे सुद्धा सरोज यांच्या कमालीच्या अदाकारीमुळे शक्य झालं.

सोहनलाल हे सरोजचे गुरु तर होतेच पण वयाच्या तेराव्या वर्षीच आधीच विवाहित आणि चार मुलांचे पिता असलेल्या आणि आपल्यापेक्षा २८ वर्षांनी मोठ्या असलेल्या सोहनलाल यांच्या त्या पत्नी झाल्या. हे लग्न म्हणजे एकमेकांना वाटणारं निव्वळ आकर्षण होतं जे पुढे जाऊन तुटणारच होतं. वयाच्या १४व्या वर्षी त्यांना मुलगा झाला जो आता राजू खान म्हणून नावाजलेला नृत्य दिग्दर्शक आहे. काही दिवसांनी ते विभक्त झाले आणि सोहनलाल आजारी असताना त्या परत त्यांच्याकडे गेल्या. तेंव्हा त्यांना कोयल (हीना) ही मुलगी झाली. पण सोहनलाल तेंव्हा सुद्धा त्यांना सोडून परत मद्रासला निघून गेले. मग मूळच्या निर्मला नागपाल असलेल्या सरोज यांनी सरदार रोशन खान यांच्याशी विवाह केला आणि तेच नाव त्या पुढे वापरू लागल्या. त्यांना सुकन्या खान ही मुलगी झाली जी सध्या दुबईमध्ये सरोज यांनी सुरू केलेली नृत्यशाळा चालवते.

वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ उतार झेलत सरोज चित्रपट क्षेत्रात सुद्धा दुर्लक्ष आणि दुय्यमत्व यांचा सामना करीत होत्या. त्यांनी अनेक चित्रपटांचं नृत्य दिग्दर्शन केलं पण त्या बदल्यात १० ते १५ हजारापेक्षा अधिक पैसे मिळाले नाहीत. ज्या गाण्यांवर चित्रपट करोडोची माया जमवत होते त्याचे हे कलाकार मात्र अशा दुय्यमत्वाला सामोरे जात होते. सुभाष घई यांनी सरोजमध्ये असलेली कला हेरली आणि त्यांच्या “हीरो” या चित्रपटासाठी संधी दिली. त्यावेळी सरोजना लोक ओळखत होते पण त्यांना संपूर्ण चित्रपट करू द्यावा असं कधी घडलं नव्हतं. पण सुभाष घई यांनी संधी दिली याचा अर्थ काही तरी नक्की असेल असं लोकांना वाटू लागलं. आणि “हीरो” पाहून त्यांच्या कलेवर शिक्कामोर्तब झाले. मग सरोज यांना मुख्य धारेतील चित्रपट मिळत गेले ज्यात श्रीदेवीचा १९८६ चा नागिन आणि १९८७चा मि. इंडिया सुद्धा होते. खरी ओळख मिळाली ती १९८८ साली आलेल्या तेजाबच्या ‘एक दो तीन’ने. या गाण्यामुळे फिल्मफेअर पुरस्कारात नृत्य दिग्दर्शकाची कॅटेगरी सामील करण्यात आली आणि पहिला पुरस्कार सरोज यांना मिळाला. त्यांना २००२ साली “डोला रे डोला” साठी २००५ साली “श्रीरंगम” (तामिळ) आणि २००७ साली जाब वी मेटच्या “ये इश्क हाए” ह्या गाण्यांसाठी राष्ट्रीय परितोषिक मिळाले. अन्य अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. अशा बॉलीवुडच्या गाण्यांना नृत्याचा साज चढवणार्‍या नर्तिकेला, सरोज खान यांना विनम्र अभिवादन.

19 

Share


Vinisha Dhamankar
Written by
Vinisha Dhamankar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad