Bluepadफेअर निर्णय
Bluepad

फेअर निर्णय

Mridula Shinde
Mridula Shinde
3rd Jul, 2020

Shareभारता सारख्या विकसनशील देशाला जर मोठी बाजारपेठ बनवायची असेल तर त्यासाठी कच्चा माल काय असेल? तर तो आहे न्युनगंड. ह्या न्युनगंडाचा वापर करून तद्दन व्यावसायिक तुम्हाला गरज नसताना अशा एखाद्या वस्तूची निर्मिती करतात आणि त्याची अशी काही जाहिरात करतात की तुमच्याकडे ती वस्तु नसेल तर मेल्याहून मेल्यासारखे वाटेल. काळसर, सावळा किंवा गडद सावळा ह्या रंगांनी असेच न्युनगंड बहुतांश भारतीयांच्या किंबहुना भारतीय स्त्रियांच्या मनावर काजळी धरली होती आणि त्याला आणखी गदड़ करण्यात फेअरनेस क्रीमवाल्यांनी मदत केली आहे. आपल्या देशाला “भेद” नवे नाहीत. एका पेक्षा दूसरा माणूस प्रत्येक बाबतीत वेगळा असतो हा निसर्ग नियम आहे. पण भारतात मात्र प्रत्येक माणूस त्याच्या जाती-धर्माच्या आणि वर्णच्या आधारावर वेगळा असतो. वर्तमान पत्र उघडून पहिली तर लग्नाच्या जाहिराती वाचून मन पिळवटून निघतं. “गोरी वधू हवी”, “स्वजातीतील हवी” “उंच हवी”, “सावळ्या, ठेंगण्या मुली क्षमस्व”. ह्या असल्या मथळ्यांनी विवाह विषयक कॉलम भरलेला असतो. वर्तमान पत्रे सुद्धा त्यांना का जागा देतात? कारण इथे ग्राहकांच्या इच्छेनुसार त्यांना सेवा पुरवली जाणे हा बाजाराचा नियम पाळला जातो. लग्न जुळवणारे आणि वर्तमान पत्रे तेच तर करतात.

ह्या जाहिरातींमुळे तयार झालेला “गोरेपणा हाच सर्वोत्तम वर्ण” ह्या भारतीयांच्या मानसिकतेचा सर्वात जास्त त्रास होतो तो इथल्या सावळ्या, काळसर वर्णाच्या मुलींना. इथे मुलांच्या बाबतीत वर्णभेद करायचा नाहीये पण आपला वर्ण कसाही असला तरी बायको मात्र गोरीच हवी हे त्या मुलांच्या मनावर सुद्धा बिंबवलेलं असतं. मुलगी जर सावळी असेल तर तिला उजवून टाकता यावी म्हणून तिला शिक्षणात हुशार करणारे पालक काही कमी नाहीत. यात सुद्धा मुलगी कमी पडली तर काही खरं नाही. दोन्ही प्रकारात लग्न करण्यासाठी मुलाकडचे दाबून हुंडा घेतात. हुशार मुलींच्या पालकांना सुद्धा “हुशार असली तरी रंग यथातथाच आहे मुलीचा” हे ऐकावं लागतं. वरून “आम्ही नकार दिला तर कोण तुमच्या मुलीशी लग्न करील?” हा प्रश्न मुलीच्या बापाला सर्पदंशासारखा डसतो. हुंडा दिलाच तरी लग्नानंतर मुलगी सुखी होतेच असं नाही. रंगावरून तिला सतत बोललं जातं. सावळ्या मुलींच्या वाट्याला येणारं हे दु:खच बहुधा गोर्‍या करणार्‍या अर्थात फेअरनेस क्रीम्सचं भांडवल बनलं. जिथे लोकांची मुलींच्या सौन्दर्य आणि रंगाकडे बघण्याची दृष्टी बदलायला हवी होती तिथे त्या मुलीला निसर्गाने दिलेला रंग रसायनांचा मारा करून बदलवण्याचा अट्टाहास व्यवसायिकांनी केला.

“माझ्या वाट्याला जे दु:ख आणि अवहेलना आली ती माझ्या मुलीच्या वाट्याला येऊ नये” म्हणून महिन्याच्या खर्चातून मुलीसाठी “फेअर अँड लव्हली” विकत घेणार्‍या आणि त्यांना गोरं करण्याचा प्रयत्न करणार्‍या आया इथे दिसू लागल्या. यात त्यांचा दोष तो काय? मुलींना गोरे करण्याचं साधन, ते ही अगदी स्वस्तात मिळत असेल तर ते कोणाला नको आहे? ते मेडीकली प्रूवन आहे की नाही याच्याशी कोणाला पडलेली होती आणि आहे? रंगभेद तर आफ्रिकेत आणि अमेरिकेत चालतो भारतात थोडीच? इथे चालतो तो बायको, असिस्टंट, सेक्रेटरी, ऑफिसर, कर्मचारी, न्यूज अँकर, अभिनेत्री किंबहुना आपल्या संपर्कातील प्रत्येक स्त्री ही गोरीच हवी हा अट्टाहास. “फेअर अँड लव्हली” सारख्या फेअरनेस क्रीम्सनी हा अट्टाहास पुरेपूर पुरवला. मुलींच्या मनातील स्वप्नं साकार करण्याची आश्वासनं देत आपले गल्ले भरले.

फार्मास्यूटिकल्स ह्या गटात न येणार्‍या ह्या क्रीम्स खरंतर ग्राहकांच्या त्वचेला आघात पोहोचवत असतात. त्वचारोग तज्ञ ह्या क्रीममध्ये त्वचेला ब्लीच करणारे स्टरोइड, पारा आणि केमिकल सॉल्ट असे काही एजंट असण्याची शक्यता वर्तवतात. पण हिंदुस्तान युनिलीवरचे प्रवक्ता असे काही एजंट क्रीम मध्ये असण्याला नकार देताना सांगतात की त्यांच्या प्रॉडक्ट्सना अन्न आणि औषध प्रशासनाची मान्यता मिळाली आहे. ही मान्यता कोणत्या आधारावर मिळाली आहे हा संशोधनाचा विषय असेल. खरंतर भारत उष्ण कटिबंधात येतो आणि इथे सावळी त्वचाच सर्वात योग्य त्वचा आहे. त्वचेत असलेल्या मेलेनिनमुळे सूर्याच्या किरणांची तीव्रता कमी होते. आणि फेअरनेस क्रीमवाले नेमके हे मेलेनिन कमी करण्याच्या चुकीच्या जाहिराती करतात.
या क्रीम्समुळे कोणताही फायदा होत नाही हे वारंवार समोर आणूनसुद्धा फेअरनेस कंपन्या गोबेल्स नीतीचा अवलंब करीत नवनवीन मॉडेल्सच्या माध्यमातून जाहिरातींचा सतत मारा करत राहिल्या. आपल्या कौशल्याने आपली स्वप्नं मुलींनी पूर्ण केली पण गेल्या ४५ वर्षांपासून “फेअर अँड लव्हली”ची निर्मिती करणार्‍या हिंदुस्तान युनिलीवरने मात्र जगभरात आपलं साम्राज्य पसरवलं. पण जे जमिनीवर आपले बंध न ठेवता आकाशात उडतात त्यांना एक दिवस जमिनीवर यावंच लागतं. अभय देओल, नंदिता दास यांनी गोरेपणावरून सौंदर्याची कल्पना करण्यास केलेला विरोध, रणबीर कपूर, स्वरा भास्कर, सुशांत सिंह राजपूत यांसारख्या कलाकारांनी फेअरनेस क्रीमच्या जाहिराती करण्यास दिलेला नकार यामुळे आणि काही याचिकांमुळे हिंदुस्तान युनिलीवरने आपल्या क्रीमच्या नावातून “फेअर” हा शब्द काढून टाकण्याची घोषणा केली आहे. “वराती मागून घोडे” ही म्हण यांना लागू होत असली तरी “उशिराचे शहाणपण” असं ही याला म्हणता येईल. किंबहुना ह्या पुढाकारामुळे त्यांचं कौतुकच करायला हवं. सामाजिक बदल हे पाण्याप्रमाणे वरून खाली झिरपत जातात. त्याप्रमाणे गोर्‍या कातडीचा टॅबू लवकरच संपुष्टात येईल अशी अशा करूया.


17 

Share


Mridula Shinde
Written by
Mridula Shinde

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad