Bluepadहेंचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥
Bluepad

हेंचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥

S
Sunita Balakrishnan
1st Jul, 2020

Share

चालला गजर जाहलो अधिर लागली नजर कळसाला पंचप्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला देखिला कळस डोईला तुळस धावितो चंद्रभागेसी समिप ही दिसे पंढरी याच मंदिरी माऊली माझी
मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा त्राता घे कुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवतो माथा माऊली माऊली, माऊली माऊली
पुंडलिक वरदे हारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय !!!
साऱ्या विश्वात महाराष्ट्राची ओळख संतांची भूमी म्हणून तर संतांचे माहेर पंढरपूर ओळखलं जातं.  महाराष्ट्र भूमीने वारीची परंपरा हजारो वर्षांपूर्वी पासून जपली आहे.
वारकरी संप्रदायाचा आषाढी एकादशी म्हणजे आनंदोत्सव, त्याची अनुभूती म्हणजेच वारीत देहभान विसरून तल्लीन झालेला वारकरी विठ्ठलाचं नाव ओठी, विठ्ठलाचं रूप ध्यानी जिवाला विठ्ठलाची आस लागलेली, विठुरायाच्या भेटीसाठी विठ्ठलाच्या भक्तीत नाचत गात, खेळ खेळत, फेर धरत विठ्ठलाच्या वाटेकडे मैलोनमैल चालताना सुद्धा थकलेल्या पावलांमध्ये आणखी बळ येतं जेव्हा भक्तीचा गजर गर्जतो, टाळमृदुंगाचा स्वर उंचावतो...
ध्वनींनाद गगनाला भिडतो, आसमंत दुमदुमतो, पावलं उंच उड्या घेतात.. झिम्मा फुगडी फेर धरू लागते, पाऊलीचा खेळ रंगतो...मनोरे उभे राहतात...
मोकळ्या जागेत वारकरी गोलाकार उभे राहतात त्यातून वाट काढत अश्व रिंगण सोहळ्या रंगतो "माऊलींचा अश्व" रिंगण पूर्ण करतो. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा, म्हणून ह्या अश्वांला "माऊलींचा अश्व" मानतात.  अश्व रिंगण डोळ्याचे पारणं फिटणारा नयनरम्य सोहळा "हाचि देही हाचि डोळा" प्रचिती म्हणजेच वारकऱ्यांची जन्मभराची शिदोरी.
नामदेव पायरीवर नतमस्तक होऊन तुका झालासे कळस म्हणुनी कळसाचे दर्शन घेऊन वारकरी परतीच्या वाटेकडे मार्गस्थ होतो.
वर्षभर वारकरी नित्याचे कर्म करीत असतो पण त्याला आस लागलेली असते भगवंताच्या भेटीची, आणि म्हणूच पाऊलं चालली,पंढरीची वाट सुखी संसार चा सोडुनीया कांस खरोखरी आहे.
वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेला आज खंड पडला, आणि वारकऱ्यांचा विठोबा  दिवेघाटात उभा राहून वारकऱ्यांची वाट पाहतच राहिला... वारी नाही की दिंडी नाही ....सगळं शांत... महाराष्ट्र शासनाने मोजक्याच वारकऱ्यांबरोबर "माऊलीच्या"  पादुका शासकीय नियमावलीचे पालन करून गोरगरिबांच्या लाडक्या लालपरीतून मोठ्या दिमाखात पंढरपुरात दर्शनासाठी आणल्या आहेत, पण या वर्षी वारीच, पालखीच दर्शन न घेतल्याच वाईट वाटतंय वारकऱ्यांना, पण त्यांनी घरातच राहूनच विठोबाचं मनोभावे दर्शन घेतलं.
का रे बा विठ्ठला, सांग पंढरीराय, काय चुकलं, लेकरांना पदरात घे, तुझ्या भक्तीसाठी भुकेलं आहे रे लेकरु, नाम तुझे घेता समाधान होई अशी वर्षोनुवर्षे अखंड सेवा केली देवा, कुठं चुकलं, सांग विठ्ठला...
पंढरीनाथा, तूच कर्ता तूच करविता, शरण तुला भगवंता !!
आज पर्यंत तूच समजून घेतले, तूच सांभाळून घेतले, तूच तारलंस, तूच आसरा दिलास, तूच वाट दाखवलीस, तुझ्या भक्तीच्या अथांग सागरात सामावून घेतलंस...
मायबापा ....काय चुकलं ...तुझ्या ठायी माथा ठेऊ दे आता...पदरात घे ...इतकेच मागणें आता...
माऊली तू जगाची...तुझ्या भक्तांसाठी धावून आलास होता की रे... अठ्ठावीस युगे भक्त पुंडलिकासाठी उभा राहिलास विटेवरी...कान्होपात्राला मंदिरात मानाची जागा दिली, नाम्याची खीर चाखली चोखोबांची गुरे राखली, पुरंदराचा परमात्मा, वाली दामाजीचा, परब्रम्ह हे भक्तासाठी मुके ठाकले भीमे काठी!!!
कळतंय आहे रे विठ्ठला... कंटाळून गेला असशील ना रे ??? कित्येक वर्षे भक्तांची गाऱ्हाणी कर कटावर ठेवोनिया ऐकत आलास ना ...
कितीतरी गोष्टी चुकत गेल्या रे ...तू बनवलेली सुंदर सृष्टीच नाहीशी करायला निघालो आम्ही, नैसर्गिक आपत्तीला आमंत्रण आम्हीच दिलं, नद्याची वाट अडवून, त्या बुजवून, वृक्षतोड करून, शहर वसवली, धरणीमातेच उत्खनन करत गेलो, निसर्गदेवतेचा विनाश करून प्रत्येक श्वासाची किंमत मोजत राहिलो, प्रत्येक गोष्टीत हव्यास भरला, तुझी शिकवण विसरत चाललो, माणसाने माणसासारखं वागणे तर दूर राहिलंच प्राणिमात्रांच्या जीवावर उठलो,
तुझ्या दर्शनाला सुद्धा निर्व्याज येऊ शकत नाही, सतत चे मागणें वाढतच गेले, भक्तीच्या दिखावा करत बुद्धीचा ऱ्हास करत राहिलो, सारं काही चुकत होतं, कळत होतं पण वळत नव्हतं....तुझं अस्तित्व नाकारू पाहत होतो पण .... तुझ्या दरबारात आम्ही कोण शुल्क....आले देवाजीच्या मना..
तेथे कोणाचे चालेना ....
"पांडुरंगा" तुझ्या चरणी साकडं घालितो, जगावर आलेल्या महामारीचे संकट टळू देगा देवा, वाट दिसू देगा देवा ......
हाक ऐक विठुराया... भेटी लागे जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी ।।
तुझ्या भेटीची आस लागली जशी कन्या सासुरासी जाये, मागे परतुनीय पाहे. तैसे झाले माझ्या जिवा...केंव्हा भेटशी केशवा !!
थकलेत डॉक्टर, सफाई कर्मचारी, सेवेकरी
दिनरात्र सेवा करोनि, पाश सगळे सोडोनि...
थांबव देवा आता हे सगळं... हाताला काम नाही, गाठीला पैसे नाही, कर्जाचे डोंगर डोक्यावर, बेकारीची टांगती तलवार सतत मानेवर, जीवाला घोर लागला, जीव कासावीस होतोय, लहान लेकरं शिक्षणास मुकली आहेत, मन खिन्न होतंय... सगळी चक्र थांबलीत रे देवा...
जेंव्हा सगळे मार्ग बंद होतात, तेव्हा तूच एकमेव आठवतोस...
मी तुला शोधत देऊळी, राऊळी फिरत राहिलो, तू तर चराचरात सामावला आहेस, अणू रेणू त व्यापला आहेस.
तू डॉक्टररूपात देव बनून दिवसरात्र झटत आहेस, सेवेकरी अखंड सेवा देत आहेत, सफाई कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करत आहेत...ह्यांच्या रुपात तुझे अस्तित्व जाणवतं देवा, तूच दर्शन दिधळस रे बा विठ्ठला!!!
पंढरीच्या विठुरायाला, आळंदीच्या माऊलींना, देहूच्या तुकोबांना, संत महंताना, वारीच्या वारकऱ्यांना, आषाढी एकादशी निमित्ताने शीरसाष्टांग नमस्कार !!!
!! बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज कि जय श्री ज्ञानेश्वर महाराज कि जय श्री तुकाराम महाराज कि जय !!
विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल !!!16 

Share


S
Written by
Sunita Balakrishnan

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad