Bluepad | Bluepad
Bluepad
सामाजिक आरोग्यासाठी राष्ट्रीय चिकित्सक दिन
Tanaya Godbole
Tanaya Godbole
1st Jul, 2020

Share


सामाजिक आरोग्यासाठी राष्ट्रीय चिकित्सक दिन

आजच्या काळात आई, वडील आणि गुरु यांच्यानंतर ज्यांच्यापुढे नतमस्तक व्हावं असं कोणी असेल तर ते असतात वैद्यकीय चिकित्सक अर्थात डॉक्टर. जोपर्यंत आपल्याला कोणता आजार होत नाही तोपर्यंत आपण डॉक्टर कडे जात नाही. तोपर्यंतची सर्व मदार आपल्या श्रद्धा स्थानांवर असते. मात्र एकदा का आजार झाला की देवाच्याही आधी आठवतात ते डॉक्टर. मृत्यूचं भय हे सर्वात मोठं भय असतं असं मानलं जातं आणि शारीरिक व्याधी ह्या आपल्याला त्याच मृत्युच्या जवळ घेऊन जात असतात. त्यापासून लांब आपल्याला कोण घेऊन जाऊ शकतील तर ते असतात डॉक्टर. संपूर्ण जगात वेगवेगळ्या दिवशी चिकित्सक दिन साजरा केला जातो. आपल्या देशात राष्ट्रीय चिकित्सक दिन साजरा करण्याची पद्धत १९९१ पासून सुरू आहे. हा दिवस चिकित्सेच्या क्षेत्रात अमोल योगदान देणारे, महात्मा गांधींच्या सविनय कायदेभंगात उडी घेऊन स्वातंत्र्य लढ्यात उतरलेले भारतरत्न डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या जन्मदिनी म्हणजेच १ जुलै रोजी साजरा केला जातो.

डॉ. रॉय यांचा जन्म बिहारच्या पटना जिल्ह्यातील बांकीपूर इथे १ जुलै १९९२ रोजी झाला. मूळचे बंगाली असलेले त्यांचे कुटुंब ब्रम्हसमाजी होते. त्यांचे वडील डेप्युटी मेजिस्ट्रेट होते. पण धार्मिक आणि दानशूर स्वभावाचे असल्यामुळे त्यांनी कधी धन संचय केला नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या कुटुंबात जन्म होऊनही डॉ. बिधान चंद्र रॉय यांना अभावात जीवन कंठावे लागत होते. त्यांनी कोलकात्यातून बी.ए, एम.डी.च्या पदव्या संपादन केल्या. त्यांनी शिष्यवृत्ती मिळवून आणि फावल्या वेळात रुग्णालयात नर्स म्हणून काम करून आपल्या शिक्षणाचा खर्च उचलला.
पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले पण विद्रोही वातावरणाच्या बंगाल मधून आलेले म्हणून त्यांचा अर्ज अनेकदा फेटाळला गेला. अखेर अनेक प्रयत्नांनंतर त्यांना प्रवेश मिळाला आणि त्यांनी तिथे एम.आर.सी.पी. आणि एफ.आर.सी.एस. ह्या परीक्षा पास केल्या. भारतात परतल्यावर त्यांनी स्वत:चा वैद्यकीय व्यवसाय तर सुरू केलाच शिवाय सरकारी रुग्णालयात सुद्धा सेवा केली. त्यावेळी पेटलेल्या स्वातंत्र्याच्या रण संग्रामात डॉ. रॉय सुद्धा उतरले. अल्पावधीतच त्यांनी बंगालच्या राजकरणात प्रमुख स्थान मिळवले. पण त्यांचा मूळ पिंड हा चिकित्सकाचा होता.

डॉ. रॉय यांच्या चिकित्सकीय सेवेमुळे त्यांना १९०९ मध्ये 'रॉयल सोसायटी ऑव मेडिसिन', १९२५ मध्ये 'रॉयल सोसायटी ऑफ ट्रोपिकल मेडिसिन' आणि १९४० मध्ये 'अमरीकन सोसायटी ऑफ चेस्ट फ़िजीशियन'ची फेलोशिप मिळाली. अशाचा प्रकारे त्यांनी चिकित्सेच्या विविध क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले. भारतातील काही महत्वाची रुग्णालये उभारण्यात सुद्धा डॉ. रॉय यांचा हात होता.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी त्यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर १९४८ मध्ये बंगालचे दुसरे मुख्यमंत्री बनले. अशा प्रकारे शारीरिक आणि सामाजिक चिकित्सेच्या व्यवसायात असणार्‍या डॉ. रॉय यांनी अविवाहित राहून आपले संपूर्ण आयुष्य समाजाला अर्पण केलं. त्यांच्या कार्याचा बहुमान करण्यासाठी १९६१ मध्ये त्यांना “भारतरत्न” देऊन गौरविण्यात आलं पण त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांच्या जन्म दिनीच म्हणजेच १ जुलै १९६२ रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या कार्याचा आदर्श चिकित्सकीय समुदायापुढे राहावा म्हणून दरवर्षी १ जुलै हा दिवस राष्ट्रीय चिकित्सक दिन म्हणून साजरा केला जातो.
आज आपण पाहत आहोत की साधारण वैद्यकीय सेवा फार महाग होत चालल्या आहेत. आजारी असणारा माणूस हा मुळात खंगलेला असतो आणि तो डॉक्टरची फी पाहून अधिकच वाळून जातो. याखेरीज प्रत्येक स्पेशलिस्ट डॉक्टरची फी त्यांच्या वाकुबाप्रमाणे वेगवेगळी असते. ह्याला आळा घालून एकच स्टँडर्ड फी असायला पाहिजे जेणेकरून कोणी मुद्दामहून जास्त पैसे अकरणार नाहीत.

याशिवाय आज उच्चशिक्षण घेतलेले डॉक्टर सामान्य रुग्णांची सेवा करण्यास तयार नसतात. त्यांना काही वर्ष सरकारी रुग्णालयात इंटर्नशिप करायची असते म्हणून ओढून ताणून ते करतात. मग एखाद्या मोठ्या खाजगी रुग्णालयात तरी प्रॅक्टिस करतात, स्वत:ची प्रॅक्टिस सुरू करतात किंवा सरळ परदेश गाठतात. शिवाय फारच कमी डॉक्टर खेडोपाड्यात जाऊन सेवा करण्यास उत्सुक असतात. आपण टीव्ही वर अनेक अशा डॉक्टरांच्या कहाण्या पाहतो ज्यांनी मोठमोठ्या पगाराच्या नोकर्‍या सोडून जनसेवा करण्यासाठी खेड्यात जाऊन राहिले आणि तिथल्या लोकांमधली व्यसन संपवून त्यांना एक चांगलं आणि सुदृढ आयुष्य दिलं. पण १३० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात अशी नि:स्पृह सेवा करणारे कमीच. इथे फक्त डॉक्टरांवर जबाबदारी टाकून चालणार नाही. आपल्या देशात रुग्ण अधिक आणि डॉक्टर कमी आहेत हे सत्य मान्य केलं तर डॉक्टर समुदायावर असलेला प्रचंड ताणही आपल्या लक्षात येईल. त्यामुळे आपल्याला काही मार्गदर्शन नाही केलं म्हणून सरळ डॉक्टर वर हल्ला करण्याचा निर्घृणपणा सामान्य जनतेनेही करू नये.

यासोबतच आज विज्ञानात प्रगति झाल्यामुळे काही जुन्याच चिकित्सा पद्धती नव्याने सामोर येत आहेत. त्यात अधिक संशोधन करून त्यांना समाजाच्या भल्यासाठी कसं वापरता येईल याचा विचार झाला पाहिजे. एका पद्धतीला दुसर्‍या पद्धतीच्या चिकित्सकांनी नावे न ठेवता त्यात जे चांगलं असेल त्याचा अंगीकार केला पाहिजे.

आजच्या ह्या राष्ट्रीय चिकित्सक दिनाचं औचित्य साधून सर्व चिकित्सा क्षेत्रातील लोकांनी समाजस्वास्थ्याचा निर्धार केला पाहिजे. आज कोरोना काळानंतरचा भारत आरोग्य पूर्ण होईल अशी आशा करूया.

14 

Share


Tanaya Godbole
Written by
Tanaya Godbole

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad