Bluepad | Bluepad
Bluepad
भारताची सुवर्णकन्या पद्मभूषण पी. व्ही. सिंधू
V
Vinisha Dhamankar
27th Mar, 2020

Share

वारसाहक्कात काय काय मिळतं ? संपत्ति, जमीन, घर, पैसा? एवढंच ? नाही. तुम्ही म्हणाल संस्कार ही मिळतात. पण संस्कार हे सभोवतालाकडून ही मिळतातच. मग वारसाहक्काने आणखी काय मिळतं तर ते आहेत डीएनए . काही गोष्टी ह्या तुमच्या रक्तातच असाव्या लागतात. पण आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर फक्त रक्तात डीएनए असून चालत नाही, तर प्रचंड मेहनतीला तिथेही पर्याय नसतो. आपण बोलतो आहोत पी. व्ही. सिंधु अर्थात पुसरला वेंकटा सिंधू हिच्याबद्दल. पी.व्ही. सिंधूबद्दल नव्याने काय सांगणार? बस्स... नाम ही काफी है, बरोबर ना? पण आपण जाणून घेणार आहोत त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्यांनी ह्या बॅडमिंटनपटूला “राजीव गांधी खेल रत्न” ते अगदी “पद्मभूषण” सारखे सर्वोच्च सन्मान मिळवून दिले.
सिंधूच्या डीएनएमध्येच खेळ आहे. तिचे वडील पी. व्ही. रामणा आणि आई पी. विजया हे दोघेही भारतीय रेल्वेमध्ये सिकंदराबादमध्ये नोकरी करत होते आणि दोघेही वॉलीबॉल खेळाडू होते. पी. व्ही. रामणा हे भारतीय वॉलीबॉल संघातही होते आणि त्यांच्या संघाने १९८६ साली सेऊल आशियाई खेळांमध्ये कांस्य पदक मिळवलं. पी. व्ही. रामणा यांच्या एकूणच कामगिरीसाठी त्यांना २००० साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सिंधूची मोठी बहीण दिव्या ही “नेटबॉल” खेळाडू आहे. पण सिंधूला वॉलीबॉल किंवा नेटबॉल यापैकी कोणत्याच खेळत रस नव्हता. तिने वयाच्या सहाव्या वर्षी म्हणजे २००१ साली ऑल इंडिया ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपचा विजेता पुलैला गोपीचंदचा बॅडमिंटनचा खेळ पहिला आणि ती त्या खेळाकडे ओढली गेली आणि आठव्या वर्षापासून तिने बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली.
इंडियन रेल्वेचे मेहबूब यांच्याकडे सिंधूने बॅडमिंटनचे प्राथमिक धडे गिरवले. यासाठी ती सिकंदराबादच्या सिग्नल इंजिनिअरिंग आणि टेलिकम्युनिकेशनच्या भारतीय रेल्वेच्या कोर्टवर सराव करायची.
सिंधूच्या डोळ्यात स्वप्नं तर मोठमोठी होती पण तिथवर पोहोचण्यासाठी एखाद्या अकॅडेमीत दाखल होणं आवश्यक होतं. वयाच्या केवळ नवव्या वर्षी ती हैदराबादला असणार्‍या पुलैला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडेमीमध्ये दाखल झाली तेंव्हा कोणालाही कल्पना नव्हती की पुढे जाऊन ती एवढं मोठं यश संपादन करू शकेल.
त्यावेळी म्हणजे २००८ पूर्वी पर्यन्त गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी गचीबावली स्टेडीयमच्या बाहेर भरायची. तिथे गोपीचंदच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र कुमार आणि दक्षिण कोरियन बॅडमिंटनपटू किम जी ह्युन हे प्रशिक्षण द्यायचे. सिंधू तेंव्हा बारीक सारीक होती आणि उंचीही बेताचीच होती. त्यामुळे ती तिच्याहून उंच आणि तगड्या खेळाडूंसमोर समोर टिकाव धरू शकत नव्हती. ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त मजबूत शरीर बनवण्याचा सराव करू लागली. जसजशी तिची ऊंची वाढू लागली तसतशी तिच्या खेळात कमालीची सुधारणा होऊ लागली.
गोपीचंद यांनी खास लक्ष देऊन तिच्या प्रत्येक दिवसाच्या सरावाला दोन सत्रात विभागलं होतं. सकाळी अडीच तास आणि संध्याकाळी तीन तास. बुधवार आणि शनिवारी अर्धा दिवस आणि रविवारी सुट्टी, असं तिचं वेळापत्रक बनवलं. तिने ही ते कसलीही तक्रार न करता पाळलं आणि त्याचं फलितही तिला लवकरच मिळालं.
१० वर्षे वयोगटा खालील ५ व्या अखिल भारतीय मानांकन स्पर्धेची ती विजेती ठरली. १३ वर्षे खालील वयोगटातील पुण्यात झालेल्या भारतीय मानांकन स्पर्धेची सब ज्युनिअर दुहेरीचं विजेतेपद तिने पटकावलं. ५१ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत १४ वर्षे वयोगटा खालील स्पर्धेत तिने पहिल्यांदा सुवर्णपदक जिंकलं. त्यानंतर सिंधूने मागे वळून पहिलं नाही.
सिंधूचा आलेख नेहमी चढताच राहिला. २००९ साली कोलंबोत झालेल्या आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये कांस्य, २०१० मध्ये इराण फज्र आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंजमध्ये रजत, २०१० मध्ये मेक्सिकोमध्ये झालेल्या ज्युनिअर वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप उपांत्यपूर्व फेरी पर्यन्त धडक, याच वर्षी झालेल्या उबर कपमध्ये भारतीय संघात समावेश असे अनेक पाडाव तिने आपल्या ज्युनिअर चॅम्पियनशिपच्या काळात पूर्ण केले.
२०१२ मध्ये सिंधूचा आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात प्रवेश झाला आणि तिने अनेक लहान मोठ्या स्पर्धा कधी जिंकत तर कधी हरत पूर्ण केल्या. याच वर्षी ती ऑलिंपिकमध्ये देखील खेळली पण उपांत्यपूर्व फेरीत तिला हार पत्करावी लागली. पण हीच वेळ होती जेंव्हा आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात सिंधूच्या नावाचा गवगवा होऊ लागला. २०१३ मध्ये तिने पहिल्यांदा ग्रँड प्रीक्समध्ये आपली रॅकेट पाजरली आणि सिंगापोरच्या गू जुआनला २१-१७, १७-२१, २१-१९ अशी झुंज देत मलेशियन खुल्या चॅम्पियनशिप वर आपलं नाव कोरलं.
८ ऑगस्ट २०१३ रोजी वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी दहावी मानांकीत ठरलेल्या सिंधूने आणखी एक इतिहास रचला. बीडब्ल्युएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चीनची दुसरी मानांकीत वेंग चीचीनला २१-१८, २१-१७ असं नमवून महिलांच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि महिलांच्या एकेरी स्पर्धेवर भारताचा ध्वज फडकावणारी पहिली महिला ठरली.
१ डिसेंबर २०१३ रोजी मकाऊमध्ये झालेल्या खुल्या ग्रँड प्रीक्स स्पर्धेत कॅनडाच्या मिशेल ली हिला २१-१५, २१-१२ असं ३७ मिनिटात नमवून सुवर्णपदक मिळवलं. यासाठी तिला भारत सरकारकडून ‘अर्जुन पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आलं. २०१४ साली कॉमनवेल्थ गेम्स मात्र ती जिंकू शकली नाही. पण याच वर्षी तिने एका मागे एक बीडब्ल्युएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकल्या. त्यानंतर तिला ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आलं.
दरम्यानच्या काळात सिंधूने आपली ताकत वाढवण्यावर भर दिला. १९ ते २५ ऑगस्ट 2019 दरम्यान स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळली जाणार होती आणि त्यासाठी सिंधूने श्रीकांत वर्मा माडेपल्ली यांच्याकडे धडे घ्यायला सुरुवात केली. एवढं यश आधीच आपल्या नावावर करूनही सिंधूने आपल्या व्यायामाची सुरुवात अशी केली जशी ती पहिलीच स्पर्धा खेळणार आहे. त्यासाठी ती आपल्या घरापासून तब्बल ६० किलोमीटरचा प्रवास करून श्रीकांत यांच्या सूचित्रा बॅडमिंटन अकॅडमीत जाऊ लागली. श्रीकांतनी तिच्या सामर्थ्यांवर लक्ष दिलं तेंव्हा कळलं की कितीही कठीण व्यायाम केला तरी सिंधूचं शरीर ३० सेकंदात पूर्ववत होतं, तिच्या हृदयाचे ठोके सामान्यपणे वाजू लागतात. ही बाब तिच्या आईवडिलांकडून मिळाली आहे जी फार कमी लोकांमध्ये असते. याशिवाय तिच्या काही कमजोर स्नायूवर व्यायाम केला. आणि त्याचा परिणाम तिचे स्मॅशेस सुधारण्यात झाला. अखेर तिने ह्या स्पर्धेत आपला झेंडा रोवला आणि हा विजय मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. याचाच सन्मान करण्यासाठी तिला २०२० मध्ये भारत सरकारच्या सर्वोच्च सन्मान ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आलं.
अवघ्या २५व्या वर्षी आभाळाएवढं यश मिळवणार्‍या पी. व्ही. सिंधूला या वर्षीच्या महिला दिनी बीबीसी तर्फे ‘इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर’ म्हणून गौरव करण्यात आला. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनमध्ये सिंधू आता तिसरी मानांकीत ठरली आहे. सिंधूच्या पुढील कारकिरदिस शुभेछा.

0 

Share


V
Written by
Vinisha Dhamankar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad