Bluepad | Bluepad
Bluepad
चला पिझ्झा बनवूया...
Tanaya Godbole
Tanaya Godbole
2nd May, 2020

Share

सर्व जगातील माणसात साम्य कशात दिसतं तर ते त्यांच्या मूलभूत गरजांमध्ये. आणि त्यातही खाण्यामध्ये अधिक.

चला पिझ्झा बनवूया...

माणूस आयुष्य भर राबतो तोच मुळी भाकरीच्या चंद्रासाठी. पण आपला चंद्र जसा एकच असून तो वेगवेगळ्या देशात वेगवेगळा दिसतो तसंच भाकरीचं आहे. आपण आपल्याकडे ज्याला पोळी, चपाती, भाकरी, रोटी आणि अशा विविध नावांनी संबोधतो तसंच इतर देशातील लोक ब्रेड ह्या पदार्थाला बाबा, बागेटी, चल्लाह, क्रम्पेटट, लाहोह, मात्झो अशा विविध नावाने ओळखलं जातं. त्यांच्या बनवण्याच्या पद्धती ही प्रदेशानुसार भिन्न आहेत. या सगळ्यांमध्ये इटलीचा पिझ्झा आज सर्व जगात लोकप्रिय ठरला आहे. त्यातील चीजच्या दुष्परिणामांविषयी सगळीकडे बोंब उठवली जात असली तरी फास्ट फूड ह्या प्रकारात मान्यता मिळवलेला हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच तोंडाला पाणी आणतो. ह्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, ते कोणते आहेत ते बघूया.

पिझ्झा बनवण्यासाठी आवश्यक असतो तो त्याचा बेस म्हणजेच पिझ्झा ब्रेड. हा एकदा का बनला की मग तुम्ही तो विविध प्रकारे सजवून त्याचा आस्वाद घेऊ शकता.

1. साधा पिझ्झा :
बेससाठी : मैदा (एका व्यक्तीला १ कप ), रवा, सुके यीस्ट, ऑलिव्ह तेल, थोडं मीठ, १ चमच साखर, अर्धा ग्लास थोडं कोमट पाणी.
कृती : कोमट पाण्यात साखर विरघळवून घ्या. त्यात १ चमच यीस्ट वरूनच भुरभुरून घ्या. दहा मिनिटांनी हे यीस्ट पाण्यात मिक्स झालेले असेल. मग त्यात मीठ, ऑलिव्ह तेल, मैदा घालून चांगलं मळून घ्या. कोरडं वाटल्यास थोडं थोडं पाणी घालून मळा. नंतर त्याचे २ गोळे बनवा आणि प्रत्येकाची जाडसर पोळी लाटा. दोन्ही पिझ्झा बेसना फॉर्कच्या सहाय्याने संपूर्ण पिझ्झाभर अंतराअंतराने भोक पडून घ्या. एका मोठ्या ओव्हन ट्रेवर बटर पेपर ठेऊन त्याला तेलाने ग्रिसिंग करून घ्या आणि त्यावर हे दोन्ही पिझ्झा ठेवा. हे दोन्ही १ तासभर ओल्या कपड्याने झाकून ठेवा. मग ओव्हन २०० डिग्री सेंटीग्रेड वर गरम करून त्यात तेवढ्याच तापमानावर ७ मिनिटे दोन्ही पिझ्झा भाजून घ्या. असे पिझ्झा बेस फ्रीजमध्ये ठेवल्यास ते ७ दिवस चांगले राहतात.

टॉपिंग्जसाठी : टोमेटो, कांदे, मिरपूड, ऑलिव्ह तेल, ऑरेगानो म्हणजेच सुकवलेली ओव्याच्या झाडाची पाने आणि मोझरीला चीज.

कृती : पातेल्यात तेल घालून त्यात कांदा लालसर आणि मऊ होईपर्यन्त परतून घ्या आणि त्यावर टोमेटो आणि मीठ घालून चांगलं मऊ करून घ्या. त्यावर ऑरेगानो घालून परतून घ्या. आवश्यकता वाटल्यास ते सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्या. हे मिश्रण पिझ्झावर पसरावा त्यावर मोझरीला पसरवा. हा पिझ्झा ओव्हन मध्ये ८ मिनिटे भाजा. नंतर बाहेर काढून त्याचे पिझ्झा कटरने तुकडे करून त्यावर हवा तो सॉस टाकून खा. यावर तुम्ही पेपरोनी टाकून सुद्धा टाकू शकता फक्त लक्षात असू द्या की पेपेरोनी पोर्क आणि बीफ पासून बनवलेले असते.

2. मल्टीग्रेन पिझ्झा :
पिझ्झा पीठ तयार करा: राजगिरा, नाचणी, बाजारी आणि सोयाबीन या सर्वांचे अर्धी वाटी पीठ, अर्धी वाटी गव्हाचे पीठ, ऑलिव्ह तेल आणि फ्लेक्स सीड (अळशीचे तेल) वरील प्रमाणेच मीठ टाकून हे एकत्र मळून घ्यावे. मळून झाल्यावर ते १ तास ओल्या कपड्याखाली झाकून ठेवावे.

सिमला मिरचीचा सॉस : लाल सिमला मिरची गॅस वर भाजून घ्यावी. पाण्यात घालून काळी झालेली साल काढून घ्यावी. ६ पाकळ्या लसणी सह ते मिक्सरमध्ये लावून घ्यावे.

पिठाच्या गोळ्यावर कॉर्न फ्लावर पसरवून तो हाताने दाबून पिझ्झाप्रमाणे गोल आकार द्यावा. त्यावर फॉर्कने भोकं पाडावीत. यावर तेलाचे ग्रिसिंग करावे. त्यावर सिमला मिरचीचा सॉस पसरावा आणि त्यावर मोझरीला चीज पसरावा. वरून कांद्याचे, सिमला मिरचीचे, बेबी कॉर्नचे काप किंवा आपल्याला हव्या त्या भाज्या, पनीर आणि लसणीचे तुकडे पसरावेत. हा पिझ्झा ओव्हनमध्ये २०० सेंटीग्रेड तापमानावर १५ मिनिटे भाजून घ्यावा. हा पिझ्झा अत्यंत पौष्टिक असतो.

3. चिकन पिझ्झा :
पिझ्झा बेस वरील प्रमाणे कोणत्याही पद्धतीने तयार करावा. दीड वाटी चिकन, अर्ध चमच हळद, मीठ, मिरपूड, १ लिंबू. हे सर्व एकत्र करावं आणि अर्धा तास तसंच ठेवावं. नंतर ते तेल न घालता शिजवून घ्यावं.

टॉपिंग्जसाठी : चिकन, हिरवी, लाल सिमला मिरची, पिझ्झा सॉस, मोझरीला चीज ऑलिव्ह.
पिझ्झा ट्रेवर पिझ्झा बेस ठेवून त्याला तेल लावावं. त्यावर पिझ्झा सॉस लावून मोझरीला चीज टाकावा. मग चिकांचे तुकडे, सिमला मिरचीचे आणि ओलिव्हचे काप टाकावेत. हा पिझ्झा ओव्हनमध्ये १८० सेंटीग्रेड तापमानावर १५ ते २० मिनिटे भाजून घ्यावा.

4. मार्गारीटा पिझ्झा :
पिझ्झा बेस वर टोमेटो सॉस, तुळशीची पाने आणि मोझरीला चीज टाकावे. वरून ऑलिव्ह तेल पसरवा हा पिझ्झा ओव्हनमध्ये १८० सेंटीग्रेड तापमानावर १५ ते २० मिनिटे भाजून घ्यावा.

5. यीस्ट आणि ओव्हन नाही तरी बनवा पिझ्झा :
पिझ्झा बेस : मैदा, १ टी स्पून बेकिंग पावडर आणि तेवढाच बेकिंग सोडा, अर्धी वाटी दही, मीठ आणि साखर. हे चांगलं मळून घ्या. तेल लावून एका ओल्या कपड्याखाली १ तास झाकून ठेवा. नंतर त्याचा पिझ्झा करून घ्या.

टॉपिंग्जसाठी : पाव वाटी दही, अर्धी वाटी बेसन, १ टी स्पून गरम मसाला, १ टे. स्पून मास्टर्ड ऑइल, लाल मसाला, एका लिंबाचा रस, २ चमच आलं लसणाची पेस्ट. हे सर्व एकत्र करा. २०० ग्राम पनीरचे तुकडे. १० टे १५ मॅरीनेट करा. नंतर एक भांडं गरम करून त्यात मॅरीनेट केले पनीर भाजी टाकल्या प्रमाणे टाकावेत. सर्व मसाला सुके पर्यन्त परतवा.

एका स्टीलच्या पिझ्झा प्लेट मध्ये पिझ्झा बेस ठेऊन त्याला टोमेटो सॉस लावा. त्यावर मोझरीला चीज, त्यावर पनीरचे तुकडे आणि काही भाज्या आणि पसरवा.

एका मोठ्या भांड्यात भरपूर मीठ घालून ते तापवून घ्या. मध्यभागी एक स्टीलची रिंग ठेवून त्यावर पिझ्झा ठेवून १५ मिनिटे भाजून घ्या. हा पिझ्झा फार कुरकुरीत आणि स्वादिष्ट लागतो.
विनिशा धमणकर

7 

Share


Tanaya Godbole
Written by
Tanaya Godbole

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad