Bluepad | Bluepad
Bluepad
नातिचरामि : कुंडलीपेक्षा ही शपथ महत्वाची
Anjela Pawar
Anjela Pawar
29th Jun, 2020

Shareनातिचरामि : कुंडलीपेक्षा ही शपथ महत्वाची

असं म्हटलं जातं की लग्नगाठ स्वर्गात मारली जाते आणि त्याची परिणीती पृथ्वीवर होते. हे खरं असेलही पण इथे प्रश्न पडतो की ज्यांची एका पेक्षा अनेक लग्न होतात त्यांच्या गाठी तरी किती मारलेल्या असतात? काही लोक तर ह्या गाठींचं गाठोडं घेऊनच जन्माला येत नाहीत ना?

असो, इथे मुद्दा हा आहे की ह्या ज्या काही गाठी मारल्या जातात त्या तुम्हाला कशा कळतात आणि तुम्ही नेमक्या त्याच व्यक्तीशी लग्न कराल हे तुम्हाला कोण सांगतं ? तर ज्योतिष शास्त्रानुसार त्या सापेक्ष व्यक्तीविषयी सांगते तुमची कुंडली. आता जरा कुंडली म्हणजे काय ते समजून घेऊया. कुंडली म्हणजे तुमच्या जन्माच्या वेळी असलेली ग्रह तारे आणि नक्षत्रांची स्थिती. अर्थात ही स्थिती सर्वांसाठी वेगवेगळी असते. अगदी जुळ्या भावंडांच्या जन्माच्या वेळी सुद्धा सेंकंदाच्या फरकाने नभोमंडलात बदल झाल्यामुळे त्या दोघांची किंवा तिघांची किंवा त्यापेक्षा जास्त बालकांच्या कुंडलीत ग्रह तारे आणि नक्षत्रांच्या जागा बदलतात. यामुळे प्रत्येक व्यक्तिचं आयुष्य वेगवेगळं असतं. इथपर्यंत ह्या कुंडलीचा स्वीकार आपण केवळ ज्योतिष शास्त्राचा एक भाग म्हणून करू शकतो. आपलं साधारण आयुष्य कसं असेल हे उत्सुकतेपोटी जाणून घेणं हे ही आपण स्वीकारू शकतो पण प्रश्न तिथे निर्माण होतो जिथे आपण ह्या कुंडलीला आपल्या आयुष्यावर वरचढ करून ठेवतो.

लोक कुंडलीचा उपयोग आपल्यासाठी कोणता रंग, कोणती तारीख, कोणतं क्षेत्र, कोणता जप एवढंच नाही तर कोणतं नाव योग्य असेल हे ठरवण्यासाठी करतात. ह्या गोष्टी ज्या मुलाच्या जन्मापासून सुरू होतात त्यांचं मध्यांतर त्याच्या लग्नाच्या वेळी होत असतं. आपल्या मुलाला किंवा मुलीला कसा वर किंवा वधू योग्य असेल हे कुंडली बघून ठरवलं जातं. अशा प्रकारे झालेली १०० टक्के लग्न ही खूप यशस्वी झाली आहेत याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसतानाही केवळ परंपरा म्हणून आणि “मनाचं समाधान” म्हणून कुंडली पहिली जाते. उलट अशी लग्ने सुद्धा मोडली आहेत आणि काही जोडपी असमाधानी राहिली आहेत.

आपण इतिहासात डोकावलं तर कळेल की अशी अनेक लग्नं आहेत जी दोन शाही राज घरण्यांना एकत्र आणण्यासाठी झाली होती. शिवाजी महाराजांची आठ लग्ने आणि अकबराचं जोधबाईशी झालेल्या आंतर धर्मीय विवाह आपल्याला माहीत आहेत. शिवाजी महाराजांचे विवाह कुंडली बघून खचितच झाली नव्हती. कारण स्वत:च्या मनगटाच्या जोरावर बलाढ्य औरंगजेबाला सळो की पळो करून सोडणार्‍या लढवय्याला आपल्या आयुष्याचे निर्णय ग्रहतार्‍यांच्या माध्यमातून करणं कधीच मान्य नव्हतं. अकबराचं ही तेच. आक्रमकांची पार्श्वभूमी असूनही त्याने भारतामध्ये धार्मिक तेढ उभी केली नाही. हेच कारण होतं की राजस्थानचे राजा भारमल यांनी एका राजकीय कराराच्या रूपाने आपली मुलगी जोधाचा विवाह अकबराशी करून दिला. असे अनेक विवाह आपल्याला इतिहासात दिसतात जे कुंडली न पाहता होऊनही अजरामर झाले आहेत.

आज अनेक तरुण तरुणी प्रेम विवाह करतात. आता प्रेम करताना तर कोणी कुंडली पहात नाहीत. पण यावर कुंडलीला अवास्तव महत्व देणार्‍या पालकांनी एक क्लृप्ती शोधून काढली आहे ती म्हणजे मुलामुलींची पसंती झालीच आहे तर त्यांची कुंडली जुळते आहे का ते पाहावं. अशा वेळी कुंडली जुळली तर त्या मुलामुलींचा जीव सुद्धा भांड्यात पडतो. पण जर नाही जुळली तर? डोन्ट वरी. आपल्या ज्योतिष शास्त्रात नागबळी, ग्रहशांती आणि मुलीच्या कोणत्या तरी घात स्थानात मंगळ असेल तर तिचा पहिला विवाह वडाच्या, पिंपळाच्या झाडाशी करून द्यावा. त्यामुळे वर मुलास मृत्युचे भय राहत नाही. म्हणजे मुलगा चिरंजीवी होतो का? नाही. मृत्यू प्रत्येकाचा होणारच आहे. पण या प्रकारामुळे मुलीला मात्र आयुष्यभर मांगलिक म्हणून हिणवण्याची मुभा तयार केली जाते. पण मुलगा आणि मुलगी दोघेही मांगलिक असतील तर तो मात्र उत्सवाचा विषय असतो. अजबच आहे.

कुंडली पाहताना कुंडलीतील किती गुण जुळले हे पहिलं जातं. कुंडलीमध्ये एकूण ३६ गुण असतात. त्यापैकी जास्तीत जास्त गुण जुळणं आवश्यक असतं. यामुळे कुंडली पाहून यशस्वी न झालेल्या लग्नंसंबंधी ज्योतिषी तर्क करतात की त्यांचे सर्व गुण जुळले नव्हते म्हणून त्यांच्या विवाहात अडथळे आले. मग हे अडथळे त्यांना आधीच दिसणं आवश्यक असतं. पण ते लग्नाच्या वेळी ह्या नकारात्मक गोष्टी सांगत नाहीत. कारण यजमानांना नाराज करून चालत नाही. कारण त्यांनीच काहीही करा आणि कुंडली जुळवा असं सांगितलेलं असतं. यात यजमानांचा तर्क असा की एकदा का लग्न झालं की सर्व काही सुरळीत होईल. मग सर्व काही सुरळीत होणं हे नवरा आणि बायको वरच अवलंबून असणार आहे तर मग कुंडलीचा उपद्व्याप हवाच कशाला?

आज अनेक मॅट्रीमोनियल साइट्स आहेत पण त्या सुद्धा आपली जाहिरात करताना “कुंडली जुळेलही पण एकमेकांचे स्वभाव कसे कळतील?” अशी करतात. यात त्यांना कुंडलीचा अंतर्भाव करण्याची गरज काय? विज्ञानाच्या क्षेत्रात करियर करणार्‍या मुलामुलींना असं कुंडलीच्या दावणीला बांधलं जातं हे बघून फार खेद वाटतो. आपला संसार आपल्या दोघांना मिळून सामंजस्याने करायचा आहे एवढी या दोघांना समज असेल तरच त्यांचा विवाह सुफल संपूर्ण होऊ शकतो. शेवटी या जोडप्याने लग्नविधीमध्ये घेतलेली “धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामि” ही शपथ विसरायची नसते.

36 

Share


Anjela Pawar
Written by
Anjela Pawar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad