Bluepadजनता कर्फ्यू’ला उत्तम प्रतिसाद, आरोग्यकर्मींनाही दिले धन्यवाद
Bluepad

जनता कर्फ्यू’ला उत्तम प्रतिसाद, आरोग्यकर्मींनाही दिले धन्यवाद

Amrut bhosale
Amrut bhosale
25th Mar, 2020

Share

कोरोनाने जगातील सर्वच देशांमधील लोकांच्या मनात धडकी भरवली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव हा भारतामध्ये आता तिसर्‍या टप्प्यात आल्यामुळे आता तो गुणाकारात वाढत जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. पूर्ण जगात कोरोना बधितांची संख्या ३,५८, ९३५ झाली आहे तर मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १५,४३३ झाली आहे. चांगली बातमी ही आहे की १,००,६५८ लोक बारे झाले आहेत. आपल्या देशात आज हा आकडा ४६७ झाला आहे तर मुंबईत ९५ रुग्ण आहेत. लेख लिहीत असताना हा डेटा उपलब्ध झाला तेंव्हा मुंबईत तिसरा तर देशात नववा रुग्ण दगावला असल्याचं कळलं.
आता केवळ काळजी घेणंच पुरेसं नाही तर लोकांनी शक्यतो घरातच थांबणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० मार्च २०२० रोजी जनतेला संबोधित करताना म्हटलं होतं. त्यांनी २२ मार्च २०२० रोजी घरातच स्वत:वर कर्फ्यू लावण्याचं आवाहन केलं. याला त्यांनी ‘जनता कर्फ्यू’ असं नामाभिदान दिलं होतं. ‘जनता कर्फ्यू’ चा अर्थही त्यांनी समजावून सांगितला होता की, “जनतेने स्वत:हून स्वत: घरातच राहणं.” हा कर्फ्यू सकाळी ७ ते रात्री ९ या वेळात असेल असं त्यांनी सांगितलं. त्यांनी यातून अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना वगळलं होतं. यात हॉस्पिटल, सरकारी वाहन आणि सरकारी कर्मचारी हे कामावर जाऊ शकतात असं सांगितलं. सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा सुरू राहतील त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं. त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली ती म्हणजे जर तुम्हाला खरंच देशाची सेवा करायची असेल तर तुम्ही आपआपल्या घरातच थांबा. कारण असं करून तुम्ही पसरत जाणार्‍या विषाणूला तशी संधीच देणार नाही आणि एक दिवस आपण ह्या जागतिक संकटावर निश्चितच मात करू.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितलं की, आपले आरोग्य कर्मचारी दिवस रात्र रुग्णांची सेवा करत आहेत. बाहेरून येणार्‍या लोकांची तपासणी करणं, त्यांना क्वारंटाईनचा शिक्का मरणं आणि त्यांना योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देणं अशी सर्व कामे ते करत आहे. जिथे कोविड १९ हा आजार झालेल्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत त्या रुग्णालयातील सर्व आरोग्य कर्मचारी मग ते डॉक्टर असतील, नर्सेस असतील, वॉर्ड बॉय असतील हे सर्व दिवस रात्र या रूग्णांच्या सान्निध्यात असतात. त्यांना आपण बाहेर पडून मदत करू शकत नाही किंवा त्यांना धन्यवाद देखील करू शकत नाही. त्यासाठी “जनता कर्फ्यू”च्या दिवशीच संध्याकाळी ५ वाजता देशातील आपण सर्व जनता आपआपल्या घराच्या दारात, खिडकीत, बाल्कनीत किंवा गच्चीवर येऊन एकाच वेळी टाळ्या, थाळ्या किंवा घंटी वाजवून या आरोग्यकर्मींसाठी कृतज्ञता व्यक्त करूया अशी विनंती त्यांनी देशवासीयांना केली.
२२ मार्च २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावरून जनता कर्फ्यूचा परिणाम देशभर दिसून आला. या दिवशी रविवार होता, त्यामुळे लोक कामानिमित्ताने देखील बाहेर पडणार नव्हते. पण मुंबई सारख्या शहराचा अनुभव असा आहे की रविवारी इतर दिवसांपेक्षा रस्त्यावर जास्त गर्दी असते. या दिवशी लोक आपल्या कुटुंबीयांना, मुलाबाळांना घेऊन बाजारात किंवा मॉलमध्ये नक्की जातात. रविवारी हॉटेल आणि पब्ज ओसंडून वाहत असतात. मात्र २२ मार्च रोजी जनतेने “जनता कर्फ्यू”चं मनापासून पालन केलं. रस्ते, मंदिरं, हॉटेल, मॉल सर्व काही ओस पडले होते. वृत्तवाहिन्यांचे प्रतिंनिधी मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, हैदराबाद, लखनऊ अशा अनेक मोक्याच्या ठिकाणांची दृश्य दाखवत होते. या सर्व जागांवर शुकशुकाट होता.
रस्त्यांवर गाड्या न धावल्यामुळे सर्व परिसर फार शांत होता. फक्त पक्षांचे आवाज वातावरणात घुमत होते. कोकिळेचा मंजुळ स्वर ही आल्हाददायक वातावरणात भर घालत होता. मनात विचार चमकून गेला की एक दिवस गाड्या न चालल्याने प्रदूषणाचा स्तर ही खूप कमी होईल. त्यामुळे महिन्यातून असा एक दिवस असावाच मग कोणता विषाणू असू दे किंवा नसू दे!
संध्याकाळी ५ वाजण्याची लोक वाट पाहत होते. कारण पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे सर्व जनतेला आपल्यासाठी अहोरात्र झटणार्‍या आरोग्यकर्मींसाठी कृतज्ञता व्यक्त करायची होती. पण काही लोकांना धीर धरवला नाही. ५ ला १० मिनिटं असल्यापासूनच लोक थाळ्या बडवू लागले होते. सकाळपासून असलेली शांतता क्षणार्धात भंग पावली होती. सकाळपासून निवांत बसलेले कुत्रे अचानक येत असलेले आवाज ऐकून बिथरून गेले होते आणि ते भुंकत होते. मी ही माझ्या घरच्या खिडकीत येऊन टाळ्या वाजवल्या आणि आरोग्यकर्मींसाठी कृतज्ञता व्यक्त केली. १० – १५ मिनिटांनी बाहेरचा आवाज थांबला आणि पुन्हा एकदा सर्व शांत झालं. पण त्यानंतर फेसबुक आणि ट्विटर वरचे नोटिफिकेशन सुरू झाले आणि त्यावर काही अति उत्साही लोकांनी पंतप्रधानांच्या उद्देशाचा कसा बट्याबोळ केला याविषयीच्या पोस्ट येऊ लागल्या.
बातम्यांमध्ये काही चांगल्या तर काही उद्वेगजनक बातम्या होत्या. काही शहरांमध्ये कर्फ्यूचे सर्व नियम उल्लंघून लोक ढोल ताशे घेऊन लोक रस्त्यावर उतरले होते. हातात मिळेल ती वस्तु वाजवत होते. ही कृतज्ञता होती की जल्लोष होता हे काही कळलं नाही. त्यात अमिताभ बच्चन आणि शरद पवार यांनी सहपरिवार टाळ्या वाजवून, तर देशभरातील बहुतेक सर्वच लोकांनी आपल्या बाल्कनीत, खिडकीत टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त केली ह्या बातम्या सुखावह होत्या.
एकंदरीत हा जनता कर्फ्यू यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही.

2 

Share


Amrut bhosale
Written by
Amrut bhosale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad