Bluepadऋषी कपूर – दौलत, शोहरत आणि खंत बाळगून अभिनय जगलेला अकबर
Bluepad

ऋषी कपूर – दौलत, शोहरत आणि खंत बाळगून अभिनय जगलेला अकबर

Kiran Bhosale
Kiran Bhosale
29th Nov, 2021

Share“डोले शोले बनाने से कोई अभिनेता नहीं बनता” काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये ‘तुम्ही नवीन कलाकारांना अभिनयाच्या बाबतीत कोणता सल्ला देऊ इच्छिता?’ या प्रश्नावर असं उत्तर ऋषी कपूर यांनी दिलं होतं. “फक्त पिळदार शरीराच्या जोरावर कोणी अभिनेता होत नाही. एक उत्तम अभिनेता होण्यासाठी आधी अभिनय कसा करतात? हे शिकावे लागते. त्याचा सातत्याने सराव करावा लागतो. परंतु आताचे बहुतांश कलाकार केवळ पिळदार शरीर कमावण्यासाठी मोठमोठ्या जिममध्ये मेहनत करताना दिसतात. जर त्यांनी जिममधील थोडा वेळ आपल्या अभिनयासाठी खर्च केला, तर ते इतिहास घडवू शकतील. त्यांचे नाव देशातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम कलाकारांमध्ये घेतले जाईल. परंतु त्यासाठी त्यांनी आपले लक्ष बॉडिबिल्डिंगच्या दिशेने नव्हे तर अभिनयाच्या दिशेने केंद्रित करणे गरजेचे आहे.” असा सल्ला त्यांनी इरफान खानकडे इशारा करत तर दिला नव्हता ना? की, हा बघा, ह्याला म्हणतात अभिनेता.

असो. एखाद्या क्षेत्राचं अतोनात नुकसान होणं, पोकळी निर्माण होणं म्हणजे काय हे कालपासून आपण अनुभवत आहोत. ऋषि कपूर आणि इरफान खान या दोघांनीही सिनेमा जगतात बरंच काम करून ठेवलं आहे पण आज कोविड १९ चा प्रकोप शांत झाल्यानंतर चित्रपट सृष्टीला ऊर्जा देऊ शकतील असे तगडे स्तंभ असे मध्येच कोसळल्याने ही मरगळ आणखी अधिक कळवंडली आहे. ऋषी कपूर यांनी ३० एप्रिल २०२० रोजी सकाळी ८.४५ वाजता अखेरचा श्वास घेतला. चरित्र भूमिकांच्या शिलेदारांचं, असीम मानवतेचा नेहमी पुरस्कार करणार्‍या अभिनायकांचं असं एकाएकी जाणं ही खरी पोकळी आहे.
इरफान पेक्षा वयाने मोठे असलेले कलाकार जेंव्हा अजूनही नव तरुणांची भूमिका करत असतात तिथे त्याने ‘इंग्लिश मिडियम’ या चित्रपटात चक्क २० वर्षाच्या मुलीच्या बापाची भूमिका केली. ऋषि कपूर यांच्यावर देखील थोराड हीरो म्हणून टीका झाल्या. पण नवीन हिरोईन्स सोबत काम करण्यासाठी जेंव्हा कोणताच हीरो तयार होत नव्हता तेंव्हा ऋषि कपूर त्या भूमिका करत होते. चाँदनी, नागिन, हीना, बोल राधा बोल, दिवाना, दामिनी ही त्याची काही महत्वाची उदाहरणे.

ऋषि कपूर खरंच संकट मोचक होते की काय कोण जाणे. ऋषि कपूर यांच्या कारकिर्दीची ‘श्री ४२०’ मध्ये पावसात भिजणार्‍या लहानग्या मुलाच्या भूमिकेने झाली होती पण व्यावसायिक सुरुवात ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटाने झाली. या सिनेमात राज कपूर यांच्या लहानपणीची भूमिका ऋषि यांनी साकारली होती. ‘मेरा नाम जोकर’ या सिनेमासाठी राज कपूर यांनी त्यांचं सर्वस्व पणाला लावलं होतं. याची निर्मिती करण्यासाठी त्यांनी अक्षरशः आर. के. स्टुडिओही गहाण ठेवला होता. मात्र इतकं सगळं होऊनही सिनेमा तिकिटबारीवर आपटला. समीक्षकांनी धोपटला. १९७० मध्ये आलेला हा पहिला हिंदी सिनेमा होता ज्यामध्ये दोन मध्यांतर होते. त्यानंतर हा सिनेमा राज कपूर यांनी रशियामध्ये  प्रदर्शित केला. तिथल्या लोकांना तो आवडला पण इथे अतोनात नुकसान झालं होतं. यानंतर १९७३ मध्ये त्यांनी ऋषि आणि डिंपल यांना घेऊन ‘बॉबी’ हा चित्रपट केला आणि बॉलीवूडची चॉकलेट हिरोची परंपरा सुरू झाली. या चित्रपटाने त्या काळात ३० कोटी रुपयांची कमाई केली आणि तो आजही तितकाच लोकप्रिय आहे.

ऋषी कपूर यांनी गेल्या काही काळापासून वेगवेगळ्या भूमिका स्वीकारल्या. या काळात अशा भूमिका करण्याची संधी मिळत आहे, याचा त्यांना आनंद वाटायचा. पूर्वीच्या काळी प्रत्येक अभिनेत्याला हरवणे-सापडणे किंवा श्रीमंत-गरिब यांची प्रेम कहाणी असलेले तीन-चार सिनेमे मिळायचे. पण त्यावेळी ऋषिकेश मुखर्जी आणि गुलजार या वेगळे सिनेमे बनवणार्‍यांच्यासोबत काम करण्याची संधी कधीच मिळाली नाही, याची खंत त्यांना होती. दौलत, शोहरत सगळं काही असलेल्या ह्या अकबराला हे शल्य घेऊन जगावं लागलं. त्यांनी आपल्या आयुष्याचा सर्व लेखाजोखा आपल्या “खुल्लमखुल्ला” ह्या आत्मचरित्रात लिहिला आहे.

ऋषी कपूर यांची आणखी एक ओळख म्हणजे स्पष्टवक्तेपणा. अलीकडेच त्यांनी लॉकडाउनच्या काळात महसूल मिळवण्यासाठी दारू विक्री सुरू करावी म्हणून ट्विट केलं होतं. यावर उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ते राजकारणात सक्रिय नसले तरी समाजातील अपप्रवृत्तींवर बोट ठेवायला त्यांनी कधी मागे पुढे पहिलं नाही. राज कपूर सारख्या दिग्गजाचा मुलगा असूनही आणि 'बॉबी' सारखा सुपरडुपर हिट सिनेमा दिल्यानंतरही बॉलिवूडमध्ये जम बसवणं सोपं नव्हतं. रुपेरी पडद्यावर राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांची जादू असताना अभिनेता म्हणून यश मिळवणं कठिण होतं. रोमँटिक हीरो असूनही बिग बींसारख्या 'अँग्री यंग मॅन'समोर ऋषि उभे राहू शकले ते केवळ कसदार अभिनयामुळे. ऋषी कपूर यांच्या प्रवासात त्यांना मोलाची साथ लाभली ती नीतू कपूरची. आणि आता त्यांचा मुलगा रणबीर कपूर त्यांच्या खानदानाचा वारसा पुढे चालवतो आहे. आजारातून बरे होऊन ऋषि हितेश भाटीया यांच्या दिग्दर्शनातील ‘शर्माजी नमकीन’ हा चित्रपट करणार होते. मुख्य म्हणजे या चित्रपटात त्यांची सह कलाकार जूही चावला असणार होती.

ऋषी कपूर यांना ल्युकेमिया नावाचा कॅन्सर झाला होता. त्यांना दोन वर्षांपूर्वी कॅन्सर झाल्याचे निदान झालं होतं. यानंतर ऋषी आणि नीतू तातडीनं अमेरिकेकडे रवाना झाले होते. येथे त्यांच्यावर जवळपास एक वर्ष उपचार सुरू होते. त्यांच्यावर बोन मॅरो प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया देखील पार पडली होती. त्या नंतर ते थोडे बरे झाले होते. श्वासोच्छवासाला त्रास होऊ लागल्याने मुंबईतील एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात बुधवारी २९ एप्रिल २०२० रोजी त्यांना दाखल करण्यात आलं होतं. अखेर त्यांनी ३० एप्रिल २०२० रोजी सकाळी ८.४५ वाजता अखेरचा श्वास घेतला. अखेरच्या क्षणी त्यांच्याजवळ त्यांची पत्नी नीतू सिंग आणि मुलगा रणवीर उपस्थित होता. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.... ओम शांती ओम....

29 

Share


Kiran Bhosale
Written by
Kiran Bhosale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad