Bluepadपतंजलीचे कोरोनावरील औषध वादग्रस्त
Bluepad

पतंजलीचे कोरोनावरील औषध वादग्रस्त

J
Jaimala Pawar
27th Jun, 2020

Share
कोरोना ह्या नॉवेल विषाणूची दहशत जेंव्हापासून जगभरात सुरू झाली आहे तेंव्हा सुरूवातीला ह्या विषाणूपासून होणार्‍या आजारावर म्हणजेच कोविड – १९ वर एकच ठराविक औषध अस्तीत्वात नव्हतं. कोणतंही औषध शोधण्यासाठी त्या त्या विषाणूच्या आजाराची नेमकी लक्षणे काय आहेत, तो शरीरातील नेमक्या कोणत्या भागावर हल्ला करतो आणि त्याचे म्युटेशनचे प्रकार आणि कालावधी काय आहे हे समजण्यासाठी काही कालावधी जावा लागतो. अर्थातच काही लोक आजारी पडल्याशिवाय हा सगळा अभ्यास केला जाऊ शकत नाही. हा विषाणू समजण्यासाठी सुद्धा जगाला वेळ लागला आणि त्याची कारणे आपण सर्व जाणतो. या सर्व परिस्थितीत ह्या विषाणूने ग्रासलेल्या रूग्णांच्या लक्षणांवर इलाज करण्यासाठी त्या वेळी उपलब्ध असलेली औषधंच वापरली गेली. मग यात भारतात वापरलं गेलेले हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन असेल जे मलेरिया आणि संधीवातावर उपचार करण्यासाठी वापरलं जातं. हे औषध फूड अँड ड्रग अथॉरिटीची मान्यता प्रप्त आहे. अमेरिकेतील रुग्णांवर उपचार करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी हे औषध भारताकडून मागून घेतले. यासोबतच चीनमध्ये फॅविलावीऱ ह्या औषधाचा वापर केला जात आहे. जगभरात अजुनही अनेक देशात अनेक औषध कंपन्या यावर शोध आणि क्लिनिकल ट्रायल करीत आहेत. असं असताना भारतात कोरोना वर औषध बनवल्याचा दावा पतंजली चे सर्वेसर्वा आणि योगगुरु बाबा रामदेव यांनी केला आहे. त्यांनी “कोरोनील” आणि “स्वसारी” नावाची औषधं तयार केल्याचा दावा केला आहे.

कोणत्याही औषध निर्मितीचे आणि ते लोकांसाठी उपलब्ध करून देण्याचे काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियम असतात. त्या नियमावलीतील सर्व नियमांना अवहेरून बाबा रामदेव आणि त्यांच्या चमूने २३ जून २०२० रोजी दुपारी एक वाजता एक प्रेस कॉन्फ्रेंस घेऊन त्यात त्यांनी “कोरोनील” आणि “स्वसारी” ही कोरोना विषाणू वर औषधे निर्माण केली असल्याचे जाहीर केले. ह्यात त्यांनी ३ दिवस औषध घेतल्याने ६९ टक्के तर ७ दिवस औषध घेतल्याने रुग्ण १०० टक्के बरा होतो असा दावा केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी याची किंमत ५४५ रुपये असल्याचंही यावेळी सांगितलं. विशेष म्हणजे ह्या प्रेस कॉन्फ्रेंसचं सर्व वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण सुरू होतं. पण याची कल्पना आयुष मंत्रालयाला नव्हती. वाहिन्यांवर सुरू असलेल्या कार्यक्रमामुळे आयुष मंत्रालयाला या विषयी कळलं आणि त्यांनी त्याच वेळी पतंजली कडून याविषयीची माहिती पाठवण्याची मागणी केली. बातमी पसरली तशी राजस्थान सरकारने जाहीर केलं की ते राजस्थानमध्ये हे औषध विकू देण्याची परवानगी देणार नाही. यानंतर महाराष्ट्र सरकारने देखील अशीच भूमिका घेतली. आयुष मंत्रालयानेच यावर बंदी आणल्या नंतर आता हे औषध देशात कुठेही विकता येणार नाहीये.


प्रश्न हा येतो की आयुर्वेदात कोरोनावर औषध आहे आणि त्यावर आम्ही क्लिनिकल ट्रायल करीत आहोत असं यापूर्वी सांगणार्‍या पतंजलीच्या ह्या ट्रायल्स संबंधी सुद्धा कोणाला काहीच कसं कळलं नाही? त्यांनी कुठे आणि कधी क्लिनिकल ट्रायल्स केल्या याविषयी आयुष मंत्रालय किंवा इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चला सुद्धा काहीच कल्पना कशी दिली नाही? आज आयुष मंत्रालय त्यांच्या संपूर्ण संशोधन आणि क्लिनिकल ट्रायलचे डिटेल्स मागत आहे, असं का? याशिवाय या प्रकरणातील व्हीसल ब्लोअर दिनेश ठाकुर यांनी म्हटलं आहे की ह्या औषधांची नोंद सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशन मध्ये सुद्धा केली गेली नाही.
पतंजली रिसर्च फाउंडेशन ट्रस्टच्या बाबा रामदेव यांचे बिझिनेस पार्टनर स्वामी बाळकृष्ण यांनी प्रसार माध्यमांवर येऊन थोडं “मिस कम्युनिकेशन” झालं असल्याचं सांगितलं. आणि म्हणे आम्ही आता आयसीएमआर आणि आयुष मंत्रालयाला सर्व माहिती पाठवली आहे. पण या आधीच त्यांनी प्रेस कॉन्फ्रेंस घेऊन जाहिरात सुद्धा सुरू केली होती. हे ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज (आपत्तिजनक जाहिराती) १९५४ ह्या कायद्याच्या विपरीत आहे.

पतंजली रिसर्च फाउंडेशन ट्रस्टने पाठवलेल्या माहितीमध्ये म्हटलं आहे की त्यांनी कमी लक्षणं असणार्‍या १२० रुग्णांवर क्लिनिकल टेस्ट केल्या ज्यात १५ ते ८० वयोगटातील स्त्री पुरुष होते. जयपूरच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्चमध्ये ह्या टेस्ट करण्यात आल्या आणि यासाठी त्यांना दोन महिन्यांचा वेळ लागल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ह्या माहितीमध्ये अन्य ही आक्षेपार्ह बाबी आहेत ज्या काही वर्तमान पत्रांनी प्रसिद्ध केल्या आहेत. इथे हे पाहणं महत्वाचं ठरेल की जयपूरमध्ये टेस्ट होऊन सुद्धा सर्वात आधी राजस्थानने या औषधांवर बंदी आणली आहे.

या माहितीमध्ये म्हटलं आहे की, “ह्या औषधात त्यांनी अश्वगंधा, गिलोय आणि तुळस यांचा उपयोग केला आहे. ही औषधे विषाणूच्या हल्ल्यामुळे तयार झालेल्या सायटोकाईन स्टोर्मला अटकाव करून शरीराच्या लढाऊ पेशी वाढवून त्याचा संसर्ग कमी करतात.” याचा अर्थ हे औषध विषाणूला पुर्णपणे मारणारं नाही इम्युनिटी बूस्टर म्हणून जी औषधं सध्या बाजारात उपलब्ध आहेत त्यातीलच एक आहे की काय असं वाटत आहे. आता जोपर्यंत आयुष मंत्रालय आणि इतर औषध नियंत्रण माध्यमांकडून हिरवा कंदील मिळत नाही तोपर्यंत कोरोनील आणि स्वसारी डबाबंदच राहतील एवढं नक्की.

18 

Share


J
Written by
Jaimala Pawar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad