Bluepadमलाला : विरोधास न जुमानता लढणारी वाघिण
Bluepad

मलाला : विरोधास न जुमानता लढणारी वाघिण

S
Shubham Yadav
26th Jun, 2020

Share“शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे शब्द पाकिस्तानातील एका वाघिणीने खरे करून दाखवले आहेत. ती वाघिण आहे मलाला यूसुफजई. सर्व मुलींना शिक्षण मिळावं ह्या अपेक्षेने आपलं काम सुरू केलेल्या मलालास लहान वयातच अनेक संघर्षांना सामोरं जावं लागलं. त्या सर्व संघर्षांना तोंड देत आज मलालाने ब्रिटनमधील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित अशा ऑक्सफोर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी मिळविली आहे. मलालाने पदवी मिळाल्याचा आनंद विद्यापीठात आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत साजरा केला. याची माहिती तिने सोशल मीडियावर शेअर करत दिली आहे.

आपल्या नेत्रदीपक कामगिरीमुळे अवघ्या १५ व्या वर्षी तालिबान्यांच्या रोषाला सामोरे जाणार्‍या मलालाची हत्या करण्याचा मनसुबा तालिबान्यांनी रचला आणि छोट्या मलाला वर तीन गोळ्या झाडल्या. तो दिवस होता ९ ऑक्टोबर २०१२. मलाला तेंव्हा आठवीत शिकत होती. ती बस मधून शाळेत जात असताना हा हल्ला झाला त्यात तिच्या सोबत तिच्या दोन मैत्रिणी केनत रियाज आणि शाझिया रमजान ह्या देखील जखमी झाल्या. मलालास लागलेली गोळी तिच्या डोळ्यात घुसून तिच्या कोर्नियाचा भेद करत तिच्या मणक्याच्या वर जाऊन बसली होती. तिच्या वर पेशावर येथील लष्करी रुग्णालयात उपचार करण्यात आले. पाच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर तिच्या मणक्यात अडकलेली गोळी काढण्यात डॉक्टरांना यश आले पण त्यांना तिच्या मेंदूचा एक भाग काढून टाकावा लागला. पण तेवढे पुरेसे नव्हते. बंदुकीच्या गोळीमुळे डोक्याला अनेक ठिकाणी खोल जखमा झाल्या होत्या. त्यासाठी पाकिस्तान सरकारच्या सांगण्यावरून तिला इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरात जवानांवर उपचार करणार्‍या क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. ह्या जीवघेण्या हल्ल्यामधून बचावलेली मलाला आगीतून निघालेल्या हिर्‍याप्रमाणे आणखीनच लखलखू लागली. तिने स्त्री शिक्षणासाठी आपला लढा चालू ठेवण्याचे जाहीर करून टकले.

१२ जुलै १९९७ रोजी पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम खैबर पख्तुनखवा प्रांताच्या स्वात जिल्ह्यातील मंगोरा येथे जन्मलेल्या मलालाचे वडील जियाउद्दीन युसुफझाई हे एक कवी आहेत शिवाय ते स्वत: शैक्षणिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या एका मुलाच्या नावे मंगोरा इथे ‘खुशाल पब्लिक स्कूल’ सुद्धा ते चालवतात. मलालास लहानपणापासून डॉक्टर होण्याची इच्छा होती पण तिच्या वडिलांनी तिला त्याऐवजी राजकारणी होण्यासाठी प्रोत्साहित केले. कदाचित त्यांना पाकिस्तानला चांगली मूल्ये असणार्‍या धडाडीच्या राजकारण्याची गरज आहे असं वाटलं असावं. अशा वडिलांच्या आणि आई तोर पेकाई यांच्या पाठिंब्यामुळेच ती पाकिस्तानातील स्त्रिया, मुली आणि इतर पीडितांच्या शिक्षणासाठी काम करू लागली. तालिबान्यांनी त्यावेळी मुली आणि स्त्रियांचे शिक्षण बंद केले होते. २००८ मध्ये मलालाच्या वडिलांनी तिला शिक्षण हक्कांविषयी बोलण्यास प्रेरित केलं. त्यासाठी केवळ ११ वर्षाच्या छोट्या मलालास घेऊन पेशावर मधील स्थानिक प्रेस क्लबमध्ये घेऊन गेले. इथे "ह्या तालिबान्यांची माझा शिक्षणाचा मुलभूत अधिकार काढून घेण्याची हिंमत होतेच कशी?" ह्या विषयावर मलाला कडाडून बोलली. याची दाखल प्रदेशातील वर्तमानपत्रांनी आणि प्रसार माध्यमांच्या वाहिन्यांनी घेतली. या माध्यमातून तिची ख्याती देशभर पसरली आणि तिला अनेक संस्थांकडून मार्गदर्शनासाठी पाचारण करण्यात येऊ लागलं. २००९ मध्ये ती पाकिस्तानच्या “इन्स्टिट्यूट फॉर वॉर ॲड पीस” ह्या संस्थेच्या 'ओपन माइंड्स' ह्या कार्यक्रमात भाग घेऊ लागली ज्यात पाकिस्तानातील युवक सामाजिक समस्यांवर चर्चा आणि वादविवाद करतात.

याच दरम्यान “गूल मकई” ह्या नावाने मलाला बीबीसी ऊर्दूच्या ब्लॉग वर एक डायरी लिहू लागली ज्यात ती तालिबान्यांच्या कुकृत्यांचं वर्णन करीत असे. यात ती तालिबान्यांनी कशाप्रकारे स्वात खोर्‍यातील जनतेला आपल्या दहशतीने दाबून ठेवलं आहे, स्त्रियांना शाळेत जाण्यास मनाई करण्यात आली, त्यांना टीव्ही पाहायला आणि खुल्या मैदानात खेळण्यावर बंदी आणली आहे हे सांगत असे. तिच्या ह्या लिखाणाने स्वात खोर्‍यापासून दूर असलेल्या जगाला एका अगतिक समाजाची आणि तालिबान्यांच्या भेसूर चेहर्‍याची ओळख होऊ लागली होती. शिवाय पख्तून लोकांच्या मनात देखील तालिबान्यांविषयी घृणा निर्माण होत होती ज्यांचे अत्याचार ते २००७ पासून सहन करीत होते.

मलालाच्या ह्या पुढाकारासाठी २०११ साली तिला पाकिस्तानचा राष्ट्रीय युवा शांती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मलालाची हीच ख्याती तालिबान्यांच्या डोळ्यात सलत होती. आणि ते तिला तिचं काम थांबवण्याच्या धमक्या त्यांच्या पत्रकांच्या मार्फत देऊ लागले. तिच्या जीवाला धोका असताना ही तिने तिचं काम सुरूच ठेवलं. आणि ९ ऑक्टोबर २०१२ रोजी भेकड तालिबान्यांनी तिच्यावर निशाणा साधला. तोपर्यंत ती एक आंतरराष्ट्रीय फिगर बनली होती. ह्या हल्ल्यानंतर उलट तालिबान्यांनाच पळता भुई थोडी झाली.

१० ऑक्टोबर २०१४ रोजी मलालाला नोबेल शांतता पारितोषिक मिळाल्याचे जाहीर करण्यात आलं. हे पारितोषिक तिला भारताच्या कैलाश सत्यार्थीसोबत विभागून दिलं गेलं. वयाच्या १७व्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळवणारी मलाला ही आजवरची सर्वात तरूण नोबेल पारितोषिक विजेती आहे. ‘आय एम मलाला : द गर्ल हू स्टुड अप फॉर एज्युकेशन अँड वॉज शॉट बाय द तालिबान’ हे आठवणींचं पुस्तक ख्रिस्तिना लँब यांच्यासह लिहिले आहे. तब्बल ३० पुरस्कारांची मानकरी ठरलेली मलाला वयाच्या तेवीसाव्या वर्षीच समाजातील अराजकतेला जगासमोर मांडण्यासाठी उत्सुक असणार्‍या प्रत्येकासाठी एक आदर्श ठरली आहे. “एक स्त्री शिकली की सर्व समाज सुशिक्षित बनतों,” असं म्हणणार्‍या ज्योतिबा फुलेंचाच वारसा जणू पुढे चालवणारी मलाला सुद्धा म्हणते, “ज्यांना शिकलेल्या स्त्रीची भीती वाटते. त्यांना ज्ञानाच्या शक्तीची भीती वाटत असते.” ज्ञानाची शक्ती ही अशी वृद्धिंगत होणारी आहे. १२ जुलै रोजी आपल्या वयाच्या निव्वळ चोवीशीत प्रवेश करणार्‍या मलालास आपला लढा आणखी विस्तारण्यासाठी बळ मिळो हीच शुभेच्छा.

21 

Share


S
Written by
Shubham Yadav

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad