Bluepadमहाराष्ट्र दिन... कष्टकर्‍यांच्या विजयाचा दिवस
Bluepad

महाराष्ट्र दिन... कष्टकर्‍यांच्या विजयाचा दिवस

S
Siddharth Deshmukh
1st May, 2020

Shareकणखर देशा,पवित्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा……

आज देशात कोरोनाने हैदोस घातला असताना संपूर्ण देशाला दिशा देण्याचं काम महाराष्ट्र राज्य करीत आहे. महाराष्ट्राने हे कर्तव्य थेट शिव काळापासून बजावलं आहे. म्हणूनच आपण अभिमानाने म्हणतो ‘दिल्लीचे ही तख्त रखतो महाराष्ट्र माझा’. अशा ह्या माझ्या महाराष्ट्राची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली, आज महाराष्ट्र ‘साठी’ पूर्ण करीत आहे. पण ही निर्मिती सहज साध्य झाली नाही. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून इथे संघर्ष पेटला होता. १०५ जणांनी आपल्या प्राणांची आहुति दिली. तेंव्हा कुठे हे राज्य उभं राहिलं. १ मे हा महाराष्ट्र दिन असला तरी तो जागतिक कामगार दिन सुद्धा आहे. आणि नोंद करावी अशी बाब म्हणजे महाराष्ट्राच्या निर्मितीत ज्यांनी फार मोठं योगदान दिलं ते गिरणी कामगार आणि शेतमजूरच होते. महाराष्ट्र दिनासोबतच आंतरराष्ट्रीय कामगार दिना मागची कथा आपण जाणून घेतलीच पाहिजे.

औद्योगिक क्रांतीनंतर जगभरातून मुख्यतः पाश्चिमात्य जगतात रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध  होऊ लागले. कामगारांकडे काम होतं, मात्र त्यांची पिळवणूक सुरु होती. कोणत्याही हक्कापासून वंचित असलेल्या कामगारांना १२ तास १४ तास काम करावं लागत असे. जगभरातील कामगार आठ तासाच्या कामाच्या दिवसाची मागणी करू लागले होते. या संदर्भातील पहिली मागणी २१ एप्रिल १८५६ रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांकडून आली तेव्हापासून हा दिवस तेथे सुट्टी म्हणून जाहीर झाला. ऑस्ट्रेलियातील कामगारांच्या मार्गाने जात अमेरिका आणि कॅनडातील संघटनांनी १ मे १८८६ रोजी मोर्चे आणि धरणे यांची मालिका सुरु केली. अमेरिकेतील कामगार त्यांच्या हक्कांसाठी एकजूट झाले आणि त्यांनी उठाव केला. जगभरात याचे तीव्र पडसाद उमटू लागले. अशाच एका मोर्चाला पांगवताना ४ मे १८८६ रोजी शिकागोमध्ये सहा आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. याची परिणती पोलिसांच्या क्रूरतेविरोधातील एका मोठ्या निषेधात झाली. त्यात एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांवर बॉंब टाकला. ज्यात ८ पोलिसांचा मृत्यू आणि ५० पोलीस जखमी झाले. एवढ्या संघर्षानंतर अखेर कामगारांची कामाची वेळ ८ तास निश्चित करण्यात आली. कामगारांच्या लढ्याच्या शिकागोतील घटनेच्या स्मरणार्थ १९८९ मध्ये पॅरिसमध्ये भरलेल्या दुसर्‍या आंतरराष्ट्रीय परिषदेत रेमंड लेविन यांनी १ मे १८९० रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा करण्याची मागणी केली. त्या परिषदेत १ मे १८९० हा जागतिक कामगार एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले. आणि १८९१ च्या दुसऱ्या परिषदेत या कार्यक्रमाला औपचारिक रित्या प्रतीवार्षिक कार्यक्रम म्हणून मान्यता देण्यात आली. त्यानंतर १ मे हा कामगार दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. या दिवशी जगातील ८0 देशांमध्ये सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात येते.

भारतातील पहिला कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात १ मे १९२३ रोजी पाळण्यात आला. लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थान या संघटनेने हा दिवस पाळला होता. याच दिवशी भारतात सर्वप्रमथ लाल बावटा वापरण्यात आला. कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीअर यांनी कामगार दिन कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. मद्रास उच्च न्यायालयासमोरील जागेत हा दिवस साजरा झाला होता.

मराठी भाषिकासाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी ही संकल्पना लोकमान्य टिळक यांनी १९०६ साली मांडली होती. १९१९ साली कॉग्रेसंच्या जाहीरनाम्यात लोकमान्य टिळक याच्या अध्यक्षतेखाली या संदर्भातील ठराव नमूद करण्यात आला होता. पण असं असलं तरी कालांतराने महाराष्ट्र् राज्याची वेगळी निर्मिती व्हावी याला कॉग्रेसंमधूनच विरोध होत गेला.

१३ एप्रिल १९४७ रोजी झालेल्या अकोला करारअंतर्गत असा ठराव करण्यात आला की महाराष्ट्र एकीकरण परिषद महा विदर्भ, मराठवाडा, बॉम्बे आणि उर्वरित महाराष्ट्र याच्या एकत्रीकरणासह संयुक्त  महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी कार्यरत राहील. काही महिन्यातच भारत स्वतंत्र झाला. अखंड भारत देश ही संकल्पना अस्तित्वात आली, संस्थाने खालसा करण्यात आली. १९५३ साली तेलगु भाषिकांसाठी आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीकडे मात्र दुर्लक्ष होत गेले. १९५५ च्या दरम्यान डाव्या पक्षांनी बॉम्बे बंदचा इशारा दिला, त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. २१ नोव्हेंबर १९५५ रोजी डाव्या पक्षांनी काढलेल्या मोर्चावर हुतात्मा चौक इथं अमानुष लाठीचार्ज आणि गोळीबार कारण्यात  आला. यात शेकडो जण जखमी झाले तर १०५ जणांचे प्राण गेले.

या घटनेनंतर संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन चिघळलं. ६ फेब्रुवारी १९५६ रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये आचार्य अत्रे, प्रबोधनकर ठाकरे, सेनापती बापट, शाहीर अमर शेख यांचा समावेश होता. यानंतरच्या काळात सर्वांनीच आपआपल्या क्षेत्रातून कॉंग्रेस सरकारच्या धोरणावर घणाघाती हल्ला करायला सुरुवात केली. डाव्या पक्षांच्या, कामगार संघटनांच्या साथीने एक मोठी चळवळ उभी राहिली. पण, सरकार मात्र मानायला तयार नव्हतं. नेहरू सरकारच्या दुटप्पीपणाच्या धोरणाला विरोध करत तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला. जनतेचं उत्स्फूर्त आंदोलन आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन अखेर २१ एप्रिल १९६० रोजी लोकसभेत संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन, मुंबई (बॉम्बे) महाराष्ट्राची राजधानी म्हणून घोषित करण्यात आली. अशा रीतीने महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.

3 

Share


S
Written by
Siddharth Deshmukh

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad