Bluepadइरफान खान : द वॉरियर
Bluepad

इरफान खान : द वॉरियर

Surekha Bhosale
Surekha Bhosale
30th Apr, 2020

Share

इरफान खान यांचे दुःखद निधन झाल्याने सगळ्यांना मोठा धक्का बसला.


काही जुने चित्रपट पाहताना आपल्याला आज स्टार किंवा सुपरस्टार झालेले अभिनेते, अभिनेत्री दिसतात. अनेकदा पाहिलेला इरफान सुद्धा मला असाच अवचित दिसला तो तपन सिन्हा यांनी दिग्दर्शित केलेल्या “एक डॉक्टर की मौत” या १९९१ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात. हा चित्रपट त्यावेळी पहिला तेंव्हा लांबसडक, बारीक अंगकाठीच्या इरफानला ‘स्टार वॅल्यू’ नव्हती त्यामुळे या चित्रपटाची भन्नाट कथा, पंकज कपूर आणि शबाना आझमी यांच्यापलीकडे आणखी कोणतेही कलाकार लक्षात राहिले नाहीत. त्यानंतर इरफानने एकएक क्षितिज पादाक्रांत करायला सुरुवात केली होती. धुंद, रोग, हासिल, मकबुल, साडेसात फेरे, द नेमसेक, लाईफ इन अ मेट्रो असे त्याचे हिन्दी इंग्रजी चित्रपट आले होते आणि दोन फिल्मफेअर पुरस्कार त्याच्या नावावर जमा झाले होते. हे पुरस्कार सुद्धा एक ‘हासिल’ मधल्या खलनायकी भूमिकेसाठी आणि दूसरा ‘लाईफ इन अ मेट्रो’साठी सह कलाकार म्हणून मिळालेले. म्हणजे तुम्ही त्यांना दगड द्या, तो त्या दगडाला फोडून त्याच्या मातीपासून सुंदर मडके बनवून दाखवणारच असा जबरदस्त कलाकार हा इरफानचा लौकिक निर्माण झाला होता. चित्रपट पाहण्याचा चांगला अनुभव देणारे जे काही मोजके कलाकार आहेत त्यात इरफान खान हे एक नाव यादीमध्ये जमा झालं होतं. पण सिनेमा जगतात असले अनेक लोक असतात. काहींना संधी मिळते काहींना नाही मिळत. काही हीरो बनतात तर काही कसदार अभिनेते. त्यामुळे इरफानचा नवा चित्रपट आल्यानंतर तो पाहण्याचं नक्की करणं एवढाच काय तो त्याचा कलाकार म्हणून आणि माझा प्रेक्षक म्हणून संबंध. पण २००९ मध्ये ‘बिल्लू’ आला आणि या पठ्ठ्याने दिल में तूफान मचा दिया. खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडला आपल्याला बिल्लू. शाहरुख सारख्या सुपर स्टार समोर एवढ्या ताकदीने उभा राहिला की ज्याचं नाव ते. आणि ‘एक डॉक्टर की मौत’ पुन्हा पाहण्याचा योग आला तेंव्हा आजच्या हा उत्तुंग अभिनेत्याला यात एक छोटीशी भूमिका करताना पहिलं आणि माझं मन हरखून गेलं. यापूर्वी त्याला असं कधी नोटिस केलं नव्हतं. तो दिग्गजांच्या प्रभेखाली झाकोळला गेला होता. मनात आलं की याच्या अभिनयाची चुणूक तपन सिन्हाना त्यावेळी दिसली होती म्हणून त्याला यात काम दिलं की चांगल्या स्क्रिप्ट शिवाय काम करणार नाही असा इरफानचाच आग्रह होता?

असा हा साहेबजादे इरफान अली खान काल २९ एप्रिल २०२० रोजी रुपेरी पडद्यावरून सरळ काळाच्या पडद्याआड गेला. ५२ वर्ष हे काही जाण्याचं वय नाही. पण प्रचंड मेहनत आणि आपल्याकडचं रसायन मिश्रित अन्न यांनी जसं अनेकांना कॅन्सरच्या रूपात आपलं शिकार बनवलं आहे तसंच इरफानला ही केलं. २०१८ साली त्याला ‘न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर’ झाल्याचं निदान झालं. “आयुष्याकडून आपल्या अपेक्षांप्रमाणेच सर्व गोष्टी मिळतातच असं नाही,” अशा आशयाची मार्गारेट मिशेल यांची ओळ लिहित त्याने एका ट्विटद्वारे आपल्या चाहत्यांना आपल्या आजाराविषयीची माहिती दिली. तो म्हणाला होता,

“आयुष्यात अशा काही अनपेक्षित गोष्टी घडतात ज्यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. अगदी अशाच काहीशा परिस्थितीचा मी गेले काही दिवसांपासून सामना करत आहे. मला ‘न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर’ झाल्याचं समजलं. सध्या ही परिस्थिती कठीण आहे. पण, माझ्या सोबत असणारं इतरांचं प्रेम आणि त्यांच्याकडून मिळणारा धीर पाहता मला आशेचा किरण दिसतो आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी मला परदेशात जावं लागतंय. पण, तरीही मी सर्वांनाच विनंती करतो की, माझ्यावर तुमचं प्रेम असच कायम राहू द्या.”

इरफान हा मूळचा राजस्थानचा. तिथे वडिलांच्या टायरच्या व्यवसायावर घर चालत होतं. त्याच्यासह एक बहीण आणि भाऊ यांचं पालनपोषण करणं आई सईदा बेगम खान आणि वडील यासीन अली खान यांना फार कठीण जात होतं. इरफानने एका मुलाखतीत सांगितलं की ज्यूरॅसिक पार्क १९९४ साली आला पण तो पाहण्यासाठी पैसे नव्हते. पण २०१५ साली कोलीन ट्रेवोरो यांच्या ‘ज्यूरॅसिक वर्ल्ड’ मध्ये त्याला मुख्य भूमिका मिळाली. इरफानचा अभिनयच इतका ताकदीचा होता की त्याच्यावर हॉलीवूडकरांची नजर पडली नसती तरच नवल. त्याने टीव्ही वर चाणक्य, भारत एक खोज, सारा जहां हमारा, बनेगी अपनी बात आणि चंद्रकांता ह्या लोकप्रिय मालिकांमध्ये अभिनय केला. वर उल्लेखिलेल्या चित्रपटांसोबत मदारी, जज्बा, पिकू, पानसिंग तोमर, तलवार, ये साली जिंदगी, द अमेजिंग स्पाय, यू होता तो क्या होता, ७ खून माफ, डी-डे, बिल्लू, अपना आसमान, सलाम बॉम्बे, डेडलाइन सिर्फ २४ घंटे, नॉक आउट, ए माइटी हार्ट, किस्सा, थँक यू, क्रेजी ४, चमकू, राइट या राँग, चेहरा, मुंबई मेरी जान, द वॉरियर, द किलर, कसूर, क्राइम, द दार्जिलिंग लिमिटेड, इनफर्नो अशा हिन्दी इंग्रजी चित्रपटात काम केलं.

‘पानसिंग तोमर’साठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार, ‘लंचबॉक्स’साठी एशियन फिल्म पुरस्कार आणि ‘हिन्दी मिडियम’साठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय २०११ मध्ये त्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. इंग्लंडमध्ये आपल्या आजारातून पूर्ण बरा झाल्यानंतर इरफानने आपली सेकंड इंनिंग ‘इंग्लिश मिडियम’ने सुरू केली होती. पण चार दिवसांपूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले आणि त्याला त्रास होऊ लागला. त्याला कोकिलाबेन रुग्णालयात अॅडमिट केले आणि आज त्याने अखेरचा खुदा हाफिझ केला.

19 

Share


Surekha Bhosale
Written by
Surekha Bhosale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad