Bluepad | Bluepad
Bluepad
कास पठार : जैवविविधतेचा हॉटस्पॉट
undefined undefined
undefined undefined
23rd Jun, 2020

Shareकास पठार : जैवविविधतेचा हॉटस्पॉट


सध्या हॉटस्पॉट हा शब्द आपल्या सर्वांच्याच ओठांवर असतो त्याला कारण म्हणजे कोरोना विषाणूने संक्रमित केलेल्या परिसरांना हॉटस्पॉट म्हटलं जात आहे. पण निसर्गाच्या अफाट देणगीने समृद्ध असलेल्या परिसरांना सुद्धा हॉटस्पॉट म्हटलं जातं हे तुम्हाला माहीत आहे का? आज आपण जाणून घेऊया अशाच एका जैवविविधतेच्या हॉटस्पॉट विषयी ज्याला आपण सर्व कास पठार म्हणून ओळखतो.

साधारणपणे ऑगस्ट महिना सुरू झालेला असतो, पावसाने ओलेता झालेल्या परिसराने आता आपले नैसर्गिक रंग दाखवायला सुरुवात केलेली असते. अशाच वेळी साताऱ्याच्या पश्चिमेकडे शहरापासून २२ किमी अंतरावर समुद्रसपाटीपासून १,२१३ मीटर उंचीवर कासचे पठार आहे. सातारा वन विभागातील मेढा व सातारा वनक्षेत्राच्या हद्दीतील या पठारावरील कास तलाव सातारा शहराच्या पश्चिम विभागाला पाणीपुरवठा करतो. पठारावर पाऊस सुरू झाला की इथे रंगते निसर्गाची रंगपंचमी. पठाराच्या १,९७२ हेक्टर एवढ्या विस्तृत जागेवर नजर जाईल तिथे उमललेली असतात विविधरंगी फुलं! फुलांच्या आणि वेलींच्या अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे. वनस्पती शास्त्रात अजून ज्यांचा उल्लेख झालेला नाही अशी फुलं, वेली, झाडं इथे आहेत. त्यामुळे सह्य़ाद्रीतील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करणार्‍यांची मक्काच आहे जणू. फुलं तिथे फुलपाखरे. इथे येणार्‍या पर्यटकांसाठी ही दुहेरी मेजवानी निसर्गाने प्रस्तुत केलेली असते.

कास गावात ग्रामदैवत असलेल्या कासाई देवीचे मंदिर आहे. कास या वृक्षाचे वैशिष्टय़ म्हणजे याची पाने पिकल्यानंतर रक्तवर्णी दिसतात. या वरूनच या पठाराला कास पठार असं नाव पडलं असावं. कास पठाराचं खरं सौंदर्य फुलतं ते सप्टेंबर महिन्यात. कास पठार हे कातळ खडकाचं कमी प्रमाणात माती असलेलं पुष्प पठार आहे. इथे सुमारे ४०० पेक्षा जास्त फुलांच्या प्रजाती आढळतात. तर एकूण ८५० पेक्षा जास्त प्रजातींच्या वनस्पती आढळतात. यामध्ये प्रदेशनिष्ठ, अतिदुर्मीळ वनस्पतींचा देखील समावेश आहे. रेड डाटा बुकमधील ६२४ प्रजातींपैकी ३९ प्रजाती कास पठारावर आढळतात. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पठारावर रंगीबेरंगी फुलांचे पट्टे बहरू लागतात. हे दृश्य पाहणार्‍याच्या डोळ्यांचं पारणं फेडतं.
जैव विविधतेने नटलेल्या या पठारावर कुमुदिनी तलाव आहे. यात पांढर्‍या रंगाची पाच पाकळ्यांची कमळे असतात. ही कमळे रात्रीच्या वेळी उमलतात. याशिवाय दुधाचा ओघ ओसंडून वाहवा तसा दिसणारा वजराई धबधबा आहे. हा धबधबा पुढे जाऊन उरमोडी नदीचं रूप घेतो. डाक बंगला, बामणोली बोट क्लब, क्षेत्र येवतेश्वर, क्षेत्र शेंबडी ही ठिकाणं सुद्धा पठाराच्या सौंदर्यात भर घालतात. कास पठारापासून कोयना अभयारण्याची हद्द वीस किमीच्या अंतरावर आहे.

कास पठारावरील पुष्प हंगामाचं नियमन आणि पठाराचं संवर्धन वन विभागासोबत कास पठारामध्ये सामील असलेल्या कास, कासाणी, आटाळी, एकीव या चार गावांच्या संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांमार्फत एकत्रितरीत्या केले जाते. २०१६ पासून पाटेघर आणि कुसुंबी या दोन गावांचादेखील यात समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी कास पठार हे एक आश्चर्य ठरले आहे. महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचं प्रतिक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या मध्य रेल्वेचं मुख्यालय सीएसटी स्टेशन, मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला दौलताबादचा किल्ला, पश्चिम घाटातील कास पठार, स्वराज्याची पहिली राजधानी रायगड किल्ला, बुलढाण्यातील लोणार सरोवर, औरंगाबादमधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत. जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडली गेली आहेत.

कास पठाराला हॉटस्पॉट हे नाव दिल्यामुळे ह्या पठाराच्या परिसरात मानवी हस्तक्षेप वाढला आहे. पर्यटकांचा ओघ प्रचंड प्रमाणात वाढल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. वन विभागाने नियंत्रणासाठी विविध उपाय केले आहेत. कास पठाराच्या परिसरात यवतेश्वर-कास मार्गावर ९६ अवैध बांधकामे आहेत. नुकतेच प्रशासनाने याचा आढावा पूर्ण केला. ही अवैध बांधकामे कासच्या जैवविविधतेला बाधा आणत असून शासनाने कास पुष्प पठाराच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. “जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते” सावरकरांनी लिहीलेल्या या ओळींचा प्रत्यय घ्यायचा असेल तर कास पठाराला नक्की भेट द्या.

33 

Share


undefined undefined
Written by
undefined undefined

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad