Bluepadव्हॉट्सअ‍ॅप – विश्व हातात आणणारा अ‍ॅप
Bluepad

व्हॉट्सअ‍ॅप – विश्व हातात आणणारा अ‍ॅप

B
Bhargavi Joshi
29th Nov, 2021

Share“अफाट जगती जीव रज:कण
दुवे निखळता कोठून मिलन”

अरुण दाते यांच्या गाण्यातून व्यक्त झालेलं हे दु:ख २० वर्षापूर्वी एखाद्याच्या आयुष्याची शोकांतिका ठरत होती. पृथ्वी गोल असली तरी ती किती अफाट आहे. आपले एकमेकांमध्ये बांधलेले हात सुटले की गर्दीत आपण कुठल्याकुठे भिरकावले जाऊ काही सांगता येत नाही. मग आयुष्यभर फक्त आठवणी घेऊन जगायचं आणि त्यांच्या साठवणीत मरायचं. पण आता दिवस बदललेत. आज सोशल मीडियाने या दु:खावर मात केली आहे. निखळलेले दुवे जोडण्याचं अभूतपूर्व काम त्याने केलं आहे.

एक काळ असा होता जेंव्हा सगळे नातेवाईक मित्र मैत्रिणी एकाच परिसरात राहायचे. एकमेकांच्या घरी अपॉइंटमेंट न घेता जायचे. मुलींची लग्न होऊन त्या सासरी गेल्या तरी सणासुदीला माहेरी भेटायच्या. पण काळ बदलला तसा एकेकाळचे शेजारी आणि जिवलग मित्र जगण्याच्या रहाटगाडग्यात दूरदूर झाले. पत्र हे एकमेव संपर्क माध्यम होतं. त्यामुळे कोणाच्या घरी कोणी जन्माला आलं किंवा देवाघरी गेलं तरी दूरच्या लोकांना कळायला अनेक दिवस लागायचे. १९८५ दरम्यान मोजक्या लोकांकडे टेलिफोन आले. हे संपर्काचं साधन असलं तरी लोक गरजेपुरतेच संपर्क करायचे. हो, पण पत्र पाठवून ते मिळेपर्यंत व्यर्थ होणारा वेळ कमी झाला.

साधारणपणे २००० सालात सामान्य माणसाच्या हातात मोबाइल आला. दूर गेलेल्यांशी मोबाइलमुळे संपर्क होऊ लागला. त्यावेळी प्रत्येक जाणार्‍या आणि येणार्‍या दोन्ही कॉल्स आणि एसएमएस वर पैसे लागायचे. त्यामुळे लोक हे देखील फार करीत नव्हते. थोडक्यात टेलिफोन प्रमाणेच अगदीच गरज असेल तरच मोबाइलचा उपयोग करीत होते. मोबाइलमुळे एकच झालं होतं की कोणी कामानिमित्त बाहेर असेल तर तो आपल्या घरच्यांशी आणि कामाच्या संबंधित लोकांशी संपर्कात असे. ही देखील आपल्यासाठी एक क्रांतीच होती.

माहिती तंत्रज्ञानाने आपल्या जगात ९० च्या दशकातच पाऊल टाकलं. तैवानच्या जेरी यांग आणि अमेरिकेचा एक उद्योगपती डेविड फिलो यांनी १९९५ मध्ये याहूची स्थापना केली आणि जगाला सर्च पोर्टल आणि ईमेल ह्या नव्या संकल्पना मिळाल्या. २००० येता येता माहिती तंत्रज्ञानाने बाळसं धरलं होतं आणि २००४ मध्ये मार्क जुकरबर्गने फेसबूकची सुरुवात करून हार्वर्ड विद्यापीठातील त्याच्या तीन मित्रांच्या सहाय्याने अनेक उलथापालथीतून गेलेल्या फेसबूकला २००९ पर्यन्त लोकप्रिय केलं होतं. त्याचवेळी याहूमधली नोकरी सोडणारे ब्रायन अ‍ॅक्शन आणि जॅन कोअम यांनी २००९ मध्ये व्हॉट्सअ‍ॅप ह्या अ‍ॅपची पायाभरणी केली. अनेक बदल करत त्यांनी या अ‍ॅपला संपूर्ण जगात नुसतंच लोकप्रिय नाही तर ती लोकांची सवय बनवून टाकली. व्हॉट्सअ‍ॅपमुळे संपर्क करण्यात येणारे सर्व अडथळे दूर झाले. १९ फेब्रुवारी २०१४ रोजी फेसबूकने व्हॉट्सअ‍ॅपला विकत घेतलं आणि त्याचा चेहरामोहरा बदलला. ह्याला पूरक ठरली ती टेलिफोन उद्योगातील क्रांती. मोबाइल कंपन्यांनी आपल्या दरप्रणालीमध्ये लक्षणीय बदल केल्यामुळे आधी मोबाइल आणि मग मोबाईलवर उपलब्ध असणारे सर्व अ‍ॅप्स आणि बाकी गोष्टी सर्वसामान्यांच्या अवाक्यात आल्या.

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून अनेक ग्रुप तयार झाले. बोट दिलं की हात पकडणं हा माणसाचा मूळ स्वभाव आहे. ह्याच सवयीचा उपयोग डिजिटल माध्यमातील कंपन्यांनी केला आणि व्हॉट्सअ‍ॅप प्रमाणे इतर अनेक अ‍ॅप लोकांच्या हातात आले. एखाद्या गेम पासून ते आरोग्याच्या टिप्स देणारे, वजन, कॅलरीज मोजणारे, देश विदेशातील लोकांशी मैत्री करून देणारे, बातम्या, कॅलेंडर, तापमान, टीव्ही चॅनल्स असे अनेक अ‍ॅप्स लोकांच्या आयुष्याचे भाग बनले. सकाळी उठल्यापासून ते रात्री डोळा लागेपर्यंत लहानांपासून वृद्धांपर्यंत, गरिबापासून श्रीमंतापर्यन्त सर्वांच्या हातात अ‍ॅप्स आले. आज परिस्थिति अशी आहे की लोकांना थोडा वेळ शांती हवी असेल तर ते मोबाइल दूर ठेवतात. पण त्याला आता जास्त दूर ठेवता येत नाही कारण कामाशी संबंधित ग्रुप देखील त्या व्हॉट्सअ‍ॅपवरच आहेत. व्हॉट्सअ‍ॅप आता निकड बनला आहे. पण याचा उपयोग काही समाजकंटक करतात. कोणतीही गोष्ट अति झाली तर त्याची माती होते हे आपण लक्षात घ्यायला हवं. व्हॉट्सअ‍ॅपच्या बाबतीत असं झालं तर त्याची परिणीती कशात होईल सांगता येत नाही. क्षणाक्षणाला बदलणार्‍या ह्या जगात कोणत्याही गोष्टीची शाश्वती नाही त्यामुळे जे आहे त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी व्हावा ही माफक अपेक्षा.

80 

Share


B
Written by
Bhargavi Joshi

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad