Bluepad | Bluepad
Bluepad
" माझा विध्यार्थी माझा अभिमान " सुरज जगताप याची तहसीलदारपदी निवड...
डॉ प्रकाश पांढरमिसे
22nd Jun, 2020

Share

"माझा विद्यार्थी माझा अभिमान "
सुरज जगताप याची तहसीलदार पदी निवड.... !!!
बारामतीच्या नामांकित तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2006 ते 2013 पर्यंत इतिहास विषयाचे अध्यापन पदवी आणि पदव्युत्तर विभागाला केले. या सात वर्षांमध्ये अनेक विध्यार्थ्यांना अध्यापन केले. या महाविद्यालयातील अनेक विध्यार्थी विविध क्षेत्रात विविध पदावर आज कार्यरत आहेत. नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत टी. सी. कॉलेज बारामतीला मी 2009-10 आणि 2010-11 या वर्षी एस. वाय आणि टी. वाय बी. ए. ला अध्यपन केलेला विध्यार्थी सुरज जगताप याची तहसीलदार पदी नियुक्ती झाल्याचे समजले. खूप आनंद झाला आणि सुरजने संपादित केलेल्या यशाचा कमालीचा अभिमानही वाटला. सूरजला फेसबुकच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदनही केले. सुरजने संपादित केलेल्या यशस्वी यशामुळे मन भूतकाळात गेले... !!!
T. C.कॉलेजला 2009-10 साली एस. वाय. बी. ए. च्या वर्गामध्ये इतिहास जनरल ( S-2 )साठी आलेल्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये सुरज जगताप हा विध्यार्थी होता. त्याच्या सोबत कायम सावलीसारखे असणारे त्याचे मित्र महेंद्र शेलार, निलेश बारवकर, रोशन मोरे... अजून काहींची नावे आठवत नाहीत... पण या S.Y.B.A च्या वर्गात कायम हुशार आणि सेन्सियर असणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा ग्रुप. हे सर्व विध्यार्थी महिन्याभरातच माझे आवडीचे विध्यार्थी झाले होते. कधीही इतिहासाच्या लेक्चरला अनुपस्थित नसणारे. कायम इतिहासाच्या संबधी प्रश्न घेऊन येणारे. मला लेक्चर नसले की प्रश्नाच्या निमित्ताने येऊन माझ्याशी विविध विषयावर चर्चा करणारे हे माझे आवडते विध्यार्थी...
सुरज विठ्ठल जगताप हा फलटण तालुक्यातील सोनगावचा. घरची परिस्थिती हलाकीची वडील शेतमजुरी करणारे..... पण सुरजने स्वतःचे ध्येय MPSC, UPSC स्पर्धा परीक्षा करून प्रशासकीय अधिकारी होण्याचे एस. वाय लाच निश्चित केले होते. त्या दिशेने तो कॉलेजदशेपासून अभ्यास करत होता.तो नेहमी वर्गमित्रांना स्पर्धा परीक्षा करण्याकरिता सांगत होता. अधून मधून इतिहास आणि इतर आवांतर विषयावर, चालू घडामोडीवर नेहमी चर्चा करायचा.चर्चा करणं, ग्रुप डिस्कशन करणं हा त्याचा आणि त्याच्या ग्रुपचा आवडता छंद. त्याचवेळी मी आणि प्रा. सुनील खामगळ सरांना सुरजच्या स्पर्धा परीक्षेच्या ध्येयाचा अंदाज आला होता. एक दिवस निश्चितपणे सुरज स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोस्ट काढणार.याची आमच्यामध्ये नेहमी चर्चा होत असे.
असाच एकेदिवशी 2018 मध्ये सुरजचा मला फोन आला सर...ओळखलं का? मी सुरज जगताप बोलतोय...!! कक्ष अधिकारी म्हणून माझी नियुक्ती झाली आहे. हे ऐकून खूप आनंद आणि अभिमान ही वाटला होता. त्याचवेळी सुरजला बोललो होतो आता यापुढेही थांबायचे नाही कलास वन पद मिळवायचे. अभ्यास चालूच ठेव. एक प्राध्यापक म्हणून मला सुरजचा कायम अभिमान वाटत राहिला. परिस्थिती हलाकीची असतानाही परिस्थितीला कधीच तो दोष देत राहिला नाही... ध्येय सिद्ध केल्याशिवाय थांबायचे नाही. हा कानमंत्र घेऊन अभ्यास करत राहिला. सुरजने ज्या क्षेत्रात दिशेने जायचे होते ते ठरवून त्या दिशेने क्षेत्रांत पावले टाकत मार्गक्रमण करत प्रवासाला सुरवात केली होती. सुरजची प्रतीक्षा होती ती... एक दिवस प्रशासकीय अधिकारी होण्याची.....!!!
T. C.कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर सुरज सारख्या अनेक विद्यार्थ्यांचा संपर्क कमी होत गेला. तसा बारामतीचाही संपर्क तुटत गेला. पण ज्या विध्यार्थ्यांना सहा -सात वर्षाच्या अध्यापन कारकिर्दीत जे ज्ञान दिले आहे. ते ज्ञान आणि जीवन जगण्याचे तत्वज्ञान पावलोपावली उपयोगी पडणारे आणि जीवनाला दिशा देणारे दिले आहे. आजही कॉलेजला अध्यापन केलेल्या विध्यार्थ्यांचे फोन येतात. व्हाट्सअप, फेसबुक च्या माध्यमातून पहिल्या बॅचपासूनचे अनेक विध्यार्थी संपर्कात आहेत. ते कधीच विसरू शकत नाहीत. आणि प्रत्येक बॅचचे निवडक विध्यार्थी यांना मी ही विसरू शकत नाही.
असाच काल रात्री रविवारी संध्याकाळी आठ वाजता सुरजचा फोन आला. प्रथम सुरजने MPSC मध्ये संपादित केलेल्या यशाबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन केले. भावी कार्याला उज्ज्वलमय शुभेच्छा दिल्या. मग चर्चेला सुरवात झाली... सुरज म्हणाला सर.... 3 गुणांनी उपजिल्हाधिकारी पद गेले आहे... पण इथून पुढे UPSC वरती लक्ष केंद्रित करून IAS चे ध्येय ठेवले आहे. ते मिळाल्याशिवाय थांबणार सर नाही....!!! अशी फोनवर सुरु झालेली चर्चा जवळपास 30 ते 40 मिनिट सुरु होती. मग काय एक लेक्चर दिल्याचा भास झाला.सुरजचे मनापासून अभिनंदन केले.प्रशिक्षण आणि भावी प्रशासकीय कार्यासाठी शुभेच्छा दिल्या..... !!! फोन ठेवल्यानंतर वाटलं सुरजविषयी आपल्या विचारभावना मांडल्याच पाहिजेत..!!!
सुरज.... खरंच तू आयुष्यात घेतलेली खडतर मेहनत, काबाड कष्ट आणि कमालीची जिद्ध, चिकाटी, होय, ... मी हे करू शकतो.... !!! हा आत्मविश्वास आम्हा प्राध्यापक आणि तुझ्या वर्गमित्रांना S.Y.B.A ला असताना दिला होता. तो आत्मविश्वास आज खरा करून दाखविला आहे. याचा मला सार्थ अभिमान वाटतो.
असं म्हटलं जातं की, कर्तृवान व्यक्तीचे वैभव हे सर्वांच्याच दृष्टीस पडत असते......!!!
सुरज तू तहसीलदार या पदी दैदिप्यमान यश संपादित करून तुझे हे वैभव सर्वांच्याच दृष्टीस पडणार आहे. पण या वैभवाच्या मागे कधी काळी अंधार दाटलेला होता. या अंधाऱ्या काळोखाला छेदत छेदत आज यशाचा लखलखीत प्रकाश निर्माण करून तू सारं वातावरण दिपवून टाकलं आहे अगदी तुझ्या नावातील "सुरज"प्रमाणे...... !!!
कॉलेज दशेत प्रशासकीय सेवेत अधिकारी व्हायचं ध्येय निश्चित करून त्या ध्येयाचा खडतर मेहनतीने पाठलाग करून यश खेचून आणणारा 'सुरज' आज तहसीलदार झाला आहे याचा सार्थ अभिमान आहे. या प्रशासकीय पदाच्या माध्यमातून गोरगरीब वंचित, कष्टकरी उपेक्षित नागरिकांना सेवा देताना एक कर्तबगार अधिकारी ही ओळख महाराष्ट्राला निर्माण करून दे.... ही मापक अपेक्षा.....!!! सुरज पुनःश्च अभिनंदन आणि भावी प्रशासकीय वाटचालीस खूप खूप शुभेच्छा... 🙏
डॉ. प्रकाश पांढरमिसे
इतिहास विभाग प्रमुख,
श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय, बावडा, इंदापूर
मोबाईल. 9423639796

19 

Share


Written by
डॉ प्रकाश पांढरमिसे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad