बेफिकीर , उनाड तो
खूपच जास्त आळसवलेला असतो.
बापाची उठताबसता बोलणी ऐकून
पुरता कंटाळलेला असतो.
कसाबसा मार्च ऑक्टोबरच्या वाऱ्या संपवून शालेय शिक्षण पूर्ण करतो..
कॉलेजच्या एटीकेटीच्या जंजाळात मात्र पुरता फसतो.
कॉलेज कुमार तो कुणालाच जुमानत नाही...
कोणत्याही तरूणीला विचारताना मागे वळून पाहत नाही.
मग कुणीतरी येते... त्याच्या आयुष्याला स्थिर करते...
नोकरी धंदा कर म्हणून सतत पिच्छा पुरविते.
मनमौजी तो आता मात्र संयमी होतो...
नोकरी मिळविण्यासाठी वाहनां झिजवितो.
घरापासून लांब राहून पार्ट टाइम जॉबही करतो ...
स्वकमाईतून अतिरिक्त कोर्सही पूर्ण करतो.
नोकरी मिळते.. लग्नही होते...
आता मात्र संसारात रूळतो.
दोन वर्षातच नव्या चाहुलीने..
त्याच्यातील पिताही उमलतो.
बाळ होतं ...खर्च वाढतात
सगळा भार मात्र एकटाच पेलतो.
आर्थिक गणित सांभाळत ....
स्वतः मात्र दोन जोडी कपड्यातच वावरतो.
नवा कोरा बाप आता मुला सवे खेळू लागतो...
जुना बाप मात्र नातवंडात रमतो.
आज आपल्या बापाची त्यालाही कळते महती...
आपल्याला वाढवताना त्याचीही झाली असेल फजिती.
बालपण आठवताना तोही फ्लॅशबॅक मध्ये जातो...
पुन्हा लहान होऊन आपल्याच बापाला नव्याने पाहतो.
पोरा- बाळांसाठी ऊन वाऱ्यात झिजत असतो..
पण आपला मोठेपणा कोणाही समोर मिरवत नसतो.
सगळ्यांच्या आनंदात आनंदी असतो...
दुःखात मात्र एकटाच रडतो.
तरीही खंबीर राहून ...
घराची प्रत्येक काडी पेलून धरतो.
आईसारखी कोमलता त्याला कधी शोभत नाही...
राकट पणाचा आव आणून कोणाशीही बोलत नाही.
बाप समजण्यासाठी आधी बापचं व्हावं लागतं...
वेळ निघून गेल्यावर मात्र शल्य मनात उरतं.
बाप या विषयावर म्हणूनच लिहिता येत नाही
लिहिताना त्याच्यासाठी शब्दच पुरत नाहीत.
🙏
- प्रमिला प्रभू