Bluepadआंबा पिकतो, सर्व जग चाखतो...
Bluepad

आंबा पिकतो, सर्व जग चाखतो...

D
Deepti Angrish M.
28th Apr, 2020

Shareबालपण आणि आंबा म्हणजे सुंदर आठवणींचा गुच्छच.
कधीही काढावा आणि हुंगत बसावं. एप्रिल महिना लागला की मनात साठलेला आंब्याचा सुगंध दरवळू लागतो. लहानपणापासून तशी सवयच लागली आहे. परीक्षा संपल्या की गावाला जायचं आणि आंब्याच्या झाडाखाली बसून अख्खी दुपार झाडावरून आंबे आणि कैर्‍या पाडण्यात घालवायची. त्याचीच एक आठवण आहे.

रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात माझ्या मामाचं गाव आहे पडवण. तिथे मामाच्या घराच्या मागच्या बाजूने एक पायवाट इतर घरांकडे जाते. ह्या पायवाटेच्या बाजूलाच एक आंब्याचं झाड आहे. पायवाटेवर म्हणजेच लोकांच्या येण्या जाण्याच्या मार्गावर आहे म्हणून त्याला
‘वाटल्या’ म्हणतात. कोकणात अशा प्रत्येक वस्तूला ‘नावं’ ठेवण्याची ‘प्रथा’ आहे. तर सुट्ट्या पडल्या की आम्ही सर्व मावस मामे भावंडं पडवणात जायचो. तर हा वाटल्या आमची वाटच पहात असायचा. तो म्हणजे आमचा सवंगडीच होता ना. त्याचे मोठमोठे खोड जमिनीवरून आडवेतिडवे पसरले होते. वाटल्या किती जुनाट होता वगैरे ‘जनगणना’ छाप सर्वे करण्याचा कधी प्रयत्न नाही केला त्यामुळे त्याचं वय ‘साधारणपणे’ देखील मी सांगू शकत नाही. पण तो आमच्यासाठी कल्पवृक्षाप्रमाणे होता. कारण एक तर तो भरपूर सावली द्यायचा. खोडावर बसण्याचा, पहुडण्याचा प्रचंड आनंद द्यायचा आणि मुख्य म्हणजे दुपारच्यावेळी सटासट पिकलेले आंबे खाली पाडायचा. खाली आंबा पडला नाही की आमची तो आंबा उचलायला तारांबळ उडायची. ज्याचा हाती लागे तो इतर मुलांना वाकुल्या दाखवायचा. मुलं वाटल्यावर दगड भिरकावून भिरकावून आंबे पाडायचे पण त्यात आम्हा मुलींसाठी वाटा कधीतरी असायचा. मग कधी आम्हीही वाटल्यावर दगड मारायचो आणि आंब्यांनी ओचे भरायचो,
नाही तर गपगुमान बसून राहायचो, मग वाटल्याच आमच्यासाठी ४-५ आंबे पाडायचा. आमची तारांबळ बघून खुद्कन हसत असेल का तो?

लहानपणी असे खूप आंबे खाल्लेत पण वाटल्याच्या रसरशीत चवीने जिभेवर अजूनही ठाण मांडलं आहे. एकट्या रत्नागिरीच्या वेगवेगळ्या तालुक्यातील गावांमध्ये वेगवेगळ्या चवीचे अनेक प्रकारचे आंबे आम्ही खाल्ले आहेत. आंब्याच्या झाडाखाली बसून आंबा खाल्लेल्या आम्हाला आता उत्तर भारतातून आलेले आणि कॅल्शियम कारबाईड टाकून पिकवलेले आंबे विकत घेऊन खाण्याची वेळ येते तेंव्हा फार वाईट वाटतं. याला जबाबदार ते कोकणांतील आंबा विक्रेते आहेत जे आपल्या आमराईत पिकलेल्या आंब्याच्या घरात राशी मांडून न ठेवता तो एक्सपोर्ट करतात. मातीचं वाण मुलांच्या तोंडी लागू देत ही भावना देखील कधीच एक्सपोर्ट झाली आहे. पण अतिरेक कशाचाही वाईटच. ज्या रत्नागिरीच्या हापूस आंब्याला जगाच्या कानाकोपर्‍यातून प्रचंड मागणी होती त्याचं भरघोस उत्पन्न घेण्याच्या नादात शेतकर्‍यांनी भरमसाठ रासायनिक खतं वापरली. त्यामुळे अमेरिकेत भारतीय आंब्याच्या निर्यातीवर गेल्या २० वर्षापासून बंदी होती, ती २०१६ मध्ये उठवली गेली. २०१४ मध्ये युरोपमध्ये निर्यात झालेल्या निलम जातीच्या आंब्यांमध्ये फळमाशी लागली आणि युरोपने तेंव्हापासून भारतीय आंब्याच्या निर्यातीवर बंदी घातली पण ती २०१५ मध्ये उठवली.

आंब्याचा व्यवसाय हा फार मोठी आर्थिक उलाढाल करून देणारा व्यवसाय आहे. देशात महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक ही सर्वात मोठी आंबा निर्यात राज्ये आहेत. संयुक्त अरब अमिरातीपाठोपाठ युरोपियन महासंघ हा जगातील दुस-या क्रमांकाचा आंबा आयात करणारा प्रदेश आहे. भारताला या निर्यातीतून दरवर्षी किमान ५० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढा महसूल मिळतो.

२०१६ साली राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने केशर, तोतापुरी, दालिम्बिया या जातीचे तेरा टन भारतीय आंबे अमेरिकेला समुद्रमार्गे प्रथमच रवाना करण्यात आले. समुद्रमार्गे हा आंबा २० दिवसात न्यूयॉर्कच्या बंदरात पोहोचला होता. २०१६ मध्ये आंबा निर्यातीच्या इतिहासात प्रथमच समुद्रमार्गे आंबा पाठविण्यात आला होता. २००६ मध्ये आंब्यावर निर्यातीपूर्वी विकीरण प्रक्रिया करण्याची सूचना केली गेली होती. त्यामुळे ही विकीरण सुविधा वाशी येथून सुरू करण्यात आली. २०१६ च्या हंगामात किमान १७५ मेट्रिक टन आंब्यावर विकीरण प्रक्रिया करून तेरा टन आंबा निर्यातदारांनी अमेरिकेस पाठविला.

विदेशात राहणार्‍या भारतीय आणि अ-भारतीय अशा सर्वांचाच आंबा खूप लाडका. पण म्हणून रसायनांचा मारा आणि बाकीच्या तांत्रिक गोष्टी करणे आवश्यकच आहे का? आंबा कैरी असताना काढला आणि तो गवताच्या भार्‍यात ठेवला तर तो ५ ते १० दिवसात छान पिकतो. मग अशावेळी तो रसायनं टाकून पिकावण्याची गरज काय? आयात करणार्‍या देशांनी देखील या गोष्टीचा विचार करावा.

ते काहीही असो, आमचा आंबा विदेशात नेणं म्हणजे गाय दुभती आहे म्हणून तिच्या पिल्लासाठीही दूध शिल्लक न ठेवता सर्व दूध विकून पैसे कमावण्यासारखं आहे. आताच्या पिढीला सुद्धा ह्या मातीतल्या राष्ट्रीय फळाची ऊंची चव कळू द्या. त्यासाठी ते विकत न घेता तुमच्याही गावात असलेल्या वाटल्याच्या वाटेवर मुलांना घेऊन जा. वाटल्या आपली खोडं पसरून कदाचित वाट पहात असेल!

11 

Share


D
Written by
Deepti Angrish M.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad