Bluepadनिळू फुले – एक कसदार अभिनेता
Bluepad

निळू फुले – एक कसदार अभिनेता

RD Bhosale
RD Bhosale
27th Apr, 2020

Share


मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला ज्यांनी समृद्ध केलं त्या कलाकारांमध्ये निळू फुले यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं.

नायक, खलनायक, चरित्र अभिनेता या प्रकारच्या भुमिका त्यांनी केल्या असल्या तरी देखील ’खलनायक’ म्हणून ते ठळकपणे आपल्या लक्षात राहतात. ’कथा अकलेच्या कांद्याची’ या लोकनाटयातून त्यांचं अभिनय क्षेत्रात पदार्पण झालं. त्यानंतर ’पुढारी पाहिजे’ ’बिन बियांचे झाड’ या लोकनाटयांमधनं त्यांच्या अभिनयाला नवे कंगोरे मिळाले. सिंहासन, पिंजरा, एक गांव बारा भानगडी, सामना, अजब तुझे सरकार, शापित या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले.

निळू फुले यांचा जन्म १९३० मध्ये पुण्यात झाला. त्यांचे वडील लोखंड आणि भाजी विकून मिळणार्‍या पैशावर चरितार्थ चालवत असत. निळू फुलेंनी मॅट्रिकपर्यंतच शिक्षण घेतलं. पण, आपली अभिनयाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः 'येरा गबाळ्याचे काम नोहे' हा वग लिहिला. त्यानंतर पु. ल.. देशपांडे यांच्या नाटकात 'रोंगे'ची भूमिका साकारून त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र 'कथा अकलेच्या कांद्याची' या वगनाट्यातील भूमिकेमुळे ते कलाकार म्हणून खर्‍या अर्थाने पुढे आले.

निळूभाऊंचं ग्रामीण आणि शहरी जीवनाचं निरीक्षण अतिशय अचूक होतं. या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खुबीने उपयोग केला. सहज सुंदर अभिनय करणार्‍या निळूभाऊंनी काल्पनिक कथेतला कलाकार जिवंत केला. ओठाची कुंची करुन, भुवई उंचावत नाटकीपणे बोलण्याच्या बर्‍याच भूमिका करण्यात अन अशा रग्गील भूमिका साकारण्यात त्यांचा हातखंडा होता.

सखाराम बाईंडर या विजय तेंडुलकरांच्या नाटकातील त्यांचा अभिनय एवढया जबरदस्त ताकदीचा होता की त्याला तोड नाही. या नाटकानंतर तेंडुलकरांच्याच जब्बार पटेल दिग्दर्शित
‘सामना’ मध्ये निळूभाऊंना 'हिंदूराव धोंडे पाटील' साकारण्याची संधी मिळाली. निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू यांच्या अभिनयाच्या जुगलबंदीने गाजलेला ‘सामना' हा माईल स्टोन. यात निळूभाऊंचा सामना डॉक्टरांशी होता. प्रेक्षकांना मात्र या दोन नटश्रेष्ठांची जुगलबंदी पाहण्याचा अपूर्व योग रसिकांना मिळाला. हिंदूरावची भूमिका निळूभाऊ अक्षरशः जगले. पुढे बेबी, रण दोघांचे, पुढारी पाहिजे, राजकारण गेलं चुलीत, सुर्यास्त, प्रेमाची गोष्ट या निळू भाऊंच्या नाटकांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांच्या सुर्यास्त या नाटकाकरीता त्यांना नाट्यदर्पण अकादमीचा पुरस्कार देखील मिळाला आहे. पिंजरा, बिनकामाचा नवरा, सिंहासन, सामना, माझा पति करोडपती, गोष्ट छोटी डोंगराऐवढी, एक होता विदुषक, गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं, जैत रे जैत अशा अनेक मराठी चित्रपटात काम केलं. यासोबतच सारांश
, कुली, प्रेमप्रतिज्ञा, वो सात दिन, बिजली, जरासी जिंदगी, नरम गरम इत्यादि हिंदी चित्रपटात देखील त्यांनी अभिनय केला.

त्यांच्यावर शिक्का बसलेल्या एकसुरी भूमिकांच्या पठडीतून बाहेर काढून, त्यांना एकदम पुनरुज्जीवीत होईल अशी वेधक भूमिका जब्बार पटेल दिग्दर्शित अरुण साधूंच्या
'मुंबई दिनांक' आणि 'सिंहासन' या दोन कादंबऱ्यांवर 'सिंहासन' ह्या मराठी चित्रपटात मिळाली. त्यांनी दिगू टिपणीस या पत्रकाराची भूमिका केली. सत्ताकेंद्राच्या अत्यंत जवळ राहून, सिंहासनाचा सर्व खेळ तटस्थपणे पाहणाऱ्या दिगूची भूमिका निळूभाऊंनी समरसून केली. या चित्रपटाच्या शेवटी मंत्रालयाच्याबाहेर खदाखदा हसत सुटलेल्या दिगू प्रेक्षकांच्या स्मरणातून कधीही जाणार नाही.

निळु फलेंना वाचनाची प्रचंड आवड होती. एकदा पुस्तक हातात घेतलं की ते त्याच दिवशी संपवायचं असा त्यांचा हट्ट असायचा. वाचनाच्या आवडीमुळेच त्यांच्यातील कलावंतामध्ये अभिनयाची सहजता आली असावी.

सामाजिक चळवळीत देखील निळू भाऊंचा सक्रिय सहभाग होता. सत्यशोधक चळवळ, अंधश्रध्दा निर्मृलन, हमाल पंचायत, दलित, आदिवासी, ग्रामीण साहित्याशी आणि चळवळींशी त्यांचा निकटचा संबंध होता. त्यांनी १९५८च्या सुमारास पुण्यातील सेवादलाच्या कलापथकाचं नेतृत्व केलं.

महाराष्ट्र शासनाने निळु फुलेंच्या अभिनयाकरीता त्यांना सलग ३ वर्ष म्हणजे १९७२, १९७३ आणि १९७४ मध्ये पुरस्कार देऊन सन्मानित केलं. त्यांना १९९१ साली भारत सरकातर्फे संगीत नाटक अकादमीचा पुरस्काराने गौरविण्यात आलं. अन्ननलिकेच्या कर्करोगाने अंथरुणाला खिळून असलेल्या निळू फुले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. १३ जुलै २००९ रोजी पहाटे दोनच्या सुमारास त्यांनी आपल्या आयुष्यातून एक्झिट घेतली. त्यांनी निर्माण केलेल्या खलनायकी अभिनयाची जागा भरून काढणारा अभिनेता आज तरी आपल्यात नाही.

68 

Share


RD Bhosale
Written by
RD Bhosale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad