Bluepad | Bluepad
Bluepad
राग आल्यावर काय करावे
उचिता थोरवत- संत
21st Jun, 2020

Share

आपल्या सर्वांनाच कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा राग येतो. मग ती गोष्ट लहान असो वा मोठी. मी जर आता तुम्हांला म्हणाले की मला राग येत नाही, तर कदाचित तुम्हांला याचे हसू येईल. राग ही आपली नैसर्गिक भावना आहे. ज्याप्रमाणे आपण हसतो, रडतो, चिडतो, उदास होतो, अगदी त्याच प्रमाणे आपल्याला राग ही येतो. त्यामुळे आपण तो दडवू शकत नाही. पण काही अंशी त्यावर नियंत्रण नक्कीच मिळवू शकतो.

राग आल्यावर आपला आपल्या जिभेवरचा ताबा सुटतो, त्यामुळे नातेसंबंध बिघडू वा तुटू शकतात. मग ते नाते कोणतेही असो. सासू सून असो, नवरा बायको असो, मित्र परिवार असो वा साहेब आणि कामगार. रागात आपला कबीर सिंह कधी होतो हे आपल्याला ही कळत नाही. म्हणुनच आज मी तुम्हांला राग आल्यावर काय करायचं याच्या 7 टिप्स देणार आहे. त्यामुळे लेख शेवट पर्यंत वाचा.

◆ उलटे अंक मोजा: आपण हे लहानपणापासून ऐकत आलो आहोत, राग आला की उलटे अंक मोजा, पण खरोखर आपण अस करतो का हो? नाही, मग तस करून बघा, त्यामुळे तुमचं तुमच्या रागावरून लक्ष दुसरीकडे जाईल.

◆ तिथून निघून जा: तुम्हांला एखाद्याच्या बोलण्याचा राग आला तर त्यावेळी कोणतीही प्रतिक्रिया वा प्रतिसाद न देता सरळ बाहेर निघून जा. व एखाद्या निवांत जागी जावून बसा, जेणेकरून तुमचं डोकं शांत होईल. मग शांत बसून विचार करा, नेमकं काय झालं आहे आणि मला ते कसं हाताळायला हवं नातेसंबंध न बिघडवता??

मित्रांनो, राग हा कड्यापेटीतील काडी सारखा असतो, अगोदर स्वतः जळतो व मग इतरांना जळवतो.

◆शांत बसा: तुम्हांला राग आल्यावर तुम्हीं जर तिथून उठून जावू शकत नसाल, तर फक्त शांत बसून रहा, काहीच बोलू नका, रागात डोक्याचं काम थांबत आणि तोंडचं काम चालू होतं, शब्दांना कात्रीपेक्षा जडत धार असते, ते समोरच्याच मन आणि तुमचं नातं दोन्हीं ही कापून टाकत. त्यामुळे तुम्ही शांत बसा, ती व्यक्ती बोलत असेल तर तिला बोलू द्या, तुम्ही शांत बसून फक्त ऐकून घ्या.

◆ मृदु शब्दात बोला: आता तुमच्या बोलण्याविषयी बघूया. काय बोलायचं, काय बोलायचं यावर लक्ष ठेवा, बॉडी लँग्वेज स्थिर असुद्या. नॉर्मल रहा. चुकीचे शब्द नका वापरू, शिवीगाळ करू नका. समजा शब्द हा एक पदार्थ आहे, तर तो तुम्हीं समोरच्याला कसा वाढाल? पद्धतशीर पणे वाढायला हवं ना?

कुणाला वाईट वाटायला नको, त्यांच्यात कडवटपणा येवू देवू नये.

◆ पाणी प्या: राग आल्यावर भरपुर पाणी प्या, त्याने तुमचा राग शांत व्हायला मदत होईल.

◆आत्मपरीक्षण करा: राग आल्यावर कुठेतरी शांत बसा आणि आत्मपरीक्षण करा. तुमची चूक नसेल तर तुम्हाला राग यायचं काही कारण नाही आणि तुमची चूक असेल तर तुम्हांला रागवायचा अधिकार नाही.

◆स्वतःला त्रास नको: काही लोकांना राग आल्यावर स्वतःला त्रास करून घ्यायची सवय असते, काहीजण तर स्वतःला जखमी पण करून घेतात. त्यामुळे त्यांचेच मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडते.

मराठीत एक म्हण आहे, अति राग आणि भिक माग. म्हणून रागावर नियंत्रण ठेवायला आपण शिकलं पाहिजे. राग आल्यावर इतरांपेक्षा स्वतःचच जास्त नुकसान होतं. मित्रांनो, तुम्हांला राग आल्यावर तुम्हीं तुमचं निरीक्षण करा, म्हणजे तुम्हांला जाणवेल की रागाची वाळवी तुम्हांला च आतून पोखरत आहे.

मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला या टिप्स नक्कीच आवडल्या असतील. तुमच्या जवळच्या व्यक्तीना जर खूप राग येत असेल तर त्यांना हा लेख share करा. Like करा comments करा , त्यामुळेच आम्हाला अजून लिहायची प्रेरणा मिळेल.

उचिता थोरवत-संत

15 

Share


Written by
उचिता थोरवत- संत

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad