Bluepadफादर्स डे – बाबासाठी एक दिवस
Bluepad

फादर्स डे – बाबासाठी एक दिवस

P
Poorva Shelar
21st Jun, 2020

Share
तुम्हाला जर कोणी विचारलं की “फादर्स डे” कधी असतो तर एक तर तुम्ही ती तारीख सांगाल किंवा म्हणाल “रोज असतो.” खरं आहे. कारण ‘बाबा’ या नावात कितीही कठोरता असली तरी त्यांच्या शिवाय आपले पानही हालत नाही, बरोबर ना! पण जसे वेगवेगळे दिवस साजरे करण्याचे आता आपल्या अंगवळणी पडले आहे तसेच एक दिवस बाबांसाठी सुद्धा आपण साजरा करतो आणि तो असतो जून महिन्याच्या तिसर्‍या रविवारी.

तर असा हा “फादर्स डे” इतर सर्व दिवसांप्रमाणे अमेरिकेतून इथे आला आहे. इतर सर्व दिवसांना आपण पश्चात्यांचं फॅड म्हणतो पण “फादर्स डे” बाबतीत तसं वाटत नाही. याला कारण आहे. आपल्या संस्कृतीने नेहमीच आईला महत्व दिलं आहे. बाबांना तेवढं महत्व दिलं गेलं नाही. आई म्हणजे कोमल हृदयी आणि बाबा म्हणजे कठोर पाषाण. आई म्हणजे वाहता झरा आणि बाबा म्हणजे त्याला घातलेला बांध. बाबा ह्या नात्याला आपण इतकं रुक्ष करून टाकलं की हळू हळू त्यातील ओलावा पुर्णपणे निघूनच गेला. अनेक लेखकांनी आपल्या बाबांविषयी लिहून सुद्धा घरात बाबा ह्या व्यक्तीला भीतीयुक्त दरारा असणारी व्यक्ती ह्या पलीकडे कोणी पहिलंच नाही. पण एखाद्या गोष्टीचा समज अति झाला की त्याला नाकारणारी एखादी व्यवस्था नक्कीच जन्म घेते. “फादर्स डे” सुद्धा असाच आपल्या भारतीयांच्या आयुष्यात पश्चिमेकडून आला आणि आपणा सर्वांना आपल्या बाबांमध्ये असलेल्या आईचा साक्षात्कार झाला.

बाबा, अप्पा, अण्णा, दादा, पप्पा, डॅडी आणि आता डॅडा. अशा अनेक बिरुदावल्या झेलत बाबा ह्या व्यक्तीने कठोर असण्यापासून कोमल होण्यापर्यंतचा प्रवास केला आहे. आपण महाराष्ट्रात पूर्वी पासूनच आईला एकेरी हाक मारत आलो आहोत पण बाबांना मात्र आदरपूर्वक “अहो जाओ” करत आलो आहोत. आज मात्र मुलं बाबांना “ए बाबा” किंवा “ए डॅडा” म्हणतात तेंव्हा ते ऐकून फार गंमत वाटते. आणि वाटतं की मुलांना आजवर घरात आईच्या रूपाने एकच मैत्रीण होती, आता एक मित्र सुद्धा मिळाला आहे. हे सर्व त्या “फादर्स डे”चं फलित आहे असं म्हणायला काय हरकत आहे!

“फादर्स डे”ची सुरुवात सुद्धा “मदर्स डे” नंतर ६० वर्षाने झाली. म्हणजे इथे सुद्धा बाबा थोडा दुर्लक्षितच राहिला आणि अनेक वेळा त्याचे प्रस्ताव टेबलावर येऊन सुद्धा जनमानसात आले नाहीत. “फादर्स डे” हा उत्सव म्हणून जरी आज आपण साजरा करीत असलो तरी याची पार्श्वभूमी फार दु:खद आहे. ६ डिसेंबर १९०७ रोजी पश्चिम व्हर्जिनियातील मोनोनगाह इथे २१० खाण कामगारांचा खाणीतील एका स्फोटात मृत्यू झाला. त्यांच्या सन्मानार्थ १९ जून १९१० रोजी श्रीमती ग्रेस गोल्डन क्लेटन यांनी खास कार्यक्रम आयोजित केला होता. पण हा कार्यक्रम रेकॉर्ड वर आला नाही. तरीही पहिला “फादर्स डे” साजरे करणारे सेंट्रल युनायटेड मेथोडिस्ट चर्च मोनोनगाहच्या फेयरमोंटमध्ये आजही आहे.

१९०९ मध्ये स्पोकनच्या सेंट्रल मेथोडिस्ट एपिस्कोपल चर्चच्या बिशपनी दिलेलं ‘मदर्स डे’ संबंधीचं प्रवचन ऐकल्यानंतर वॉशिंग्टनच्या सोनोरा स्मार्ट डॉड हिला वाटलं की मातृत्वाप्रमाणे पितृत्व देखील ओळखलं जावं. तिला तिच्या वडिलांच्या अर्थात विल्यम स्मार्ट यांच्या सन्मानार्थ “फादर्स डे” साजरा करायचा होता. विल्यम हे एक सैनिक होते आणि त्यांच्या सहाव्या अपत्याला जन्म दिल्यानंतर त्यांच्या पत्नीचं निधन झालं होतं. तेंव्हा त्यांनी सहाही मुलांचं संगोपन एकट्याने केलं. त्यांच्या आणि त्यांच्या सारख्या अन्य अनेक वडिलांचा सन्मान होण्यासाठी सोनोरा यांनी पाठपुरावा केला आणि एक मोठा काळ लोटल्यावर त्याला यश आलं.

१९२४ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कॅल्विन कूलिज यांनी “फादर्स डे” रोजी राष्ट्रीय सुट्टी असावी अशी मागणी केली पण तो प्रस्ताव धूळ खात पडला. १९६६ मध्ये जेव्हा राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉनसन यांनी कार्यकारी आदेश जारी केला तेव्हा जूनच्या प्रत्येक तिसर्‍या रविवारी “फादर्स डे” साजरा करण्याचे आदेश दिले. असे असले तरी रिचर्ड निक्सन राष्ट्राध्यक्ष झाल्यावर म्हणजे १९७२ मध्ये त्याला अधिकृत मान्यता मिळाली. नंतर तो अमेरिकेत आणि हळू हळू अनेक देशात साजरा होऊ लागला.

आज आर्थिक भार वाहण्यासाठी आई आणि बाबा दोघेही फार व्यस्त असतात. अशा वेळी मूल फार एकटं पडतं. आणि कधी बोलायचं झालंच तर सर्व गोष्टी आईकडेच किंवा बाबांकडेच बोलू शकत नाही. आपली कैफियत कोणासमोर मांडवी हे प्रत्येक कारणावर अवलंबून असतं. आईशी अनेकदा बोलता येतं पण बाबांशी बोलणं कठीण असतं. पण बाबा जर मित्र झाला तर ही दरी आपोआप मिटते आणि मुलांना आपल्या भावना मोकळ्या करता येतात. ‘फादर्स डे’ सारखे दिवस अशी जवळीक साधण्यासाठी फार उपयोगी पडतात. वयोवृद्ध बाबांसाठी सुद्धा हा दिवस महत्वाचा आहे. त्या बाबांच्या थकलेल्या हाताची काठी होऊन त्याचं म्हातारपण सुकर करणं फार फार आवश्यक आहे. यावर्षी २१ जून रोजी येणार्‍या “फादर्स डे” साठी सर्वांना शुभेच्छा.

18 

Share


P
Written by
Poorva Shelar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad