Bluepadआला उन्हाळा, फळांचे सरबत प्या....
Bluepad

आला उन्हाळा, फळांचे सरबत प्या....

J
Juhi Jadhav
26th Apr, 2020

Shareउन्हाळा लागला की आपल्याला जास्तीत जास्त थंड पाणी पिण्याची गरज भासू लागते.
मग हाताशी काही मिळालं नाही की आपण सरळ दुकानात मिळत असलेली आणि गुणवत्तेच्या मानाने खूपच महाग असणारी पेयं घेऊन येतो. खरंतर ही शरीराला नाही तर नुसत्याच जिभेला थंडावा देतात. कारण तुम्हाला माहीत असेलच की ही पेये एकदा घेतली की ती तहान भागवत नाहीत, उलट तहान न भागल्यामुळे आणि त्यात असलेल्या सॅक्रिनची चव जिभेवर रूळल्यामुळे तुम्ही ती पेये जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ती हातावेगळी करत नाहीत. तेच साधं पाणी प्यायलं तर असं होतं का? नाही. याचाच अर्थ आपण ती रसायनं मिश्रित पेये पिऊन आपल्या जिभेचे चोचले पुरवतो फक्त, बाकी काही नाही. तर हे झालं काय पिऊ नये ह्याचं चर्‍हाट. मग काय प्यावं? तर यावर अगदी सोप्पं उत्तर म्हणजे ताज्या फळांचे रस किंवा फळांचे गर काढून,
ते साठवून केलेली सरबते.
प्रत्येक मोसमात येणारी फळं किंवा भाज्या ही त्या त्या मोसमात होणार्‍या आजारांवर गुणकारी असतात हे तर तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे उन्हाळ्यात येणार्‍या सर्व फळांची सरबतं ही तुमच्या शरीराला नुसताच थंडावा देत नाहीत तर उकड्यामुळे किंवा उन्हामुळे होणार्‍या अनेक विकारांवर देखील ही गुणकारी असतात. यापैकीच काही सरबतांविषयी आपण जाणून घेऊया.

कैरीचं पन्हं :
उन्हाळ्यात येतो तो फळांचा राजा. पण तो येण्याआधी बाजारात येते कैरी. कैरीची सालं काढून , तुकडे करून त्यावर मीठ चोळून वर थोडासा चाट मसाला भिरभिरवला तर... तोंडाला आलेलं पाणी पुसा आधी. तर हेच की जीभ किती ही चाळवली ना तरी जास्त खाऊ नका. कारण आंबा प्रकृतीने उष्ण आहे पण कैरी अगदी थंड असते. अर्धी खाल्ली ना तरी लगेच सर्दी पकडेल. आणि आता कोविड – १९ च्या प्रकोपात सर्दी होऊ देणं योग्य नाही. त्यामुळे याचं पन्हं करून प्यावं. कैरी उकडून घेतलेली असल्यामुळे तिच्याने सर्दी होत नाही. पण ते पन्हंसुद्धा बेतानेच प्या बरं. चला बघूया कैरीचं पन्हं कसं बनवतात.

साहित्य : ३ कैर्‍या, अर्धा कप गूळ, एक चमच वेलची पावडर अर्धा चमच मीठ.

कृती : तिन्ही कैर्‍या स्वच्छ धुवून त्या कूकरमध्ये २ शिट्या लावून किंवा भांड्यात पाणी घेऊन उकडून घ्याव्यात. कैर्‍या थंड झाल्यावर त्यांची सालं काढून घ्यावीत आणि त्यांचा गर एका भांड्यात काढून घ्यावा. आतील कोय टाकून द्यावी. ह्या गरात गूळ आणि वेलची पावडर घालावी आणि त्यांना एकजीव करण्यासाठी मिक्सरमध्ये फिरवून घ्यावं. गरज असल्यास ४-५ चमचे पाणी घातलं तरी चालेल. मग एका भांड्यावर गाळणी ठेवून तो रस गळून घ्यावं. गाळणीवर राहिलेला गाळ बाजूला ठेवा.

काढलेला रस एका बॉटलमध्ये भरून ठेवा. त्यात बॉटल भरून पाणी ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवून द्या. जेंव्हा प्यायचं असेल तेंव्हा १ भाग रस आणि ३ भाग पाणी असं मिश्रण करून प्या. थोडं अधिक स्ट्रॉंग हवं असेल तर एकास दोन अशा रस आणि पाण्याच्या गुणोत्तराने सरबत बनवा. गाळणीवर राहिलेला गाळ सुद्धा तुम्ही आंब्याच्या चुंद्याप्रमाणे त्यात थोडं लाल तिखट आणि किंचित मीठ  घालून जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता.

कोकम सरबत :
या मोसमात रातांबे ही येतात. राताम्बे सुकवून त्यापासून कोकम बनवले जातात. कोकम हे साधारणपणे कोकणात जेवणात वापरले जातात पण त्यात खूप थंडावा असल्यामुळे त्यांचं सरबत ही खूप लोकप्रिय आहे.

साहित्य : अर्धी वाटी कोकम, अर्धी वाटी गूळ, एक चमच मीठ, १ चमच जिरा पावडर, अर्धा चमच काळीमिरी पावडर.

कृती : कोकम एका भांड्यात घेऊन त्यात अर्धं भांडं पाणी ठेऊन उकळवायला ठेवा. हे पाणी अर्ध्याहून कमी होईपर्यंत उकळवा. यातील कोकम वेगळे करून पाणी गळून घ्या. त्यात गूळ आणि बाकी जिन्नस घालून एकजीव करून घ्या. हे मिश्रण एका ग्लासात ३ चमच घ्या आणि बाकी ग्लास थंड पाण्याने भरा. आवडत असल्यास वरून जिरा पावडर भिरभिरवा. झालं कोकम सरबत तयार.

संत्री आणि अननस सरबत :
संत्री आणि अननस आजकाल पूर्ण वर्षभर मिळू लागली आहेत. ही दोन्ही फळं क्षरिय फळात मोडत असल्यामुळे त्यांचे एकत्र सरबत खूप रुचकर लागते.

साहित्य : संत्री आणि अननसाचे तुकडे बिया काढलेले, मीठ, थोडा गूळ, जिरा पावडर.

कृती : आधी अननसाचे तुकडे मिक्सरमध्ये लावून घ्या मग त्यात संत्र्याचे तुकडे लावा. त्यातच गूळ, मीठ, जिरा पावडर मिक्स करून घ्या. हे मिश्रण गाळून घ्या. अर्धा ग्लास हा रस आणि अर्धा ग्लास पाणी घेऊन हा रस प्या.

ह्या सरबतांमध्ये साखरेऐवजी गूळ वापरला आहे. कारण साखर ही मुळात उष्ण प्रकृतीची असते. ती सरबतात घातल्यामुळे ह्या सरबतांचा उद्देश पूर्ण होत नाही. त्यामुळे गूळ वापरावा. चला उन्हाळ्याची मजा घ्या....

12 

Share


J
Written by
Juhi Jadhav

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad