Bluepadजिओ मेरे फेसबुक !
Bluepad

जिओ मेरे फेसबुक !

Roomi
Roomi
26th Apr, 2020

Shareसोशल मीडियामधील लोकप्रिय प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकने भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओमध्ये ९.९९ टक्के भागभांडवल खरेदी करण्याचे जाहीर केले असल्याचे २१ एप्रिल २०२० रोजी मुकेश अंबानी यांनी सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर फेसबुकने जिओसोबत एक करार केला असून तब्बल ४३ हजार ५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक जिओमध्ये करण्याची माहिती दिली. हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर फेसबुक रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक करणारी सर्वात मोठी शेअर होल्डर कंपनी ठरेल असे सांगितले जात आहे.
या करारामुळे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजवरील कर्ज आणखी कमी होईल आणि मार्क झुकरबर्ग यांच्या फेसबुकला एक मजबूत प्लॅटफॉर्म मिळेल. फेसबुक आणि जिओ विविध प्रोजक्टवर एकत्रितपणे काम करणार आहेत, ज्यामुळे देशभरात व्यवसायाच्या संधी निर्माण होतील, असं दोन्ही कंपन्यांनी आपल्या वक्तव्यांमध्ये म्हटलं आहे. रिलायन्स जिओनं बाजारात येताच अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले होते. तसंच केवळ ४ वर्षांच्या कालावधीत रिलायन्स जिओनं ३८ कोटी ग्राहकांचा टप्पा गाठला होता. जिओने गेल्या काही वर्षात दूरसंचार क्षेत्रात एक नवीन वातावरण निर्माण केल्यानंतर ब्रॉडबँड आणि जिओ सेटटॉप बॉक्स आणून नव्या क्षेत्रातही पदार्पण केलं होतं.
भविष्यात लवकरच जिओचा नवीन डिजीटल प्लॅटफॉर्म जिओ मार्ट आणि फेसबुकचाच एक भाग असलेल्या व्हाट्सअॅपकडून जवळपास ३ कोटी किराणा दुकानांमध्ये डिजीटल व्यवहार होईल. म्हणजेच तुम्ही दररोज लागणाऱ्या वस्तूंची डिलिव्हरी जवळच्या दुकानातून वेगाने मागवू शकता, असं मुकेश अंबानी म्हणाले. डिजीटल तंत्रज्ञान वापरुन छोट्या किराणा दुकानदारांनाही त्यांचा उद्योग वाढवता येईल आणि यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील, असंही ते म्हणाले. जिओ मार्ट आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून देशात आणखी रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं फेसबुकनेही म्हटलं आहे.
भारतीयांची सेवा करण्यासाठी आणि डिजीटल परिवर्तनासाठी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्यासोबत भागीदारी केली आहे, अशी प्रतिक्रिया मुकेश अंबानी यांनी दिली. करोना संकटानंतर भारतीय अर्थव्यवस्था सुरळीत होईल आणि अत्यंत कमी वेळात पूर्वपदावर येईल याची अपेक्षा आहे. या परिवर्तनासाठी या गुंतवणुकीचा खरोखर फायदा होईल, असंही ते म्हणाले.
या करारामुळे भारताबद्दलची वचनबद्धता अधोरेखित होते, असं फेसबुकने म्हटलं आहे. 'महिन्याला ३८.८ कोटी युझर्ससह फेसबुकसाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ असून फेसबुकच्याच व्हॉट्सअॅपचे भारतात एकूण ४० कोटी युझर्स आहेत. सध्याच्या परिस्थितीत हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण, छोटे उद्योग प्रत्येक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे असतात आणि त्यांना मदतीची गरज असते. भारतात ६ कोटींपेक्षा जास्त छोटे उद्योग आहेत आणि लाखो लोकांना यामुळे रोजगार मिळतो', असं मार्क झुकरबर्ग म्हणाले.
या कराराचा फायदा रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना झाला आहे. त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. ते पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी चीनचे व्यावसायिक जॅक मा यांना मागे टाकत पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार एका दिवसात त्यांच्या संपत्तीत ४६९ कोटी डॉलर्स म्हणजेच ३४ हजार कोटी रूपयांची वाढ झाली आहे.
ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार २३ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजेपर्यंत मुकेश अंबानी यांच्याकडे एकूण ४ हजार ९२० कोटी डॉलर्स म्हणजेच ३.७१ लाख कोटी रूपयांची संपत्ती होती. एका दिवसात त्यांच्या संपत्तीत तब्बल २२ हजार ९७५ कोटी रूपयांची वाढ झाली आहे. फेसबुकसोबत झालेल्या करारानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्येही १० टक्क्यांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
ह्या गुंतवणुकीनंतर जिओ प्लॅटफॉर्मची व्हॅल्यू ४.६२ लाख कोटी रूपये झाली आहे. कंपनीच्या व्हॅल्यू प्रमाणे पाहिलं तर शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या कंपन्यांपैकी केवळ ४ कंपन्या या रिलायन्स जिओच्या पुढे आहेत. त्यापैकी एक रिलायन्स जिओची पॅरेंट कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज हीदेखील आहे. त्याव्यतिरिक्त टीसीएस, एचडीएफसी बँक आणि हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्या जिओच्या पुढे आहेत. २२ एप्रिल २०२० रोजी बुधवारी स्टॉक मार्केट सुरू होताच रिलायन्सचे स्टॉक १३२०.५५ रुपयांसह ६.८ टक्क्यांनी वधारलेले होते. जिओची मालकी ही रिलायन्सकडेच राहणार आहे. भारतीय टेक क्षेत्रातील ही सर्वात मोठी परकीय गुंतवणूक असल्याचंही रिलायन्सने सांगितलं.
कोरोनाच्या सवाटात अर्थकारण डगमगलेलं असताना हा करार अर्थव्यवस्थेला नक्कीच ऊर्जा देणारा आहे.

16 

Share


Roomi
Written by
Roomi

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad