बैलपोळा ..एक आठवण आणि आत्मचिंतन......||
बैलपोळ्याच्या उत्सवानिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. 🙏
¶ सिंधु संस्कृतीमध्ये शेती हेच एकमेव उत्पन्नाचे, उपजिवीकेचे महत्त्वाचे साधन होते. त्या काळापासूनच बळीराजा, शेती आणि बैल यांचे अतुट नाते आहे. भारतीयांचा महान पूर्वज असलेल्या भगवान शिवाचे वाहन नंदी आहे, हे या संदर्भात लक्षणीय आहे. भगवान शिवाला पशुपती असे गौरवाने म्हटले जाते, यावरून एकमेकाप्रती असलेले जिव्हाळ्याचे आणि परस्परसहकार्याचे नाते स्पष्ट होते.विशेषत्वाने बैलांविषयी आणि त्या जोडीने इतर पशुंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने पोळा हा सण साजरा करण्याची प्रथा आहे.
¶ बैलपोळ्याच्या माझ्या आठवणी आजही तितक्याच ताज्या आहेत...मराठी शाळेत असतांना बैलपोळ्यावर लिहीलेला निबंध किंवा बैलपोळ्याचे काढलेले चित्र.. हा माझा बिनबैलाचा पहिला बैलपोळा !! नंतर मात्र बैलपोळ्याच्या खरीखुरी धमाल अनुभवली.......घरच्या गव्हाणीला दोन बैल होते.. एक देवळ्या अन् दुसरा बारश्या... काळ्या रंगाचा देवळा एकदम चपळ आणि अवखळ तर तपकीरी रंगांचा बारश्या एकदम संथ आणि धिरगंभीर... त्याला पळवायला लावणे माझ्यासारख्या नवशिक्याच्या आवाक्यात नव्हते....पण देवळ्या-बारश्याची जोडी आमची शान होती... श्रीमंती होती !! पोळ्याच्या दिवशी त्यांनी फुल पगारी सुट्टी असायची !! सक्काळी सक्काळीच यांना रानात चरायला न्यायचे... विहीरीवर नेऊन त्यांचे अंग दगडाने घासून साबण लावून त्यांना आंघोळ घालायची.. ही पोळ्याच्या सणाची सुरवात !!
¶ खरेतर सणाची लगबग लोणी येथील आठवडेबाजारा पासूनच सुरु व्हायची.... बैलांच्या शेपटीच्या केसांना गोंड्यांचा आकार देणे ....शिंगे साळणे , शिंगाला पितळी छंबी बसवण्यासाठी शिंगाला भोक पाडून छंबी बसवणे....पायाला नाल ठोकणे...... दोन दिवस अगोदर बैलांचे खांदे तेल लावून मळणे ....घरातल्या पेटीत पडलेले पितळी तोडे, घोगर माळा बाहेर काढून घासून चकाकीत करणे.... एक आठवडा अगोदर पोळ्याचा बाजार होणार......!!
बाजारातील खरेदी म्हणजे.....
नवीन माथवटी, नवीन कासरा, वेठन, चवर, हिंगूळ / गेरु , शिंगाचे गोंडे, चवर, कवड्यांची माळ , पायात घालण्यासाठी गजरे, शिंगाना देण्यासाठी रंग , पाठीवर टाकण्यासाठी झुल, म्होरकी, बाशिंग, एक नव्हे अनेक......झालर, पायातील तोडे, नवीन चाबूक, घुंगाराच्या काठ्या, नक्षीदार काचेचे किंवा चिनी मातीचे रंगीत मणी असलेल्या माळा, वेगवेगळ्या आकाराचे फुगे, बैल सजवण्याची मौज काही वेगळीच ना ना रंग, पाठीवर काढलेली चित्रे, नांव, हाताचे ठसे, झाकणाचे ठसे, विविध रंगी फुलं, नवे कासरे.... काय काय सांगावे !!
लहानपणी लहान वासरूच (... तेही नसले तर नाहीतर कोंबडी तर असायचीच !! 😝 ) वाट्याला यायचे आणि त्याला असं काही रंगवायचो कि ओळखू येणे मुष्कील .....!! 😝
आंघोळीनंतर बैलांना घरी आणून त्यांना मदन वाढले जात असे..... आणि नंतर बैल सजवण्यास सुरूवात होत असे.. सर्व आभूषणे घालून बैल सजवले जात....
¶ एकदा ही सारी सजावट करुन झाली की गावाच्या वेशीजवळ सर्व बैल आणले जात असत ... मानाची बैलजोडी वेशीतुन गेल्यानंतर इतर सर्व बैलजोड्या गावातील मारुती मंदीर, गावाची वेस, महादेव मंदीराला सनई चौघड्याच्या मंजुळ स्वराच्या तालावर प्रदक्षिणा घालीत असत .... कोणाचा बैल कित्ती देखणा आणि सुंदर आहे याची नकळत टेहळणी व्हायची.... मारक्या बैलांपासून सुरक्षित राहण्याची कसरत करावी लागायची....एखाद्याचा बैल शेपटी पिरगाळुनही पळत नसेल तर हास्याचे फवारे फुटत असत..... बैलांची अशी ही पळवापळवी करुन त्यांची वरात सायंकाळी घरी येत असे......
घरी आल्यावर दारात जू ठेवले जात असे...घरधनीन बैलांचे व सोबतच्या बैलधन्याचे पाय धुवून ओवाळून मनोभावे पुजा करायची.....आरती करायची..... आल्या बरोबर त्याला सुपामध्ये आणलेले धान्य खायला दिले जाई...... गंध अक्षदा लावून पंचारती ओवाळली जाई......बाजूला एखाद्या दगडावर श्रीफळ वाहीला जाई...........नंतर पुरणपोळी पंचपक्वान्नाचे ताट त्याला सन्मानाने भरवले जाई.......आणि त्यानंतर घरातील इतर सर्वजण एक पंगत धरुन पंचपक्वान्नाचा आस्वाद घ्यायचे.......आणि आठवडाभर चाललेली पोळा सणाची धांदल संपायची !!
¶ आधुनिक काळात शेतीसाठी बैलांची जागा घेणारी यांत्रिक साधने आली तरी, या कृषीप्रधान देशात बैलपोळ्याचे महत्त्व परंपरात टिकून आहे.........पिढीजात शेतकरी सध्या घरी बैल नसले तरी मातीचे बनवलेले पाच बैल खरेदी करून त्यांची पुजा करतात.....त्यांना नैवेद्य अर्पण करतात ......पुजा विधी करुन कृतज्ञता भाव व्यक्त करतात..... चाळीस पंचेचाळीस वर्षापुर्वी दोन बैलांकरवी केलेल्या नांगरटीमुळे हाताला पडलेले घट्टे अद्यापही मिटलेले नाहीत.....आणि ते मिटुही नयेत म्हणून !! कारण बैलांची मान चोळायची कशी ? ....बैल येठायचा कसा काय ?...... त्याला तासात ठेवायचे कसे ? .... त्याचे अश्रु ओळखायचे कसे ? ....दोन बैलांचा, चार बैलांचा, सहा बैलांचा नांगर म्हणजे काय ? औत येठायचे कसे, गाडीची साकण ध्यायची कशी ? पाभरीचं चाडं गाठायचं कसं ? .. पेरताना बैलांचा वेग व बियाण्याचा मुठीचा वेग सांभाळायचा कसा ? हे सारं आता इतिहासजमा होणार.........आणि दिनदर्शिकेतील पोळा फक्त एक रूढी म्हणून मातीच्या बैलांची पुजा करून सोपस्कार करण्यापुरताच उरणार.....स्वप्नवत होणार !!
¶ शेतकऱ्याला बळीराजा, पोशिंदा म्हणायचे याचे मला लहानपणी कोण अप्रुप वाटायचे.....!!😝 बैलजोडी, नांगरणी, पेरणी कोळपणी, मळणी हेच माझे विश्व असायचे. त्यामुळे मला "बळीराजा" ही एखादी उपाधी किंवा सन्मानजनक संबोधन वाटायचे..!! परंतू आता अलीकडे कुठे मला बळीराजा या शब्दाचा, खराखुरा अर्थ समजायला लागलाय......"बळीराजा म्हणजे पहिल्यांदा सन्मानपूर्वक आणि विधिवत ज्याचा "बळी" दिला जातो, तो म्हणजे बळीराजा" .... "लाख मरो पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे"...असे कानी पडल्याचे आठवतेय पण इथे "पोशिंदा" मेला तरी चालेल पण लाख जण जगले पाहिजे, एवढा टोकाचा बदल झालाय !!
¶ आजकाल तर बळीराजासहित, त्याच्या कोणत्याही उत्पादनाला, काहीच किंमत राहिलेली नाही वा कुणाला त्याचे मोलही नाही........ उलट तो समाजाचा एक उपेक्षित, केविलवाणा, उपकृत घटक ठरला आहे. भले मग तो आंदोलन करो, जलसमाधी घेवो, उपोषण करो, निषेध मोर्चा काढो वा शेवटी आत्महत्या करो.....एवढेच काय त्याच्या आत्महत्येबाबतही, वातानुकूलित हस्तिदंती मनोऱ्यात बसुन, मेजवानी झोडता झोडता, कुत्सित भावनेने, हसत खेळत तर्क-कुतर्क लढवले जातात !!!! त्यामुळे "बळी"राजाची कुणाला काही पडलेली नाही.......शेतीमालाला भाव आला की, परदेशातून माल आयात करुन भाव पाडणे नाहीतर निर्यात बंदी करुन शेतमाल रस्यावर फेकायला भाग पाडणे, हेच आमचे पुरोगामी धोरण आहे....त्यामुळे काही वर्षांनी शेतकरी, बैल, बैलपोळा प्रदर्शनीय वस्तु ठरुन गोष्टीरुपात राहिल्या तर, आश्चर्य वाटु नये !!
¶ बैलपोळा साजरा होत असताना, या गंभीर विषयाबाबत आत्मचिंतन होऊन, यात काही आशादायक बदल व्हावा, हीच अंतर्यामीची अपेक्षा आहे.....🙏 🙏
¶ तुर्त तरी परंपरेप्रमाणे, बैलपोळ्याच्या निमित्ताने सर्व शेतकरीबांधवांना (बळीराजा) हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏
¶ श्री. उत्तमराव निर्मळ सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग व परिवार