Bluepad | Bluepad
Bluepad
महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक श्री शेषराव मोरे यांना खुले मानपत्र
उमाकांत जोशी
12th Sep, 2023

Share

*अप्रिय सत्य लिहणारे - शेषराव मोरे यांना खुले मानपत्र
मा. शेषराव मोरे,
स. न,
सर्वप्रथम आपण अमृतमहोत्सवी वर्षात पर्दापण केल्या बद्दल आपले अभिष्टचिंतन. सर, आपली चौथ्या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्या बरोबर आम्हा नांदेड वासियांना कोण आनंद झाला होता. शिवाय संपूर्ण महाराष्ट्राच्या साहित्य पूजकांच्या भुवया ही वर झाल्या होत्या. 'खरे बोलावे' हा बालवयात आईच्या मांडीवर बसून शिकलेला 'पहिला पाठ' आपण साहित्य जीवनात ततोतंत गिरविला आणि अनेक अप्रिय सत्य जगासमोर आणले. आपण साहित्यामध्ये केलेले 'सत्यमेव संशोधनं येणाऱ्या पिढीला सत्य साहित्य-संशोधन काय असते? याची सतत प्रेरणा देत राहिल. विज्ञानाच्या संशोधनाला जेवढे महत्व मानवी जीवनात आहे. तेवढेच महत्व आपण केलेल्या साहित्य संशोधनाला आहे.कै. अनंत भालेराव, कै. नरहर कुरूंदकर, कै. सुधारकराव डोफोडे यांच्या पश्चात आपल्या एवढा चिकित्सक संशोधक संपूर्ण महाराष्ट्राच नव्हे तर भारतातही सापडणे कठीण आहे. भारताच्या फाळणी संदर्भातील आपले रोखठोक अप्रिय पण सत्य जगासमोर आल्याबरोबर वाचकांची अवस्था 'उघडा डोळे, वाचा नीट' अशीच झाली. फाळणी झाली नसती तर, या देशाची काय अवस्था झाली असती. याचे वास्तव अक्षरचित्रच आपण जगासमोर आणले. त्यामुळे गांधीजींनीच फाळणी केली म्हणणाऱ्या अतिशहाण्यांचे डोळे खाडकन् उघडल्या गेले. विचारवंत कसा असतो ? विचार कसा करायचा असतो.? याचे चालते बोलते विद्यापीठ आपण आहात.काश्मीरला आपण 'एक शापित नंदनवन' म्हटले आहे. काश्मीर नंदनवन असूनही शापित का आहे? याचे जिवंत संशोधन आपण जगासमोर मांडले आहे. कठोर धर्म चिकित्सा न करता वास्तववादी चिकित्सा करुन आपण मुस्लीमांची मानसिकता जगासमोर मांडली आहे.अभ्यासा सोबत पुरावे देणे ही आपली लेखन कौशल्याची आगळी वेगळी हातोटी, ब्रह्मांडामधील अनेक रहस्ये एका नंतर एक उलगडत जावी तशी साहित्य विश्वातील रहस्ये आपण जगासमोर उलगडली. सावरकरांचा बुध्दीवाद, काश्मीर एक शापित नंदनवन, विचार कलह, अप्रिय पण, मुस्लीम मनाचा शोध, प्रेषिताचे चार आदर्श खलिफा, १८५७ चा जिहाद अशी एका पेक्षा एक वैचारिक प्रक्षेपणास्त्र आपण साहित्य विश्वात प्रक्षेपित केली. केवळ खळबळ माजवून आपल्या पुस्तकांची विक्री वाढविणे हा धंदा आपण कधीही केला नाही. अज्ञात राहिलेली, ज्यावर कुणीही बोलण्यास तयार नसणारी साहित्य रहस्ये आपण सहज-सोप्या भाषेत उलगडून' दाखविली आहेत. याचा साहित्य सेवकांना आनंदच वाटेल.आपण लिखाणाला वेळ मिळावा म्हणून अक्षरशः गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली. त्याग तो सुद्धा केवळ साहित्य सेवेसाठी, सत्य सांगण्यासाठी काय असतो हे आपणाकडून नव संशोधनवृत्ती असलेल्या साहित्यिकांनी शिकावे. वैचारिक ग्रंथ लेखन अलीकडे दुर्मिळ होत चालले आहे.इंटरनेट, फेसबुक वरील माहितीवर आधारित वैचारिक उथळ मत मंथन सध्या पहावयास मिळते आहे. सत्य सांगण्यासाठीचे संशोधन दुरापास्त होत असल्यामुळे 'सत्यमेव जयते' च्या जयघोषाचे काय होईल याची चिंता वाटते. 'साधी रहाणी आणि उच्च विचार' हा मुहावरा केवळ आपल्यासाठीच तयार झाला की काय? असे आपल्या ज्ञानी मूर्तीकडे पाहिले की वाटते. आपल्या साहित्यात सत्याची उग्रता आहे, पण स्वभावात कमालीची नम्रता आहे, असे व्यस्त व्यक्तिमत्त्व दुर्मिळच असते. अनेकांच्या घरात डायमंड सेटपासून डायनिंग सेटपर्यंत सर्व काही असते. परंतु आपल्या घरात मौल्यवान ग्रंथाचा सेट पहावयास मिळतो. त्यामुळेच आपण खरे श्रीमंत लेखणीधर आहात. पुण्या-मुंबईलाच साहित्यकांची मक्तेदारी असते. पुरस्कारांवर त्यांचाच वरचष्मा असतो. ही परंपरा आपण आपल्या वैचारिक लिखाणाने खंडीत करुन पुरस्कारांना मराठवाड्यात यायला भाग पाडले. आपल्यामुळे अनेक पुरस्कार मोठे झाले. विषयात काही शेष (शिल्लक ठेवायचेच नाही) या आपल्या लिखाण स्वभावामुळे अनेक पुरस्कार आपला शोध घेत मराठवाड्यातील नांदेड मधील नगरात येत आहेत, आले आहेत. आपल्या जाज्वल्य लेखणीमुळे आणखी अनेक सर्वोच्च पुरस्कार या नंदीग्राम नगरीत नक्कीच आपल्याला भेटायला येईल, यात शंकाच नाही. ज्या सावरकरांनी जेथे जन्मठेपेची शिक्षा भोगली त्याच राज्यात आपण विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. हाही एक योगायोग म्हणावा लागेल. कारण खरे सावरकर आपणच जगाला दाखविले आहेत... आपले अभिष्टचिंतन, पुढील चिंतनासाठी.
*-उमाकांत जोशी*, नांदेड मो.8208623188/9422186337

0 

Share


Written by
उमाकांत जोशी

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad