सुर्योदय – सूर्यास्त
दररोज सकाळी फिरायला गेल्यावर वासनगाव नाल्याच्या थोडं पुढं टेकावर गेलं की पूर्वेला असलेल्या ल. पा. तलावाच्या पाण्यात, चकाकणारे सूर्यबिंब आणि सूर्योदय पाहणं मला खूप आवडतं कारण यात अष्टधा प्रकृतीच दर्शन होत. आजूबाजूचा निसर्ग पहात थोडा विसावतो .या अष्टधा पैकी एक असलेली “बुध्दी” ची कसरत सुरु होते.भगवत गीतेतील सातव्या अध्यायातील दोन श्लोक आठवतात
भूमीरापोनलो वायु: खं मनो बुद्धिरेव च।
अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ।।४।।
अपरियमितस्त्वन्याम प्रकृतिम विद्धि मे पराम ।
जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत ।। ५।।
प्रश्न पडतो की,या पंचमहाभूतां पासून ही समस्त सृष्टी तयार झाली हे आपल्या पूर्वजांनी कसं शोधलं असेल ? एरवी एकमेकांना फटकुन असणारी ही पंचमहाभूतं प्राणी मात्राच्या शरीरात एकोपाण्याने कशी राहातात? आपल्याला हा प्रश्न त्याचा एकोपा बिघडल्यावर काढलेले ,स्वतः चे पॅथॉलॉजी लॅब चे रिपोर्ट पाहिल्यावरच पडतो.आपलं शरीर पंच महाभूतांनी बनलंय हे माहिती होत. मग डॉक्टर च्या सल्याने महागडी औषधं घेतली की, लोह,झिंक,क्षार ही पृथ्वी तत्व ताळ्यवर येतात .पाणी भरपूर प्याला सांगीतल की जल तत्वाची जाणीव होते.योगा क्लास लावुन श्वसनाचे व्यायाम केले की वायु तत्वाचे महत्व कळत. थोडं कोवळ्या उन्हात फिरायचा सल्ला मिळाला की अग्नी तत्व कळत .या चार तत्वांच संतुलन राखता राखता भरावी लागणारी मोठ्या रकमेची बील भरताना आकाशातला बाप्पा आठवतो आणि नजर आकाशा कडे जाते.पण डॉक्टर जर तुमचा मित्र असेल, डॉक्टर कासले सारखा तर या पंचमहाभूतां बरोबर उर्वरित तीन तत्वांचाही निरिक्षण करून तुमच्यासाठी अन्य औषधा बरोबर प्रेम आणि मनमुराद हसणं प्रिस्क्राइब करतो.
पंचमहाभूते दृश्य आहेत त्यावर विचार संशोधन होऊ शकतं पण पाचव्या श्लोकातील “ परा प्रकृती”,जी ह्या अष्टधांची साम्यावस्था, ज्याला जीव दशा म्हटलं आहे , ही कल्पना कशी सुचली असेल ? आणि जीवाच्या पलीकडे असणारे शिव ही कल्पनेची आणखी एक उत्तुंग उडी आहे .विनोबा भावे म्हणतात मानवी संस्कृतीच्या प्रवासातील “ आत्मा ” ही संकल्पना म्हणजे मानवी बुद्धी ची सर्वात उत्तुंग झेप आहे.गीतेतील सातवा अध्याय ज्ञान विज्ञान योग म्हटला जातो यातील परा आणि अपरा प्रकृती चे वर्णन वेग वेगळ्या नावांनी पुढील अध्यायात क्षेत्र-क्षेत्रज्ञ,प्रकृती-पुरुष,क्षर पुरुष,अक्षर पुरुष अशा नावांनी येत. याचा शेवट पंधराव्या अध्यायात “ क्षरा ,अक्षरा हुनी वेगळा आणि उत्तम “ अशा पुरुषोत्तम योगात होतो. अशा बऱ्याच बौद्धिक कोलांट्या उड्या माझं मन मारत असतं पण शांत होत नाही.आता वयाच्या साठी नंतर शारीरिकच काय बौद्धिक व्यायाम सुद्धा झेपत नसतो."उगाच ठेवीजे माथा हेचि भले " म्हणत नातवंडा बरोबर खेळलेल बरं. तसच झालं परवा, माझी नात समृध्दी बरोबर कविता म्हणण्याचा नेहमीचा कार्यक्रम चालू असताना, ग. ह. पाटील यांच बालगीत म्हणताना सर्व प्रश्नांची उत्तरं मिळालीत
देवा तुझे किती
सुंदर आकाश
सुंदर प्रकाश
सूर्य देतो ।।
सुंदर चांदण्या
चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर
पडे त्याचे ।।
सुंदर ही झाडे
सुंदर पाखरे
किती गोड बरे
गाणी गाती ।।
सुंदर वेलींची
सुंदरही फुले
तशी आम्ही मुले
देवा तुझी ।।
भक्ती ज्ञानाला मात देते ती अशी.निसर्गा कडे ,या सृष्टी कडे अगदी मोकळ्या मनाने पहा ,फार विचार करू नका समर्पित भावनेने त्या विधात्याच्या रचनेचा आनंद घ्या .त्यासाठी पर्यटनालाच जायलाच हवं असं काही नाही. नियमित सकाळ संध्याकाळ पायी फिरायला जावुन सूर्यादय आणि सूर्यास्त पाहिले तरी काम होईल.
किशोर महाजन
18-07-2023