नेहरू नाव कसे पडले :-
जवाहरलालजींचे मूळ घराणे काश्मीर शी संबंधित होते. त्यांचे पूर्वज काश्मिरी पंडित होते.
ते १७१६ मध्ये दिल्लीत आले. ते चांदणी चौकात एका नहराजवळ स्थायिक झाल्यामुळे त्यांचे घराणे नेहरू या नावाने प्रसिद्ध झाले. जवाहरलालजींचे आजोबा गंगाधर नेहरू काश्मिरी ब्राह्मण होते. गंगाधरजी नेहरू हे दिल्लीत पोलीस अधिकारी होते. जवाहरलालजींचे वडील मोतीलाल नेहरू प्रसिद्ध वकील आणि समाजसेवक होते.
मोतीलालजी आपल्या वकिलीच्या व्यवसायासाठी अलाहाबाद (आजचे प्रयागराज) येथे स्थायिक झाले. हळूहळू वकिली व्यवसायात त्यांचे नाव मोठे झाले. समाजात ते नावारूपाला आले. त्यांची प्रतिष्ठा वाढली. वकिली व्यवसायात त्यांची खूप कमाई होऊ लागली.मोतीलालजींचे लग्न स्वरुपरानी यांचेशी झाले होते.मोतीलाल नेहरू यांना तीन अपत्य होती. सर्वात मोठे जवाहरलाल जे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. दुसरे अपत्य म्हणजे विजयालक्ष्मी ज्या भविष्यात संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या , आणि तिसरे अपत्य म्हणजे कृष्णा हथिसिंग ज्या सूप्रसिद्ध लेखक म्हणून नावारूपाला आल्यात, त्यांनी नेहरू कुटुंबातील व्यक्तींवर अनेक ग्रंथ लेखन केले.