Bluepad | Bluepad
Bluepad
तुझी आठवण आणि पाऊस
S
Sanchit Kamble
16th Jul, 2023

Share

नमेचि येतो पावसाळा...सोबत तुझी आठवण .
तुझी आठवण आणि पाऊस
......थांबवू शकत नाहीत आठवणी . त्या असोत सरी पावसाच्या किंवा मग तुझ्या मऊशार गालांवरून फिरविलेल्या बोटांच्या . हलक्याच स्पर्श सोडून जातात त्या आठवणी .
बेधुंद होऊन पावसाचे तुषार सर्वांगावर झेलतो मी , नेहमीच. प्रत्येक थेंबांगणिक मनपाऊस अजूनही बहरून येतो . तुफानपणे बरसतो.तो काळजी करत नाही.जगाची , सभोवतालची. त्याला फक्त दिसतो स्वत:चा स्वत:शीच सुरू असलेला प्रेमभाव ....पावसाप्रतिचा.
तुही तशीच पहिल्या पाऊस सरींसारखी घेतेस हातात हात.तुझे हात जणू उसवतात मनाच्या गोड कप्प्यांच्या प्रीतभावनेला . प्रस्फुटित होतात त्या तुझ्या सुहास्य वदनाने. श्वासांवर मग राहत नाही नियंत्रण.चेतवतात ते शब्दांना .चेतवतात ते सर्वांगाला ......
कुठेतरी पावसाच्या कवेत जाण्याचा विचार मनात येतो.तुला घेतल्याशिवाय पाऊल निघतच नाही. दूर कुठेतरी जिथे साम्राज्य असेल फक्त कोसळणा-या जलधारांचे . धरती आणि पाऊस यांच्या निस्सिम प्रेमाची आळवणी करणारे ते क्षितीज असेल आणि आपण दोघे असू त्या क्षितीजाच्याही पलिकडे.जिथे असतील फक्त प्रीतसोहळे..दोघांचे...
...ग्रीष्म दिवसांच्या रखरखीत झळांना कंटाळून पहिल्या थेंबांची आतुरता प्रत्येक त्रासिक मनाला असतेच. वाट असते त्या प्रत्येकाला पहिल्या पाऊस बहराची.मग तुझी आस माझ्या मनाला सतत असते.विरहाच्या त्रासिक मानसिकतेतून तुझाच बहर शमवितो मग माझ्या तृषेला .शमवितो तो कोमेजलेल्या विचारगंधांना. जाणवतो तुझा सहवास मग पूर्ततेचा....
श्रावणाला सांगावे लागत नाही मग बहरायला.फक्त श्रावणसरी मुक्तपणे बरसतात....आपलाच नादाने....सोप्पं करून टाकतात सगळ ऋतूचक्र .तसाच तुझा सहवास...त्या सहवासाला सांगावे लागत नाही आनंदी बनायला.फक्त जेव्हां तू हो म्हणतेस...पाय दुखेपर्यंत फिरायला.जेव्हा तू म्हणतेस अजून थोडं जाऊया पुढेपर्यंत..मगं पायांचं दुखणं कुठच्या कुठं पळून जातं.
मागच्या सीटवर बसून माझ्या दोन्ही खाद्यांवर हात ठेवतेस.हळूच हनुवटही माझ्या खाद्यांवर ठेवतेस...अन् मग सुरू होतात गप्पा...तेव्हा गात्र गात्र उगाचच तुझं ऋण मानायला लागतात.तो कोमल स्पर्श तसाच वाटतो...जसा की पहिल्या पाऊस थेंबांनी पुष्प वाटिकेला वाटत असेल .... त्या पावसाच्या थेंब तुषारांनी खुलून येतात. कळ्यांना भावगंधून फुले बनवून जातात.

0 

Share


S
Written by
Sanchit Kamble

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad