Bluepad | Bluepad
Bluepad
स्वभाव सूत्र
U
Uttarayan
20th Jun, 2020

Share

सहज उत्सुकता म्हणून कधी आसपासच्या व्यक्तिंच्या स्वभावाचं निरीक्षण केलयं? केलं असेल तर लक्षात येईल की किती वैविध्य आहे स्वभावांमध्ये प्रत्येकाच्या!

म्हणजे बघा ना, एखादी व्यक्ती आपली रेडिओ लावल्यासारखी अखंड बोलतच राहते अन् दुसरी 'हा मुका आहे की काय' अशी शंका येईल इतकी आपली सतत मुग गिळून गप्प. काही माणसं इतकी आनंदी असतात की दुःखाचा स्पर्शही झाला नसावा तर काही आपली कायम सुतकी चेहर्याने वावरणारी. जणू दुःखाचा डोंगर कोसळला असावा.

आमच्या ओळखीतल्या एक काकू स्वतःच कौतुक करण्यात इतक्या मग्न असायच्या की इतर कुणाचं कौतुक करायला सवडच नसायची. सदैव स्वतःमध्येच मग्न!

असंच एक जोडपं, मदतीसाठी तत्पर असलेलं. कुणाला कशाची मदत लागली की यांना सांगायचा उशिर, नवरा बायको तयार मदतीला! शेजारी, मित्र, नातेवाईक कुणीही असो, मदत करणं आपलं परम कर्तव्य मानणारे हे दोघं.

माझी एक मैत्रिण म्हणजे खुली किताबच. येणार्या जाणार्या प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्याबद्दल सांगत बसणारी तर दुसरी एक कोडंच. चार-पाच वर्षात फक्त जुजबी माहिती दिली तिने स्वतःबद्दल. त्यापलिकडे वैयक्तिक काही बोलायची इच्छाच नसायची तिची.

आमची आत्या सगळ्यांवर अगदी प्रेमाचा वर्षाव करणारी, समोरच्याला प्रेमाने जिंकून घ्यायची. याउलट काहींना प्रेम, माया, आपुलकी या शब्दांचचं वावडं! सतत समोरच्याला तुसड्यासारखी वागवणारी ही लोकं.

देव सुद्धा किती गम्मत करतो बघा. आयुष्याच्या गाठी बांधताना अगदी विरूद्ध स्वभावाची माणसं जोडतो. बायको अगदी कलासक्त! नृत्य, गायन, नाटक, चित्रपट सगळ्याची आवड असणारी पण नवरोबा अगदीच अरसिक! काही ठिकाणी नवर्याला बिचार्याला प्रवासाची, फिरण्याची खूप हौस आणि बायको घरकोंबडी! कसा संसार करत असतील देव जाणे.

मी पाहिलेल्या एक बाई नेहमी टापटीप राहणार्या. दळण घ्यायला जाताना सुद्धा बारशाला जाताय अशा तयारीने जाणार्या. दुसर्या एक म्हणजे अजागळ ध्यान! लग्नकार्यात सुद्धा साडी नीट चापूनचोपून न नेसणार्या.
लहानपणी beauty parlour मध्ये जायचे त्या काकू इतक्या गोड बोलायच्या की diabetic पेशंटला त्रास होईल असं वाटायचं, अजिर्ण व्हायचं इतक्या गोडं बोलण्याने.

माझ्यासोबत काम करणारा एक सहकारी इतका नम्र आहे की ज्याचं नाव ते. वयाने, अधिकाराने लहान-मोठ्या प्रत्येकाशी तो तितकाच नम्रपणे बोलतो. एक मात्र अगदी याच्या विरुद्ध. अतिशय उद्धट!

इतकी विविध स्वभावाची माणसं आहेत आजूबाजूला, कधी कुणाच्या विचित्रपणाचा त्रास होतो तर काही जणांमुळे जगणं सुसह्य वाटतं. कसंही असलं तरी या भिन्न स्वभावांमुळे आयुष्य रंगीबेरंगी झालंय. नुसतीच गोड किंवा फक्त तिरसट, एकाच साच्यातली माणसं असली असती तर कदाचित जगणं नुसतचं black and white झालं असतं, नाही का?

- उत्तरा कुलकर्णी
स्वभाव सूत्र

14 

Share


U
Written by
Uttarayan

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad