माझ्यासाठी तुझ्या डोळ्यांत
दिसते जेव्हा दाटलेले पाणी
प्रतिबिंबही अपराधी भासते
स्मरता अधुरी ती एक कहाणी
पण जेव्हा माझ्या लोचनांत
तुझ्यासाठी अश्रूंचा पूर दाटतो
गंगाजलासम पावन होऊन तो
जणू सा-या पापांना दूर लोटतो
भेटूनही अजून एका भेटीची
कायम राहील मनात अपेक्षा
रोज स्वप्नात पाहते अजूनही
त्याच वळणावर करताना प्रतीक्षा
जिवंत तर आहे अजून मीही
जगत दोन आयुष्ये समांतर
उभ्या आयुष्यात मिटले नाही
फक्त काही मिनिटांचे अंतर