तुम बर्मा की गली मे देहरादून..
रसिका
प्रिय व्यक्तीची भेट कधीच संपावी असे वाटत नाही .पण ती प्रिय व्यक्ती हल्ली भेटत नाही . का कुठे हरवल्या त्या प्रिय व्यक्ती का आपण सोडून आलो दूर ?
तो दुरावा इतका प्रिय का वाटावा की मन कोठे रमूच नये . मन रमायलाही प्रियजनांचे रम्य विचार सहवासात असावे लागतात. पण रम्य सहवास सदा सर्वकाळ लाभतच नाही . कधी ना कधी प्रपंचात लाभाचा विषय येतोच. तेव्हा कुठेतरी संकोच भाव तयार होतो . मग रम्य सहवास दुरावतो.
व्यवहारातील देवाण-घेवाण कधी हळवी असते. कधी कठोर तर कधी प्रेमळ . पण असा कोणता व्यवहार असतो जिथून कधीही सुटका करून घेता येत नाही?
मायेच्या बाजारात गरजेची खरेदी विक्री होताना स्पर्शाचे मोल कळतच नाही . गरजवंताला मोल कशाचं करावं याची का जाणीव होत नाही. तेव्हा आसपास स्पर्शाची जाणीव तेथेच कुठेतरी घुटमळत असते . घाईत कधी पायाखाली येऊन गेलेली पण कळत नाही . संवेदनेच्या गर्दीत तिची किंकाळी पायापाशी झाली तरी कानापर्यंत पोहोचत नाही.
भावनेचे कोठार असलेले हृदय त्यावेळी आपल्याच ठोक्यात मशगुल असते . फुफुसाला हवेची आवक जावक होताना नाकाला कुठला तरी गंध झोंबून गेल्याशिवाय जाग का येऊ नये ?डोळ्याला तरी का भान नसावे . सतत सौंदर्य लुटीतच का त्याने मग्न व्हावे ? सांगावी कधीतरी मेंदूला वेदना , प्रियजन दुराव्याची.
मोबाईलवरून म्हणावे, कधी तरी
"मेरे पिया गये रंगून
वहा से किया टेलिफोन
तुम्हारी याद सताती है
जिया मे आग लगाती है
हम बर्मा की गली तुम डेरादून.."
रसिका बोल ना !!