लिखे जो खत तुझे....एक पत्र स्वतःस!
प्रिय अमित,
दचकलास ना एकदम!की मी स्वतः अमित स्वतः माझ्या मलाच का पत्र लिहीत आहे म्हणून...
घाबरु नकोस! भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे!नव्हे नव्हे तुझ्यातच आहे!
ना मला वेड लागले आहे ना मी तंद्रीत आहे.😂😂 मी अगदी अगदी तंदुरुस्त नि मन-दुरुस्त 😅😅 आहे!
काही वर्षांपू्वी फरहान अख्तरचा एक नितांत सुंदर चित्रपट आला होता..."कार्तिक कॉलिंग कार्तिक" ज्यामध्ये कार्तिक नावाच्या नायकाला स्वतः कार्तिकचाच फोन येत असतो...हा भाग वेगळा की त्यातल्या नायकाला सिझोफ्रेनिया हा मानसिक आजार असतो..आणि त्यामुळे त्याचे वर्तन बदललेले असते..माझ्या बाबतीत तसे नाही बरका उगाच भलती सलती शंका मनात घेवू नका...नाहीतर वांदे व्हायचे😂😂
जे खोल मनातलं अतिशय तरल पणे शब्दांचं बोट धरून कागदावर उतरतं ते खत......किंवा असेही म्हणलं तर वावगं नाही वाटणार की जे एकाच्या मनातल्या भावना दुसऱ्याच्या मनात अलवार पोहीचवण्यास पात्र असतं ते पत्र...आज पुन्हा या पत्राच्या आठवणीत रममाण होण्याचं कारण हे की येत असलेली एकाची आठवण...ही आठवण दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून ती आहे माझ्या स्वतःचीच...आता तुम्ही म्हणाल की आता तर मला नक्कीचं वेड लागलं आहे!
स्वतःची कोणाला कधी आठवण येईल का?खरे पाहिले तर यायलाच हवी...या धकाधकीच्या जीवनात...इतरांस वेळ देण्याच्या गडबडीत आपण हल्ली आपल्या स्वतःस वेळ देण्यास जणू विसरूनच गेलो आहोत..स्वतःची आवर्जून आठवण काढण्यास जणू आपल्याकडे वेळच शिल्लक नाही...इतक्यात माझं ही असेच झालं होतं...
दौडता रहा हू ख्वाबों के पीछे कुछं इस तरह
मंजिल खुद मुझे बोली थोडा रुक जानले खुदको
मैं कही ना जाने वाली छोड के तुझे ए हमदम
पहले सुकून की चंद गहरी सांसे तो ले ले...
मोबाईल च्या आजच्या जमान्यात पूर्वीची हक्काची उचकी आज काहीशी विस्मरणात तर गेली नाही ना असे उगाचचं वाटू लागले आहे...पूर्वी उचकी लागली की कोणी आठवण काढली असावी हा विचार अगदी सहज मनात येत होता...आपणही मग आपल्या जवळच्या व्यक्तीची त्या निमित्ताने आठवण काढत असू नि मनाची समजूत घालत असू की बहुतेक त्यानेच आपली आठवण काढली असावी...आणि त्या व्यक्तीचा विचार मनात येताच उचकी क्षणात थांबत होती...हा मोबाईल आला आणि त्याच्या 'कृत्रिम रिंगटोन' ने उचकी ही 'नैसर्गिक रिंगटोन' जणू आपल्याकडून हिरावून घेतली...आज अशीच उचकी अगदी सकाळी सकाळी लागली नि डोळ्यासमोर चक्क माझाच चेहरा आला..आता आश्चर्यचकित व्हायची वेळ माझी होती...
आपल्या स्वतःच्या मोबाईल वरून स्वतःलाच फोन जेंव्हा आपण लावतो तो कायम व्यस्त येतो नाही का?नि मग राहून जातो स्वतःचा स्वतःशी संवाद...अश्या वेळी उचकी लागली की आपली आठवण आपण स्वतःच काढली असावी हा विचार मनात येणं काहीसं हटकेच नाही का?
काही वेळ अगदी शांत बसलो नि मग जाणवले किती दिवस झाले आपण असं निवांत स्वतःशी संवादच साधला नाही...
किती दिवस झाले आपण आपल्या मनातलं कपाट आवरलच नाही...ज्यात बऱ्याच गोष्टी दुर्लक्षित झाल्या होत्या...काही गोष्टी अस्ताव्यस्त झाल्या होत्या...शब्दांकडे दुर्लक्ष झाल्याने मनात दडलेल्या कविता फुरंगटून कोपऱ्यात बसल्या होत्या...ललित लेखनाची लीला काहीशी अडगळीत जावून बसली होती...फक्त इतकेच नव्हे मी या मनाच्या कपाटाची चावी कुठे हरवून बसलो की काय इतपत माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला होता...आयुष्य काहीसं 'काटेरी' झाले होते...म्हणजे दुःखदायक नाही बरका हा काटा आपला घड्याळाचा आहे...म्हणजे घड्याळाच्या काट्यावर चालणारे म्हणून काटेरी हा शब्द वापरला...बाकी काही नाही😂😂...( सध्याची महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती पाहता हल्ली घड्याळाचेही वांदेच झाले आहे म्हणा!वो भी तुकडो मे बट गया है!⌚🕞🕡
मग ठरवले अगदी अंतर्मनातून की आपल्या हक्काच्या काही शब्दमित्रांची मनापासून माफी मागून त्यांच्या मदतीने एक पत्र आज आपल्या स्वतःस लिहावयाचे....
लिखे जो खत तुझे ओ तेरी याद मे!
त्यात मनातलं सारं काही व्यक्त करून मन मोकळं करायचे.आपल्या स्वतःस आवर्जून सांगायचे की मलाही तुझी खूप खूप आठवण येते आहे.. मी आज तुझ्याशी अगदी मनमोकळेपणाने 'मन की बात' करणार आहे...😊
मी बोलत गेलो तुझ्याशी
नव्हे नव्हे तुझ्यातल्या माझ्याशी..
थोडे अंतर्मुख होवुनी जरासे
बघता बघता एक दीर्घ पत्र साकारून आले!
हो.... खूप बरं वाटलं बघ आज तुला...तुझ्यातल्या मला हे पत्र लिहून... लिखाणातलं समाधान... समाधानातलं सुखं...नि सुखातला आनंद मिळाला...
काय हरकत आहे नाही असं दर काही दिवसांनी एखादं पत्र आपल्या स्वतःलाच लिहायला...असे एखादे पत्र तुम्हाला नक्कीचं अविस्मरणीय असा आनंद देवून जाईल..जसा त्यानं आज मला दिला...
चल भेऊयात पुन्हा लवकरच!अश्या एखाद्या निवांत क्षणी...निवांत मनी.
फक्त तुझा आणि तुझाच मी...अमित.
नाम तो जरूर याद रहेगा!
अमित.
डॉ अमित.
रविवार.
९ जुलै २०२३.