गरज नाही सीतेला जायची
आज वनवास भोगायला वनात
घरी बसूनही भोगतेय ती आज
वनवासच मनातल्या मनात
दहा तोंडे घेऊन अनेक रावण
समाजात आहेतच टपलेले
सुवर्णमृग बनून खुलवतो मारिच
स्वप्न जे डोळ्यात लपलेले
भुलू नकोस नारी,मोह आवर
अतिलालसा कोणत्या कामाची
स्वतःच करावे लागेल शीलरक्षण
नको करू तू अपेक्षाही रामाची
प्रगतीच्या नावाखाली ओलांडू नको
कधीच तुझ्या चारित्र्याची लक्ष्मणरेषा
कलियुगात रामही नाही बर एकपत्नी
असू शकते त्यालाही दुसरीची अपेक्षा
नको करू प्रतिक्षा येईल रामदूत
सुवर्णनगरीत दैत्यांपासून रहा सावध
जाळून टाक लंका अन् रावणही तूच
अन्यथा बनवतील सावज करून पारध
अग्नीपरिक्षा मागणारे आज अनेक
मळकट विचारांचे परीटही भेटतील
खोटेनाटे आरोप इतके करतील की
ते ऐकून तुझे कानही किटतील
किती देशील प्रमाण पावित्र्याचे
बस्स!आता पुरावे मागायला शिक
स्वतःला कितीदा गाडून घेशील,सीते
पाप्यांना जमिनीत गाडायला शिक