विविध वैचारिकता...
नमस्कार, मानवी जीवनात अनेक लोक अशे असतात की ज्यांचे विचार आपल्याला पटत नाहीत. अरे तो काही पण बोलतो, निरर्थक आहे, काही अर्थ नाही, कुठून आईकल आणि नको नको ते आपण मनातल्या मनात त्याला नाव ठेवतो. पण खरंच हे योग्य आहे का ? त्याने एखाद्या सांगितलेले त्याचे विचार पटण्या सारखे आहेत का ? याच विषयावर आज मी माझे विचार मांडणार आहे.
आपल्या समाजात काहींना समोरच्याचे विचार पटतात तर काहींना पटत नाही. काही जबरदस्ती हो हो करून त्याचे समाधान करतात. काही तोंडावर बोलून दाखवतात की मला तुझे विचार पटले नाही. मग तो नाराज होतो, हा गमतीचा भाग वेगळा. पण मित्रहो, माझ्या मते प्रत्येक माणूस जेव्हा स्वतःचे विचार आपल्याला सांगतो तेव्हा तो त्याच्या अनुभवातून ती गोष्ट सांगत असतो.
मान्य आहे की सगळी माणस काही सारखी नसतात, सगळ्यांचे वैचारिक मन जुळतीलच असे पण नाही. पण तो व्यक्ती का सांगतोय त्याचा सांगण्यामागचे कारण नक्की काय आहे ? तो त्याचे विचार सांगतोय त्यात किती तथ्य आहे हे आपण आधी समजून घ्यायला हवे. माणसाचा स्वभाव हा त्याचा विचारांवरून सहजतेने ओळखायला येतो. ते कसे बघुया.
सदैव दुसऱ्या बद्दल वाईट विचार करणारा हा नेहमी चुकीचे विचार करून त्याच्या मित्रांना वाईट सल्ले देत राहतो. चुगल्या करत राहतो. जेणे करून समोरचा माणूस पण तसेच करायचं पाहतो. त्याचे वाईट कसे होईल, तो कसा टेन्शन मध्ये राहील याचाच त्याला आनंद राहतो. पण वाईट विचार हे माणसाला कधीच सुखी आणि समाधानी ठेवत नसतात हे नेहमी लक्षात ठेवा मंडळी. तात्पुरता आनंद दुसऱ्याचे वाईट चिंतून आयुष्यभराचे सुख नाही देऊ शकत.
लोकांचे हित जपणारा व्यक्ती हा वैचारिकतेनी नेहमी सौम्य भाषेत अतिशय चांगल्या भावनेनी समोरच्या व्यक्तीला योग्य तेच सल्ले देतो. सकारात्मक परिणाम होईल असे निर्णय घ्यायला सांगतो. अशा व्यक्तीची संगत माणसाला यशस्वी बनवते. विचार शुद्ध आणि पवित्र असले की माणुसकी त्याच्यामध्ये जन्माला येते हे खरे.
मला त्याचे विचार पटत नाही म्हणून मी त्याचसोबत बोलणार नाही हे खरंच योग्य आहे का ? कोणाला त्याचे विचार बदलायला भाग पाडू नका. त्याला त्याच्या अनुभवातून शिकू द्या. प्रत्येक माणसा चे विचार हे त्याला त्याच्या जीवनात येत असलेल्या अनुभवातून तयार होतात. कार्यालयीन कामकाजात जवळपास सगळ्याच ठिकाणी प्रत्येक विभागात काही लोकांचे विचार एकमेकांना पटत नाही. पण एकाच ठिकाणी काम करायचे म्हंटल्यावर शांत राहून सकारात्मकतेने त्याच्या विचारांना आत्मसात करणे हेच योग्य.
तसेच आपल्या खाजगी आयुष्यात नातेवाईक, मित्र मंडळी आणि शुभचिंतक यांचे पण विचार पटत नसले तरी सुद्धा सकारात्मकता दाखवा. त्याचा सोबत विचारांची देवाण घेवाण करा. बदलेल, नक्कीच त्याचे पण विचार काही क्षणापूर्ती का होईना पण बदलेल. इथूनच विचारांमध्ये बदल व्हायला सुरवात केली पाहिजे.
राजकारण, नातेसंबंध, कार्यालयीन जीवन, मित्रपरिवार या अशा अजून किती तरी गोष्टी आहेत जिथे आपण सकारात्मक वैचारिकता आपण समाजात मांडली तर सगळ्यांना नक्कीच एकमेकांबद्दल आपुलकी आणि ओढ निर्माण होईल हे नक्कीच.
निनाद चंद्रकांत देशपांडे
अमरावती.
९९२२६१३००१.