आपल्या जीवनात गुरूचे स्थान महत्त्वाचे
(प्रदीप जोशी, मुक्त पत्रकार)
आज गुरू पौर्णिमा. गुरूला वंदन करण्याचा दिवस. गुरुपुढे नतमस्तक लीन होण्याचा दिवस. आपल्या जीवनात गुरूचे स्थान महत्त्वाचे आहे. गुरू शिवाय कोणतीही गोष्ट आपण साध्य करू शकत नाही. गुरुविण कोण दाखविल वाट असे उगाच का म्हंटले जाते. जन्म मृत्यू प्रवासात आपल्या पाठीशी गुरू असतो. त्याच्याशिवाय आपल्याला ज्ञान प्राप्ती होत नाही. गुरुमहिमा आपापल्या परीने अनेकांनी वर्णन केलेला आहे. आई आपला प्रथम गुरू. जीवन जगण्याचे धडे आपणास तिच्याकडून मिळत असतात. आई, वडील, शिक्षक, नातेवाईक, मित्र, मैत्रिणी, पुस्तके, वृक्ष सारेजण आपल्याला गुरुस्थानी असतात. ज्या ज्या घटकाकडून आपल्याला काहीतरी शिकता येते ते आपले गुरूच असतात. गुरू आपल्याला जीवनाची योग्य वाट दाखवतात. अगदी प्राचीन काळापासून गुरू महती सांगितली जाते. एखादे पुस्तक आपल्याला जीवनाची वाटचाल कशी करायची याचे मार्गदर्शन करते. एखादे लहान मूल देखील आपल्याला त्याच्या कृतीतून काहीतरी शिकवत असते. सकाळी फुल उमलते. सायंकाळी कोमेजून जाते. जीवन किती क्षणभंगुर आहे हे सांगून जाते. पशु पक्षी आनंदात कसे रहायचे याची शिकवण देतात. फळाची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या उपयोगी कसे पडायचे याची शिकवण वृक्ष आपणास देतात. संगीताची विविध वाद्ये आपणास काही ना काही शिकवून जात असतात. माझ्या दृष्टीने हे सर्व गुरुस्थानी आहेत. गुरू आपणास कधीही चुकीची वाट दाखवत नाहीत. आजचा दिवस व्यास पौर्णिमा किंवा गुरू पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आश्रम व्यवस्थेत गुरूला मोठे स्थान होते. आपल्याकडे गुरुशिष्य परंपरा मोठी आहे. गुरू शिवाय आपण कोणतीही विद्या प्राप्त करू शकत नाही. मी तर मोबाईल ला गुरू मानून हार्मोनियम शिकलो.