बेकार असते बेकारी दोस्ता,
लई बेकार असते बेकारी
काळ कुत्रबी इचारत न्हाई
काय कामाची तुमची हुशारी .......१
जो बेक्कार असतो तोच बेकार
बोलतात पुढ नि माघारी
मूग गिळून गप्प बसाव लागत
बेकार जीवन किती लाचारी.....२
खाली मान घालून बेचव अन्नही
गिळावच लागत बळजबरी
भेटायला गेले कोणाला तर
वाटत मागायला आला उधारी.....३
टोमणे मारायला जाळे टाकून
टपलेले असतात शिकारी
उपदेशाचे डोस पाजतात मग
समजून फाटका भिकारी.....४
दिवास्वप्न बघत बसू नका आता
जोमात सुरू करा तयारी
कष्ट करायला लाजू नका,
जर टिकायच असेल बाजारी.....५
कोणतीही मिळवा नोकरी,
खाजगी असो की सरकारी
करा कोणतेही काम आनंदे,
टपरी चहाची असो की पाणीपुरी....६
माणसांपेक्षा पैशांनाच आज
मिळत आहे किंमत भारी
जणू पैसा बनला देव पैशाला
सलाम ठोकते ही दुनिया सारी.....७
रिकाम्या खिशाला परवडत नाही
कधीच बेकारीची ही बिमारी
तुमच्यापुढे आज सोडली मी
अनुभवाची माझ्या शिदोरी......८