दिलीप कोठावदे । नाशिक
आपल्या मराठी मातीला वैभवशाली बनविणार्या थोर संतांची मोठी परंपरा लाभली आहे. संत ज्ञानेश्वर,संत नामदेव,संत जनाबाई,संत मुक्ताबाई, संत सोपानदेव,संत निवृत्तीनाथ,संत एकनाथ, संत चोखामेळा,संत गोरोबा,संत सावतामाळी,संत कान्होपात्रा,संत नरहरी सोनार,संत तुकाराम महाराज,संत रामदास स्वामी,संत जनार्दन महाराज, हे सगळे संत म्हणजे भक्तिप्रेमाचे मूर्तिमंत पुतळेच होते. त्यांचे श्वासोश्वास हेच मुळी अभंग होते त्याचे जगणे हा भगवंत भक्तीच्या प्रेमाचा अविष्कार होता.
संतश्रेष्ठांच्या या मांदियाळीत,पांडुरंगाच्या भेटीची मनोकामना पुर्ण व्हावी हिच प्रत्येक संतांची अंतिम इच्छा असल्याचे त्यांच्या अभंग,भक्तिगीते, भारुड आदी रचनांमधून व्यक्त होतांना दिसते. महत्वाचे म्हणजे सर्वच संतांनी विठ्ठल दर्शनाची आपली ही इच्छा आपल्या विविध अभंग रचनेतून स्पष्टपणे प्रकटही केलेली आहे. या संतांनी आपल्या अभंग रचनातून विठ्ठलाची भक्ती करतांनाच मनुष्य जीवनाचे सार देखील सांगितले आहे.
या अभंग रचनांमध्ये सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी निगडित गोष्टींना शब्दबद्ध केलेले असल्यामुळे तत्कालीन जनमानसावर त्यांचा पडलेला प्रभाव तात्काळ दिसून आला असला तरी आजही शेकडो वर्षांनंतर ही त्यांच्या या रचनांमधील शब्द न शब्द तंतोतंत लागू पडतो. महाराष्ट्राला लाभलेले या संत परंपरेचा पाया ज्ञानेश्वर माउलींनी रचला,संत नामदेवांनी त्यावर ओसरी बांधली तर संत एकनाथांनी खांब उभारले. अवघ्या संतांनी संत परंपरेच्या या मंदिराची उभारणी केली,आणि संत तुकाराम महाराजांनी या मंदिराचा कळस रचला. ते म्हणतात, काया,वाचा,मन,डोळे आणि कान अशा सर्वांगांनी विठ्ठलाची भक्ती करावी आणि त्या भक्तिरसात देहभान हरवून जावे –
घेई घेई वाचे | गोड नाम विठोबाचे || १ ||
तुम्ही घ्या रे डोळे सुख | पहा विठोबाचे मुख || २ ||
तुम्ही ऐका रे कान | माझ्या विठोबाचे गुण || ३ ||
मना तेथे धाव घेई | राहे विठोबाचे पायी || ४ ||
रुपी गुंतले लोचन | पायी स्थिरावले मन || ५ ||
देहभाव हरपला | तुज पाहता विठ्ठला || ६ ||
तुका म्हणे जीवा | नको सांडू या केशवा || ७ ||
विठ्ठल भक्तीची आणि त्याच्या दर्शनाच्या तळमळीने जीव कासावीस झाला आहे, ही ओढ व्यक्त करतांना तुकाराम महाराजांनी चकोराला चंद्राची,सासरी गेलेल्या लेकीला माहेरची आणि भुकेल्या बाळाला जशी आपल्या आईची प्रतिक्षा लागलेली असते तशी तळमळ लागल्याची भावना अभंगातून अतिशय सुंदर शब्दात व्यक्त केली आहे –
भेटीलागीं जीवा लागलीसे आस ।
पाहे रात्रीं दिवस वाट तुझी ॥१॥
पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन ।
तैसें माझें मन वाट पाहें ॥२॥
दिवाळीच्या मुळा लेंकी आसावली ।
पाहतसे वाटुली पंढरीची ॥३॥
भुकेलिया बाळ अति शोक करी ।
वाट पाहे परि माउलीची ॥४॥
तुका म्हणे मज लागलीसे भूक ।
धांवूनि श्रीमुख दावीं देवा ॥५॥
अशीच काहीशी अवस्था संत सावतामाळी यांचीही झालेली आहे,ते म्हणतात, हे पांडुरंगा तू सर्वव्यापी आहेस त्यामुळे माझ्या तन-मनात,माझ्या श्वासात, ध्यासात, कर्मातही तूच आहेस, माझ्या रोजच्या कामातही तूच आहेस., ही भावना व्यक्त करताना ते म्हणतात –
कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी॥१॥
लसुण मिरच्या कोथिंबिरी। अवघा माझा झाला हरी॥२॥
मोट नाडा विहीर दोरी। अवघी व्यापिली पंढरी॥३॥
सांवत्याने केला मळा। विठ्ठल पायीं गोविला गळा॥४॥
तर संत कान्होपात्रा पांडुरंगाची आळवणी करतांना म्हणतात –
नको देवराया अंत आता पाहू,
प्राण हा सवर्था जाऊ पाहे
हरीणीचे पाडस व्याघ्रे धरियेले
मजलागी जाहले तैसे देवा
तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी
धावे हो जननी विठाबाई
मोकलुनी आस, जाहले उदास
घेई कान्होपात्रेस हृदयास
जेव्हा साक्षात पांडुरंगाचे दर्शन घडते,तेव्हा या भक्तांची अवस्था काय होते याचे वर्णन तुकोबांनी अतिशय सुरेख शब्दात केलंय..,
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणें सोसें मन जालें हांवभरी । परती माघारीं घेत नाहीं ॥२॥
बंधनापासूनि उकलल्या गांठी । देतां आली मिठी सावकाशें ॥३॥
तुका म्हणे देह भारिला विठ्ठलें । कामक्रोधें केलें घर रीतें ॥४॥
पंढरीची वारी शतकानुशतके सुरू आहे. फक्त विठ्ठल दर्शनाची आस मनाशी बाळगून सर्व अडीअडचणींवर मात करत वारीत सहभागी झालेले विठ्ठलभक्त मैलोनमैल पायी चालत, हरिनामाचा गजर करत आपल्या दैवताचे,सावळ्या विठ्ठलाचे आणि गोजिर्या रखुमाईचे दर्शन घेतात,तेव्हा या वारकर्यांची अवस्था आनंदाचे डोही आनंद तरंग अशी झालेली असते,त्या भावनेचे वर्णन करतांना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की, जेव्हा मी हे भौतिक रूप माझ्या आध्यात्मिक दृष्टीने पाहिले तेव्हा आनंद प्रकट झाला.,हाच तो विठ्ठल, हाच तो माधव जो परम सुंदर आहे. मागील जन्माच्या पुण्यांमुळे सर्व सुखाचे आगर असलेल्या भगवंताचे दर्शन झाले आहे.
रूप पाहतां लोचनी । सुख जाले वो साजणी ॥१॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥२॥
बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठली आवडी ॥३॥
सर्व सुखाचे आगर । बाप रखुमादेवीवर ॥४॥
माऊलींच्या या रूपाच्या अभंगाला परंपरेत महत्वाचे स्थान आहे. अभंग संप्रदायातल्या प्रत्येकाला तो मुखोद्गत असतो. शेकडो वर्षांपासून हा अभंग म्हटला जात आहे. एवढेच नाही, तर जेव्हा श्रीमुखाचे दर्शन होते, तेव्हा ते तेज आकलनापलीकडे असते, विठ्ठलाच्या नुसत्या दर्शनाने स्वर्गप्राप्ती झाल्याचा आनंद मिळतो,अवघे तन-मन रोमांचित होते,हे सांगताना संत सावतामाळी भारावून जातात आणि म्हणतात-
विकासिला नयन स्फुरण आले बाही।
दाटले हृदयी करुणाभरिते॥
जाता मार्गी भक्त सावता तो माळी।
आला तया जवळी पांडुरंग॥
आपले दैवत असलेल्या विठ्ठलाला डोळे भरून बघतांना ज्ञानोबांनी विठूमाऊलीचे वर्णन करताना अक्षरशः शब्दांचे भांडार रिते केले आहे, माऊली म्हणतात – पांडुरंगाच्या कांतीवर दिव्य तेज झळकत आहे. जणुकाही रत्नाची प्रभाच झळकत आहे.त्याचे अगणित लावण्य व तेजपुंज रुप दिसते आहे. त्या शोभेचे वर्णन अवर्णनिय आहे –
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती।
रत्नकीळ फाकती प्रभा॥
अगणित लावण्य तेज: पुंजाळले।
न वर्णवे तेथेची शोभा॥
पंढरीच्या तेजाने दशदिशा व्यापून टाकलेली दिव्य कांती ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला हे वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून एकत्र येतात. सावळ्या विठ्ठलाची लावण्य कांती पाहून त्यांच्या सदगतीत मनात आषाढ दाटून येतो आणि केव्हा त्यांच्या डोळ्यांतुन चंद्रभागा झरझर पाझरू लागते हे त्यांनाही कळतही नाही. वारीचे हे महात्म्य आणि तिचे महत्व पंढरीलाच का आहे ? याबद्दल संत नामदेव महाराजांनी आपल्या एका अभंगात सांगून ठेवलंय….
आधी रचिली पंढरी। मग वैकुंठ नगरी॥१॥
जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर ॥२॥
जेव्हा नव्हती गोदा गंगा । तेव्हा होती चंद्रभागा ॥३॥
चंद्रभागेचे तटी । धन्य पंढरी गोमटी ॥४॥
नासिलीया भूमंडळ । उरे पंढरीमंडळ ॥५॥
असे सुदर्शनावरी । म्हणुनी अविनाशी पंढरी॥६॥
नामा म्हणे बा श्रीहरी । आम्ही नाचु पंढरपुरी ॥७॥
वारीचा हा अनुपम्य सोहळा सुरू असताना पंढरपुरात आनंदाला महापूर आलेला असतो,कानाकोपर्यातून विठु माऊलीचा जयघोष आणि टाळ-मृदुंगांचा गजर ऐकू येत असतांना प्रत्येकाच्या तन-मनात फक्त आणि फक्त विठु माऊलीच व्यापून राहिलेली असते. पंढरपुरातल्या या स्थितीचे वर्णनही अनेक संतांच्या अभंग रचनांमधून दिसून येते…
अवघे गरजे पंढरपूर । चालला नामाचा गजर ॥ध्रु.॥
टाळघोष कानी येती । ध्यानी विठ्ठलाची मूर्ती ।
पांडुरंगी नाहले हो । चंद्रभागातीर ॥१॥
इडापिडा टळुनी जाती । देहाला वा लाभे मुक्ती।
नामरंगी रंगले हो । संतांचे माहेर ॥२॥
देव दिसे ठाई ठाई । भक्त लीन भक्तापायी ।
सुखालागी आला या हो । आनंदाचा पूर ॥३॥
वारीच्या या आनंद सोहळ्याचे वर्णन आपल्या शब्दांत करतांना संत चोखा मेळा म्हणतात –
अबीर गुलाल उधळीत रंग । नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥१॥
उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जाती हीन ।
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन।
पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग॥२॥
वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू।
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ।
विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनीह निःसंग ॥३॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती।
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती।
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग॥४॥
हे झालं पंढरपूरच्या महती आणि परिस्थितीचं,पण या सगळ्या आनंदाला अत्युच्च परमानंदाच स्वरूप देणार्या विठ्ठलाच्या नामाचा महिमा वारकर्यांच्या भाव भक्तीवर कळस चढवितो. याविठ्ठल नामात भवसागर पार करण्याची शक्ती-सामर्थ्य आहे हे सांगताना संत नामदेव महाराज म्हणतात..
विठ्ठल आवडी प्रेमभावो । विठ्ठल नामाचा रे टाहो ॥
तुटला हा संदेहो । भवमूळ व्याधीचा ॥
म्हणा नरहरी उच्चार । कृष्ण हरी श्रीधर ।
हेची नाम आम्हा सार । संसार करावया ॥
नेणो नामाविण काही । विठ्ठल कृष्ण लवलाही ।
नामा म्हणे तरलो पाही । विठ्ठल विठ्ठल म्हणताची॥
विठ्ठलाच्या कीर्तीचे गुणगान गाताना अशुभाचा, महापातकाचा नाश होतो, एवढे सामर्थ्य ’श्रीविठ्ठलाच्या’ नामात आहे, त्याचे वर्णन करताना संत जनाबाई म्हणतात,
सर्व सुखाचा आगर। उभा असे विटेवर॥
आठविता पाय त्याचे। मग तुम्हा भय कैचे॥
विठ्ठल नामात लिन झालेल्या वारकर्यांना पंढरपुरात विठ्ठलाच्या बाह्यरूपाचे दर्शन घडते,मात्र पांडुरंगाच्या अंतःकरणाची विशालता जाणूनघेण्यासाठी आणि आपल्या अंतःचक्षूंनी पांडुरंगाचे रूप पाहण्यासाठी संत सोपानदेव म्हणतात-
उघडली दृष्टी इंद्रियासकट।
वैकुंठीची वाट पंढरी जाणा॥
दृष्टीभरी पाहे विठ्ठल दैवत।
पूर्ण मनोरथ विठ्ठलदेव॥
आपल्या अंतचक्षूंनी सावळ्या पांडुरंगाचे मनोभावे दर्शन घेतल्यावर वारकर्यांच्या मनातली कोणतीच इच्छा अपूर्ण रहात नाही. आणि विठ्ठलाचे दर्शन झाल्यावर वारकर्यांच्या मनात कोणत्याच भौतिक इच्छांना स्थान रहात नाही. कारण पांडुरंगाच्या नुसत्या दर्शनातही भवसागर पार करण्याचे सामर्थ्य सामावलेले आहे. पांडुरंगाचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी चंदनाचा टीळा लावून, तुळशीच्या माळा घालून, टाळ-मृदुंगाच्या नादात पुष्पवर्षाव करत सगळे वैष्णव एकत्र येतात, त्यावेळी होणार्या सोहळ्याचे वर्णन करताना संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात-
गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा।
टाळ-मृदुंग घाई पुष्पवर्षाव, अनुपम्य सुख सोहळा॥
वारकर्यांच्या जीवनात असा हा अनुपम्य सुखाचा सोहळा अनुभवण्याहून मोठी पर्वणी ती कोणती असू शकते ? पंढरीचा पांडुरंग हा चराचरात व्यापलेला आहे. प्रत्येक गोष्टीत तो आपल्याला दिसेल.आपल्या आनंदात तो सहभागी होतो तसाच आपल्या दुःखातही तो आपल्याला जवळ घेतो.,आपल्याला जगण्याचे बळ आणि लढण्याची जिद्द देतो,आकाशी हिंडणार्या घरीच चित्त जसे पिल्लापाशी असते तसेच लक्ष पांडुरंगाचे आपल्याकडे असते आणि म्हणूनच आषाढी एकादशीला हे सारे वैष्णव विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपुरात मजल दरमजल करीत दाखल होतात.त्यावेळी असा एकही क्षण नाही जेव्हा माझा हरि माझ्यासोबत नाही हे सांगताना संत मुक्ताबाईंची काव्य प्रतिभा आनंदाने आणि मुक्तहस्ताने शब्दांच्या राशी उधळून टाकते,कारण त्यांचा विठ्ठल त्यांना सर्वत्र व्यापलेला असल्याचे दिसून येते –
जेथें जे पाहे तेथें तें आहे ।
उभारोनि बाहे वेद सांगे ॥ १ ॥
सोमकांतीं झरा कोठील दुसरा ।
तत्त्वीं तत्त्वें धरा निजदृष्टीं ॥ २ ॥
हेतु मातु आम्हां अवघाचि परमात्मा। सोहंभावें सोहं आत्मा सर्वीं असे ॥३॥
मुक्तलग खुण मुक्ताई प्रमाण ।
देहीं देहो सौजन्य निजतेजें ॥ ४ ॥
विठ्ठलावर निस्सीम भक्ती आणि विश्वास असलेल्या संत जनाबाई तर विठ्ठलाचे गुणगान करतांना त्याला लेकुरवाळा म्हणतात आणि सारे संत हे जणू काही विठ्ठलाची लेकरे आहेत असे समजुन तल्लीनतेने म्हणतात –
विठु माझा लेकुरवाळा । संगे लेकुरांचा मेळा
निवृत्ती हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी
पुढे चाले ज्ञानेश्वर । मागे मुक्ताई सुंदर
गोरा कुंभार मांडिवरी । चोखा जीवा बरोबरी
बंका कडियेवरी । नामा करांगुळी धरी
जनी म्हणे गोपाळा । करी भक्तांचा सोहळा
इथल्या प्रत्येक गोष्टीत विठ्ठल आहे, तो चराचरात सामावलेला आहे, जीथे जिथे दृष्टी जाईल किंवा भक्तांच्या अंतःकरणातील भाव जिथपर्यंत पोहोचू शकेल तिथपर्यंत किंबहुना त्याच्याही पुढे विठ्ठल सामावलेला आहे. मनुष्य देह म्हटले की, त्यात न संपणार्या इच्छा, वासना, सुख-दुःख येतात. परंतु, सर्व सुखाचा आगर श्रीविठ्ठलच आहे, असे मानण्यासाठी मनसुद्धा या संतांसारखे असावे लागते. किंबहुना, म्हणूनच ते संत आहेत.
कधी आता होणार तें होवो पंढरीनाथा।
न सोडी सर्वथा चरण तुझे॥
असे म्हणत तर कधी,
अग्निमाजिं पडे बाळू। माता धांवे कनवाळू॥
तैसा धांवे माझिया काजा। अंकिला मी दास तुझा॥
असे म्हणत संत नामदेव महाराज तर विठ्ठलाच्या चरणी शरण जातात. जिथे नामदेव महाराज स्वतःला ‘विठ्ठलाचे दास’ म्हणतात तिथे आपल्यासारख्या भक्तांची भावावस्था वेगळी काय असू शकते ? आणि परोपकार,भूतदया, समाधानी वृत्ती याहून मोठी विठ्ठलाची पूजा कोणती असू शकते ? हे सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात,हे हरी तुमचे चरण विटेवर सम आहेत तुमची दृष्टीही सम आहे आणि अशा तुमच्या साजर्या रूपावर माझी वृत्ती स्थिर रहावी आणि या व्यतिरिक्त मला कोणतेही मायेने व्यापलेले पदार्थ नको व त्या ठिकाणी माझी तृष्णा इच्छा देखील राहू देऊ नका.
समचरणदृष्टि विटेवरी साजिरी ।
तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥
आणीक न लगे मायिक पदार्थ ।
तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥
प्रत्येक संतांनी विठ्ठलाला वेगवेगळ्या रुपात बघितले.संत रामदास स्वामींना देखील विठ्ठलाच्या रुपात राम दिसत होता. तर संत तुकारामांनी विठ्ठलाच्या अनेक रूपांचे दर्शन एकाच अभंगातून दाखवले आहे.
श्री अनंता,मधुसूदना, पद्मनाभा नारायणा ॥
सकल देवाधिदेवा, कृपाळू, वाली, केशवा ।
महानंदा,महानुभावा, सदाशिवा, सदंगरूपा ।
अगा ये सगुणा, निर्गुणा, जय जगचालिता, जगजीवना ।
वसुदेवदेवकीनंदना, बाळरांगणा, बाळकृष्णा ।
तुका आला लोटांगणी, मज ठाव द्यावा जी चरणी ।
हीच करितसे विनवणी, भावबंधनी, सोडवावे ॥
वारकरी संप्रदायातील सर्वच संतांच्या अभंग रचनांमधून विठ्ठलभक्ती, नामस्मरण,संत,लक्षणे, नितितत्वांचा उपदेश असे विषय आढळतात. त्यांच्या या रचनांमधून विठ्ठल भक्ती पाझरते आणि भक्तीच्या या शब्दरूप पाझरातून स्रवणारी त्या अभंगांची गोडी आपल्याला सुखावून टाकते.
Source: MyMahanagar.com