जांभूळआख्यान ही गोष्ट आहे द्रौपदीची..
तिने आपद्धर्म म्हणुन पाच पतींशी विवाह केला..
पण तरीही तिला पतिव्रता हा दर्जा दिला गेला..
तिच्या पाच पतींनी आणखी वेगवेगळे विवाह केलेच..
पण ते पुरुष होते त्यामुळे बहुपत्नीकत्व त्यांना परंपरेने बहाल केलं होतं.
तर गोष्ट आहे द्रौपदीची..
कुठल्या तरी समारंभाच्या वेळी कर्ण द्रौपदीच्या नजरेस पडला..
तेव्हा तो पांडव आहे हे अर्थातच तिला माहिती नसणार.
पण तरीही त्याचं देखणेपण पाहुन ती क्षणभर मोहीत झाली..
आख्यानकार म्हणतात,” कर्णाला पाहुन द्रौपदीचं मन पाकुळलं ( पाघळलं).
आख्यानकार आणखी पुढे म्हणतात की द्रौपदीला क्षणभर वाटुन गेलं की हा देखणा युवक सहावा पांडव असता तर?????
आत्ता बारा महिन्यांची जशी विषम विभागणी झाली आहे त्याऐवजी ती सहा जणात दोन दोन महिने अशी झाली असती..
अंतर्ज्ञानी कृष्णाच्या ही गोष्ट लक्षात आली..
द्रौपदीच्या मनात परपुरुषाचा विचार येणं ही गोष्ट पांडवांच्या दृष्टीने धोक्याची होती..
कारण द्रौपदी हे पांडवांना एकत्र बांधुन ठेवणारं सुत्र होतं.
मग कृष्णाने वनविहाराचा बेत आखला..
वनविहार झाल्यावर सर्वांना भूक लागली म्हणुन भीम फळं शोधण्यासाठी गेला..
परंतु कृष्णाने आपल्या मायेने रानातली सर्व फळं नाहिशी केली..
एका वृक्षावर एकुलतं एक जांभूळ शिल्लक होतं.
भीमाने तेच तोडुन आणलं..
त्या वनात कोणी एक ऋषी तप करीत होते..
आणि बारा वर्षाचं तप पुर्ण झाल्यानंतर खाण्यासाठी म्हणुन त्यांनी ते जांभूळ राखुन ठेवलं होतं असं शुभ वर्तमान कृष्णाने सर्वांच्या कानी घातलं..
आता पांडवांच्यात घबराट पसरली..
जांभूळ जाग्यावर दिसलं नाही तर ऋषींचा कोप होणार..
कृष्णाने सांगितलं,की तुमच्यापैकी ज्याचं मन स्वच्छ आहे ,ज्याच्या मनात कधीच परपुरुषाचा/परस्त्रीचा विचार आलेला नसेल त्याने मनापासुन प्रार्थना करावी.
जांभूळ आपोआप झाडाला जाऊन चिकटेल..
म्हणजे आता तिथे द्रौपदीपेक्षा योग्य व्यक्ती नाहीच कोणी.
सगळ्यांच्या नजरा आता द्रौपदीकडे..
द्रौपदी मनातुन खजील.भयभीत.
जांभूळ चिकटलं नाही तर तिच्या पातिव्रत्यावरच घाला..
कारण काही क्षणापुरता का होईना पण कर्णाचा विचार तिच्या मनात आलाच होता..
तिने मनोमन कृष्णाची करुणा भाकली,पुन्हा अशी चूक होणार नाही अशी मनोमन कबुली दिली आणि हात जोडुन प्रार्थना केली आणि काय आश्चर्य ?
जांभूळ परत झाडाला चिकटलं..
पण उलट्या बाजुने..
द्रौपदीला तिच्या चुकीची सतत आठवण रहावी यासाठी कृष्णाने केलेली ही योजना..
म्हणजे एका अर्थी उलटं जांभूळ हे पापाचं प्रतीक..
म्हणुन त्याला देवाच्या पुजेत ,उपासाच्या फळामधे स्थान नाही..
आख्यानकार आणखीही सांगतो,की जांभूळ खाल्लेलं लपवता येत नाही..
जीभ जांभळी करुन सोडतं ते..
थोडक्यात केलेलं पाप लपत नाही.
शैलेश घनसोनीकर.