Bluepad | Bluepad
Bluepad
थ्री सिस्टर्स
धनश्री अजित जोशी
18th Mar, 2023

Share

त्या सातजणी. ..
त्यांना भेटायचे.जाणून घ्यायचे..हे स्वप्नच.
कन्याकुमारी , रामेश्वर ते वैष्णवदेवी, चार धाम यात्रा केली आहे..असे सांगितले.तरी प्रश्न यायचा ,"सेवनसिस्टर पाहिल्यात का ..नाही ना.मग बघाच..केवळ अप्रतिम." असे खूप जणांकडून ऐकलेले. तेव्हा बघायच्याच हे ठरलेले.
सेवन सिस्टर.. अरुणाचल प्रदेश, असम, मणिपुर, मेघालय, मिजोरम, नागालैंड और त्रिपुरा..सगळ्यांना एकदम बघणे शक्य नाही.
हो नाही करता करता आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय बघायचे ठरवले.
टेल्कोतून सेवानिवृत्त झालेले माऊली ( ज्ञानेश्वर ) धस, ह्यांचे मित्र आपल्याला ट्रीप अरेंज करून देतील ..असा विश्वास .त्यांना विचारताच त्यांनी लगेच ट्रीपची रूपरेखा आखून दिली..आणि आमचा ग्रुप जमायला सुरवात झाली.म्हणता म्हणता दहा घरचे..वीसजण ..जमले आणि सगळे बुकींग करून व्यवस्थित ट्रीप माऊलीदादांनी ठरवून दिली.
काही दिवस बाकी असताना ,स्वतः " माऊली " आपल्या बरोबर येत आहेत..हे कळल्यावर सगळीच चिंता मिटली.
ठरल्या प्रमाणे जोशी , बेरी , साळुके , खाडिलकर , कड ; देवल , किनारे , अरगडे, खोचे,बागे..निघालो, तीन तारखेला भल्या पहाटे .
किनारे आणि देवल मुंबई हून बाकी पुण्याहून .सगळे गुवाहाटी ला यायला 11:30 वाजले.
हाॅटेल डी कोर्ट यार्ड.. भोजन विश्रांती नंतर "ब्रह्मपुत्रा क्रुज " शब्दशः एन्जॉय केली.
डेकवर गेलो..भान हरपून बघत राहिलो..सागराप्रमाणे अथांग नदी..शांत..कुठे उगाच खळखळाट नाही. मावळतीला आलेला नारायण ..बघतच राहिलो.
पिवळेतांबूस रंगाचा नदीवर सांडलेले त्याचे रंग,भानहरपून जाणारे..थोडा वेळातच हा हा म्हणता तो नारायण..वरच्या वर क्षितिजाला न टेकताच त्याच्या घरी गेला..
सहजच भा.रा.तांबे यांची मावळत्या दिनकरा आठवली,
"असक्त परी तू केलीस वणवण ,
दिलेस जीवन हे नारायण .
जगात भरले तोंडपूजेपण.
हा जगाचा न्याय अस्वस्थ करून गेला..पण क्षणभरच..
सूर्यास्त होताच डेकवर संगीत सुरू झाले. नाच गाण्यात शाम रंगून गेली.
दिवस संपता संपता खूप थकल्यावर जाणीव झाली.जेवण उरकून उद्या लवकर सव्वासातला सगळ्यांनी ब्रेकफास्ट साठी जमायचे. नंतर कामाख्याचे दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघायचे ठरवून एकमेकांची रजा घेतली.एकंदरित पहिला दिवस झकास पार पडला.
दुसर्‍या दिवशी चार तारखेला ब्रेकफास्ट घेऊन कामाख्या देवीचे दर्शन घ्यायला निघालो.
कामाख्या देवीच्या बर्याच कथा ऐकलेल्या.देवी पार्वतीच्या शक्तीपीठांपैकी एक.आपल्या कामना पूर्ण करणारी म्हणून "कामाख्या " म्हटलं जाते.
शंकरपार्वतीची कथा. उमा यज्ञासाठी म्हणून बोलावणे आलेले नसतानाही आपल्या बाबांच्या घरी गेली.स्मशानात रहाणार्‍या भणंगाची शंकराची अर्धांगिनी असलेल्या सतीला कोणी विचारले नाही.अपमानाने व्यथित झालेल्या सतीने यज्ञकुंडात उडी घेतली.क्रोधीत झालेल्या तिचा पती तिचे शवघेऊन फिरू लागला..तेव्हा भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने तिच्या देहाचे तुकडे केले..तिचा एकेक अवयव धरतीवर पडू लागला..याभागात तिचा योनी( गर्भ ) भाग पडला.त्याने देवीचे रूप घेतले ती ही कामाख्या देवी.
स्त्रीच्या रज्जस्वला अवस्थेला एकप्रकारे सन्मानीत करणारी कथा खूप काही सूचित करून जाते. पवित्र , नवनिर्माण करण्यासाठी असलेली स्त्रीची सक्षमता येथे पूजली जाते.
स्त्रीच्या त्या चार दिवसाचा सोहळा केला जातो.महिन्यातून तीन दिवस देवीच्या त्या स्थितीत मंदिराचे दरवाजे बंद होतात.
नंतर सुचिर्भुत झालेल्या देवीचे मंदिर दर्शनाला परत उघडले जाते.
इथल्या बर्याच प्रथा खूपशा विचित्र आहेत. रूढी परंपरा अनेक अंधश्रद्धा आहेत..अस्वस्थ करणाऱ्या..बळी देण्यासाठी आणलेले बोकड ..त्यांच्या नजरेतील केविलवाणे पण सुन्न करणारे..पशुपक्षी हत्येला..बळी प्रथेला बंदी असताना देवीच्या नावावर होणारी ही हिंसा अस्वस्थ करणारी.
थ्री सिस्टर्स
स्त्रीच्या त्याचार दिवसाचा हा सोहळा करणारी प्रथाही तशीच..म्हटलं तर तिचा मान सन्मान करणारी म्हटलं तर त्याचा अपमान करणारी ..त्या चार दिवसात स्त्रियांनी चारचौघात मिसळू नये..तिला अपवित्र मानले जाते..ती प्रथा देवीच्या बाबतीतही अजूनही पाळली जाते.हे आधुनिक स्त्रीला अस्वस्थ करणारे.
एकप्रकारे ही नवनिर्माण क्षमतेची पूजन करणारी प्रथा तिचा सन्मान करणारी वाटते.
असो नैसर्गिक स्थानाच्या अनुषंगाने अश्या कथा निर्माण होतात ..त्यात किती तथ्य आहे ..माहित नाही..ज्यांना जसा पाहिजे तसा अर्थ घ्यावा , त्याबरोबर असेही वाटते .की या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात कमीत कमी वाईट रूढी परंपरा अंधश्रद्धा यांना खतपाणी तरी देऊ नये.
कामाख्या देवीचे दर्शन घेऊन सगळे अरुणाचल प्रदेशातील ब्रह्मपुत्रा नदीवरचा 3:5 किलोमीटर चा पुलावरून जाताना दिसलेले अविस्मरणीय दृश्य मनात साठवत असतानाच तो नारायण त्याच्या घरी परत निघाला..लवकरच झालेल्या या मावळतीत आम्ही किशोरकुमारच्या सोबत पुढच्या प्रवासाला सुरवात केली.
थ्री सिस्टर्स

0 

Share


Written by
धनश्री अजित जोशी

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad