7:2;23
सेला पास.
एखाद्या युध्दाला तयार होऊन निघावे तसे निघालो.नखशिखांत गरमकपडे .एकदम कोणी ओळखायला येत नव्हतं..प्रचंड थंडी..हलकासा हिमवर्षाव झालेला त्यामुळे मनसोक्त बर्फ बघायला मिळणार याचा आनंद.
मोठ्या उत्साहाने समोरची पहिली सीट पकडून बसले. पहिल्यांदा मजा वाटत होती हलकासा हिमवर्षाव चालू होता, रात्री बर्फ पडल्याने झाडांवर साठलेले हिम अफलातून दिसत होते.
जसंजसं वरती जाऊ तशी वळणे टोकदार होत होती .प्रचंड धोकादायक , चढणीवरून चालक लीलया गाडी चालवत होता.एका बाजूला गगनचुंबी शिखरे आणि एका बाजूला प्रचंड खोल दर्या , इतकं धुक होते की जवळचेही काही दिसत नव्हते. रस्त्याला कुठेही रेलींग नाही , धुक्यात रस्ता दिसतच नव्हता.. टोकदार वळणावरून गाडी जात असतानाच अचानक खोल दरी समोर यायची ..आणि काळजाचा ठोका चुकायचा.
एखाद्या हाॅरर शो चा अनुभव घेत प्रवास चालू होता..मी शब्दशः जीव मुठीत धरून बसले होते.चालकाच्या स्कीलची कमाल होती.डोळे मिटून घ्यावेत तर तसे ही होत नव्हते..थोडक्यात मनात घबराट अशी परिस्थीती .खतरनाक वळणातून मार्ग काढत गाडी एकदाची मराठा रेजिमेंट पर्यंत पोचली. तिथे तीनचार गाड्या होत्या . आमच्या सारखेच हौशी पर्यटक.आता पुढच्या प्रवासासाठी परवानगी लागणार होती.
अचानक हवामान बदलामुळे कोणालाच पुढे जाता येणार नाही.मौसम खराब है असे कळले. त्यामुळे काहिसे निराश झालो. याची कल्पना निघतानाच गाईड ने देऊन ठेवली . " शेवटी त्याची इच्छा." हेच खरं.
इथेच उतरून थोडे फिरून घ्या..सांगताच खाली उतरलो.तो समोर ," छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा " अभिमानाची एक लहर सरसरत गेली." छत्रपती शिवाजी महाराज की जय." उत्स्फूर्त घोषणा निनादली.महाराजांना वंदन करून समोरच्या वळणावरून पुढे चालू लागलो..आजुबाजूला रस्त्यावर बर्फ साठला होता.बर्फात मनसोक्त खेळत आम्ही आनंद लुटला.
कदम कदम बढाऐ जा , भारत माता की जय , जय भवानी जय शिवाजी चे नारे देत आम्ही बरेच चाललो.बर्फात वय विसरून खेळलो.
परत फिरताना गरमागरम चहाचा कप हातात मिळाला तो सुद्धा कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता ..चकट फू खरंच खूप आश्चर्य वाटले हजारो फूट ऊंचीवर कडाक्याच्या थंडीत हसतमुखाने आमच्या हातात चहाचा कप देणारे जवान देव न वाटले तर नवल.
त्यांच्याशी संवाद साधला, ते लातूर , सातारा , कराड चे..खूप अभिमान वाटला त्यांच्या बद्दल ,हजारो किलोमीटर दूर..अत्यंत दुर्गम पहाटी इलाख्यात हे शिवरायांचे मर्द मावळे मातृभूमीची सेवा करण्यासाठी तैनात होते. आपण काही खूप ग्रेट काम करतोय याचा कुठलाही आविर्भाव त्यांच्या बोलण्यात दिसला नाही.आमचे कर्तव्य आहे ड्यूटी करतोय..ही भावना.
त्यांना काही खाऊ दिला ," नको हो..आम्हाला इथे सगळे मिळते."
" अरे तुम्हाला मिळत नाही म्हणून नाही रे..तुमच्या घरची आठवण म्हणून आणलाय..आई ने पाठवलाय असे समजा." असे म्हटल्यावर त्यांनी तो ठेऊन घेतला.
भरल्या आणि भारावलेल्या मनाने आम्ही त्यांचा निरोप घेतला..आमचेच डोळे पाणावले होते..पण ते खंबीर , शांत होते..त्यांच्या चेहर्यावर हसू होते..कठोर सैनिकी प्रशिक्षणाचा हा परिपाक असावा.कुठेही गुंतून न राहता कर्तव्यतत्पर रहाणे हे त्यांना जमले होते.
त्यांच्या धैर्याला मनोमन सॅलूट करून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत आम्ही परत फिरलो.
संध्याकाळी वाॅर
मेमोरियल बघायला गेलो.जसवंत सिंह , मेजर महेंद्रसिंग चौधरी आणि त्यांचे सहकारी पराक्रमाची गाथा सांगणारे , पराक्रमाची साक्ष देणारे वाॅर मेमोरियल..
मरणोत्तर वीर चक्र , परमवीर चक्र आणि महावीर चक्र मिळवलेल्या जवानांच्या पराक्रमाची कथा सांगून त्यांचे एकत्र पुतळे या मेमोरियल मध्ये बघायला मिळाले.
सगळे वाचताना मन सुन्न डोकं बधीर झाले होते.अपुरी रसद , शस्र, आणि सेनानी असताना बलाढ्य चीन शी टक्कर देणारे , समजून उमजून मरणाला मीठी मारणारे हे जवान त्यांची शौर्यगाथा ऐकून आपण आश्चर्य चकीत होतो .
एकिकडे हिंदी चीनी भाईभाईचे नारे लगावत भारताच्या पाठीत चीनने खंजीर खुपसला .भारताचा अविभाज्य भाग असलेला अरूणाचल प्रदेश जिंकण्यासाठी आलेल्या चीनी सैन्याला रोखून युध्दाचे पारडे फिरवणारा , अरूणाचलावरचा तिरंगा लहरत ठेवणारा असामान्य पराक्रम या जवानांनी केला.प्रत्येकाच्या पुतळ्यासमोर त्याची शौर्यगाथा वाचून नतमस्तक होताना..प्रत्येकवेळी," तुमच्या असीम त्यागामुळे आम्ही सुरक्षीत आहोत हा विचार मनात येत होता.
त्या सैनिकांची शस्त्रास्त्र , त्यांच्या काही वस्तू , कपडे आणि त्याच बरोबर ज्या तिरंग्यामध्ये लपेटून त्यांना नेले गेले ते तिरंगे ह्या सगळ्यांचे दर्शन या मेमोरियल मध्ये झाले.
मेमोरियल बघून आम्ही साडेपाच वाजता तेथील ओपनऐअर थिएटर मध्ये जमलो.अरूणाचल प्रदेशाचा इतिहास आणि 1962 च्या युध्दाची शौर्यगाथा सांगणारा अप्रतिम दृकश्राव्य कार्यक्रम पाहिला.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली..ते ऐकताना ह्या डौलाने फडकणार्या तिरंग्याच्या रक्षणार्थ प्राणार्पण करणाऱ्या अनेक जवानांची शौर्यगाथा डोळ्यासमोर होती.
त्यांचे सर्वोच्च बलिदान, असीम धैर्य, पराक्रमाला मनापासून सॅल्युट करून ," भारत माता जय" च्या गजरात तेथून बाहेर पडलो.
खरं सांगायच तर मन सुन्न झाले होते..काही बोलायला सूचित नव्हते..1962 चे चीनचे आक्रमण आणि त्याला भारताने दिलेले उत्तर यामागचा हा इतिहास अनभिज्ञ होता.दोन ते चार वाक्यात इतिहासाच्या पुस्तकात हा भाग गुंडाळला जातो ..आणि हिंदी चीनी भाई भाई पंचशील तत्त्वे आणि पं.जवाहरलाल नेहरूंचे कर्तुत्व हे अधोरेखित केले जाते..पण जवानांच्या पराक्रमाचा हा इतिहास कधी शिकवलाच जात नाही.
" बर्फाचे तट पेटून उठले ,
सदन शिवाचे कोसळले ,
रक्त आमुच्या प्रिय आईचे ,
हिमालयावर ओघळले."
ही कविता आज नव्याने कळली.
मागे कुठेतरी एक कथा वाचलेली आठवते..नक्की नाव आता लक्षात नाही. ती कथा , नव्हे तर सत्य घटना अशी होती, 'सैनिकांना रसद पोचवणार्या एका ट्रकवर हल्ला झाला..त्यात चालक तरूणाला वीरगती प्राप्त झाली..हे कळल्यावर त्याच्या वडिलांनी प्रथम ती रसद योग्य ठीकाणी पोचवली नंतरच आपल्या मुलाच्या देहावर अंतीम संस्कार केले.'
या भागातले केवळ सैन्यच नाही तर सीमावर्ती भागातला सामान्य नागरिकसुध्दा असान्य धैर्याने परिस्थितीला तोंड देत देशसेवा करत असतो.
यासगळ्यांची तीव्रता या प्रदेशाला प्रत्यक्ष भेट दिल्यावर कळली. मनात आले,
' प्रदेशाची दुर्गमता, निसर्गाचा लहरीपणा , हिमनद्यांना येणारे पुर , त्यांची बदलणारी पात्रे ..ह्या सगळ्यानीशी भारताची तटबंदी असलेला हिमालय आणि त्याच्या ऐवढ्या ऊंचीचे व ताकदीचे आपले पराक्रमी जवान आणि त्यांचा असामान्य पराक्रम..प्रत्येक भारतीयाला कळला पाहिजे..त्यांनी तो ऐकला पाहिजे.समजून घेतला पाहिजे.'
जवानांचे बलिदान त्याग समजून घेतला तर त्या इतिहासाच्या पायावर आपण आपल्या देशाची सामर्थ्यवान पायाभरणी करून उत्तम वैभवशाली इमारत उभी करू शकू.
आजची राजकीय खेचाखेच , सत्तेसाठी काय वाट्टेल ते..अंदाधुंदी अगदी तळागाळापर्यंत पोचलेला भ्रष्टाचार पाहिला की वाटते निदान प्रत्येक नेत्याला एक वर्षे सक्तीचे लष्करी शिक्षण देऊन सीमेवर पाठवायला पाहिजे.
आजचा दिवसात आम्ही हिमालय आणि त्याचे रक्षण करणारे हिमालयाच्या ऊंचीचे जवान यांची शौर्यगाथा समजून घ्यायचा प्रयत्न केलाआणि दोन्हीं पुढे नतमस्तक झालो.
" कर चले हम फिदा जातो तन साथीओ..
अब तुम्हारे हवाले वतन साथी ओ.."
म्हणणार्या जवानांची शौर्यगाथा खूप काही सांगून गेली.
आपल्याच विश्वात रमणाऱ्या मला नवीन विशाल विश्वाचा साक्षात्कार झाला.
मी, माझे घर , गाव ,शहर , राष्ट्र..हा परीघ विस्तारला..खूप काही शिकवणारा.. असा हा आजचा प्रवास..विचार करायला लावणारा
धनश्री अजित जोशी.