Bluepad | Bluepad
Bluepad
युनिसेफचे कार्यकर्ते म्हणजे पृथ्वीवरील देवदूत
सुहास विनायक सोहोनी
सुहास विनायक सोहोनी
18th Mar, 2023

Share

*युनिसेफ चे कार्यकर्ते म्हणजे पृथ्वीवरील देवदूत *
* बालके आणि त्यांचे हक्क याविषयी आजकाल बरेच देश व लोकं विचार करू लागले आहेत .वास्तविक हक्क म्हणजे नेमक काय हे या बालकांना काय समजणार आणि त्याचा फायदा त्यांना कसा मिळणार ?सुसंस्कृत व सुरक्षित आईबापांच्या छायेत वाढणाऱ्या मुलांची ही समस्या नाही ,त्यांना संरक्षण असते आणि त्यांचा योग्य विकास होतो परंतु परंपरागत दुराग्रही चालीरीती किंवा नैसर्गिक /मानवनिर्मित आपत्तीत सापडलेली मुले अशी भाग्यवान नसतात .त्याचबरोबर गरिबी ,कुपोषण व रोगराईने ग्रस्त व त्रस्त असलेली मुले अत्यंत हालअपेष्टात ,मृत्यू येईपर्यंत मिळालेलं जीवन फक्त जगतात.कुठे आहेत ते हक्क ? करोडो मुले शाळेत जात नाहीत मात्र करोडो बालके ज्या प्रकारची मजुरी करतात ती त्यांच्या वयाला वा ताकदीला झेपणारी नसते .या बालकांकडून काय काय कामे करवून घेतली जातात आणि कसल्या अमानुष जीवन पद्धतीत जगावे लागते ही सत्यस्थिती अत्यंत विदारक अशी आहे .भविष्यात ही बालके विविध आपत्तींना सामोरे जातात .
* या परिस्थितीचा विचार करून संयुक्त राष्ट्र परिषदेने बालकांच्या हक्कांसाठी एक ‘राईट ऑफ द चाईल्ड ’ ही संहिता तयार करून २० नोव्हे.१९८९ साली मंजूर केली .त्यानंतर न्यूयॉर्क येथील जागतिक परिषदेत बालकांचे जीवन सुखकर कसे करता येईल याविषयी सर्व राष्ट्रांनी एकत्रितपणे एक जाहीरनामा काढला .या ठरावा प्रमाणे युनिसेफ ही आंतरराष्ट्रीय संस्था मुलांचे हक्क ,त्याचं अस्तित्व विकास आणि संरक्षण याविषयक कार्य सांभाळते. या कार्यासाठी जगभरातून ऐच्छिक मदत मिळते .ज्यात आर्थिक मदतीसोबत नवनवीन कार्यकर्ते हवे असतात .आपापल्या देशात / विभागात असे अनेक कार्यकर्ते या प्रोजेक्ट साठी व्यग्र असतात .बालकांना मदत करण्याच्या कार्याची माहिती ‘युनिसेफ’च्या तर्फे प्रसिद्ध होणाऱ्या विविध साहित्यातून उपलब्ध आहे .
* इतर कोणत्याही कारणांपेक्षा विविध युद्धप्रसंगात आप्तस्वकीय गमावलेल्या मुलांची स्थिती अतिशय दयनीय झालेली असते .मानवी हिंसाचाराचे रौद्र तांडव पाहून ते बालपण करपल नाही तरच नवल .युद्ध,नैसर्गिक आपत्ती किंवा मानवी अत्याचार ,जुलूम यामुळे बालपण गमावलेली ,भेदरलेली ही मुले काही समजण्याच्या अवस्थेपलीकडे असतात .या बालकांना जीवनदान देऊन ,मनाला उभारी देऊन ,त्यांना शिक्षण देऊन जीवनात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी झटणारे युनिसेफ चे कार्यकर्ते म्हणजे ‘देवदूत’ आहेत .या परोपकारी अशा देवदूतांची संख्या वाढायला हवी .आपत्तींना आपण थोपविण्याचा प्रयत्न तर केलाच पाहिजे त्याचबरोबर आपद्ग्रस्त व बालकांसाठी मदत कार्य जास्त महत्वाचे ठरते .समाजसेवेची आस्था असणाऱ्या युवक व ज्येष्ठांनी या दिशेने अवश्य विचार करावा कारण गरज फार मोठी असून मदतीचे हात कमी पडतात .थोडे पुढे या आणि या लहान बालकांचे मित्र बना त्यांना मदतीचा हात हवा आहे .
लेख संग्रह : घे उंच भरारी [ २०१६ ]
लेखक : सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी अमरावती ४४४६०६
मोबा : ९४०५३४९३५४

0 

Share


सुहास विनायक सोहोनी
Written by
सुहास विनायक सोहोनी

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad