Bluepad | Bluepad
Bluepad
*कृषी क्षेत्राचा वेगळा अर्थसंकल्प हाच एक उपाय!*
M
Mahadev Tukaram Mali
17th Mar, 2023

Share

*कृषी क्षेत्राचा वेगळा अर्थसंकल्प हाच एक उपाय!*
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कितीही पोटतिडकीने बोलले तरी प्रश्न काही सुटत नाही. सरकारचे अव्यवहार्य धोरण, दलालांकडून होणारी लुबाडणूक,निसर्गाची अनियमितता,मजूरांची वाढलेली मजुरी,खते, औजारे, शेती पुरक औषधे यांचे वाढलेले दर,जीएसटीचा बुलडोझर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतः ची नसलेली बाजारपेठ! मला वाटते शेतकर्यांच्या दारिद्र्याची ही प्राथमिक कारणे आहेत! शेतकरी राजा आहे हे खरे आहे परंतु तो बळिराजा आहे, आणि त्याचाच पहिला बळी दिला जातो! हे विदारक वास्तव आहे! राजकारण शेतकर्यांभोवती फिरतंय पण शेतकऱ्यांना न्याय मात्र मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे!
आज शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे. नोकरीत असणाऱ्यांना वाटते आपल्या मुलांनी नोकरी करावी, डॉक्टरांना वाटते आपल्या मुलांनी डॉक्टर व्हावं,पुढार्यांना वाटते आपल्या मुलाने नेता व्हावे पण एकाही शेतकर्याला वाटत नाही की आपला मुलगा शेतकरी व्हावा, या विषयाकडे गांभीर्याने बघायची वेळ आली आहे! फार काय शेतकर्यांच्या मुलांना मुली कोण देत नाहीत आणि ही आता सामाजिक समस्या निर्माण झाली आहे!
सर्वात वाईट ही गोष्ट आहे की शेतकऱ्यांना फुकटे म्हणून हिणवले जाते! काय शेतकरी फुकटा आहे? त्याला काय फुकट मिळते? या उलट माझे म्हणणे आहे की त्याच्याइतका कर कोणीही भरत नाही!तो खरेदी करत असलेली खते, औषधे, शेती औजारे, मशीनरी यावरील कर भरतो आहे ना? मी तर असे म्हणेन की सर्वात जास्त कर शेतकरी भरतो, तोही प्रामाणिकपणे कारण शिकलेल्या लोकांसारख्या कर चुकवेगिरीच्या पळवाटा त्याला माहित नसतात!
यंदा द्राक्ष पिकाची काय अवस्था झाली?घाम गाळून, काळ्या आईची सेवा करुन रात्रंदिवस मेहनत करून उत्तम बागा पिकवल्या आणि दर गडगडले,ऊस पीक उत्तम आले, ऊसतोड मजुरांच्या मुजोरीला सामोरे जावे लागले,ऊन, वादळ, अवकाळी,यांचा मारा सहन करत शेतकरी शेती करतो आहे. त्यांच्या मुलांना योग्य शिक्षण तो देऊ शकत नाही, म्हणजे तो पुन्हा चिखल तुडवतो आहे? काय करायला हवं शेतकऱ्यांनी?
कुणी कांहीही म्हणो आज शेतकरी त्रस्त आहे, संकटग्रस्त आहे,कर्जात पार बुडालेल्या अवस्थेत आहे! आज करोडो कोटी रुपये उद्योजकांची कर्जे माफ केली जात आहेत आणि शेतकरयांना मात्र चोर ठरवले जात आहे!ही मोठी शोकांतिका आहे! शेतकऱ्यांच्या पोरांनी कपडे लत्ते मागितले तर बाप हताश होतो आणि सापडेल तो दोर घेतो गळफास लावून घेतो आणि कायमची सुटका करून घेतो!ही परिस्थिती देशाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आहे आणि याला जबाबदार व्यवस्था आहे आणि ती आपल्याला बदलावी लागेल!
जसा रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प आहे तसाच तो कृषी क्षेत्राचा स्वतंत्र अर्थसंकल्प असायला हवा! म्हणजे आमच्या पैशाचे आम्ही मालक होऊ! शेतकरी जो जो कर भरेल त्या प्रत्येक पैशाचा हिशेब ठेवला जाईल आणि तो शेतकर्यांसाठी वापरता येईल! शेतकरी राजा आहे, शेतकरी देशाचा मालक आहे, या वल्गना आता बंद झाल्या पाहिजेत आणि कृतीतून तो मालक आहे हे सिद्ध केले पाहिजे! राज्य कुणाचेही असो, सरकार कुणाचेही असो, न्याय शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि तो त्याचा हक्क आहे!
आम्हाला किसान सन्मान योजना नसली तरी चालेल पण किमान सन्मान मिळावा! शेतकरयांना कमी व्याजदरात कर्ज द्या, शेतकरी खरेदी करत असलेल्या औजारे, मशीनरी, औषधे यावरील जीएसटी हटवा, आम्ही सोनं पिकवून दाखवू! तोच आमचा सन्मान असेल!
मी आकडेवारी सह लिहिणार होतो परंतु लेख मोठा असेल तर वाचत नाहीत, हा माझा अनुभव आहे, म्हणून मी इथंच थांबतो.धनयवाद 🙏🙏🙏🙏
*महादेव माळी, हिंगणगाव, ता. कवठेमहांकाळ*
मो.नं.9923624545
*कृषी क्षेत्राचा वेगळा अर्थसंकल्प हाच एक उपाय!*
*कृषी क्षेत्राचा वेगळा अर्थसंकल्प हाच एक उपाय!*

0 

Share


M
Written by
Mahadev Tukaram Mali

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad