Bluepad | Bluepad
Bluepad
अलबर्ट आईनस्टाईन... अनाकलनीय कोडे!!
Uttamrao Nivrutti Nirmal
Uttamrao Nivrutti Nirmal
17th Mar, 2023

Share

आकाशाला वाकवणारा शास्त्रज्ञ म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या ख्यातकीर्त सार्वकालीक सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा आज.... १४ मार्च.... जन्म दिवस... त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.. 🙏
अलबर्ट आईनस्टाईन या महान शास्त्रज्ञाचे नाव बौद्धिक पातळीचा मापदंड म्हणून जागतिक पातळीवर घेतले जाते. त्यांच्या सापेक्षता (Special and General Relativity) आणि E= MC^2,..... i. e. Energy equals mass times speed of light squared..... ( E - उर्जा-ज्युल , M- वस्तुमान-किग्रॅम, C- प्रकाशाचा वेग - 3 लाख किमी प्रती सेकंद म्हणजे ३० कोटी मीटर प्रति सेकंद .....याचा अर्थ फक्त १ किलोग्रॅम वजनाचा पदार्थ ३० कोटीच्या वर्गाइतकी प्रचंड उर्जा (ज्युल) निर्माण करु शकतो !! ) या भौतिक शास्त्रातील क्रांतिकारी शोधामुळे त्यांना जागतिक पातळीवर वलय प्राप्त झाले. विशेष म्हणजे ज्या क्रांतिकारी शोधामुळे अलबर्ट आईनस्टाईन यांना जागतिक वलय प्राप्त झाले त्या Relativity आणि E= MC^2 साठी त्यांना नोबेल प्राईज मिळाले नाही, कारण नोबेल प्राईज कमिटीला त्यांच्या शोधाचे आकलन न झाल्याने त्यांना तो अविश्वनीय वाटला होता !! आईनस्टाईनची प्रसिद्धी जगभर झाली होती. त्यामुळे "फोटो इलेक्ट्रीक इफेक्ट" या सापेक्षतेपेक्षा कमी वलयांकित असलेल्या १९०५ मधील शोधाला सन १९२१ मध्ये नोबेल प्राईज दिले !!
आईनस्टाईनने E=MC^2 या प्रसिद्ध समिकरणातून एक कण वस्तुमानातून प्रचंड उर्जा निर्माण करता येते हे सिद्ध केले आणि तो अणुशक्ती /अणुऊर्जा याचा पाया आहे. दुर्दैवाने नेहमीप्रमाणे मानवाने त्या शक्तीचा वापर प्रामुख्याने अणुबॉम्ब सारख्या विघातक शस्त्रासाठी केला... अमेरीकेचे तत्कालीन अध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांना, शांतीचे पुरस्कर्ते असलेल्या अलबर्ट आईनस्टाईन यांनी, असे न करण्याबद्दल पत्रही दिले होते. पण पुढे काय घडले हा इतिहास आहे !!
आईनस्टाईन यांनी लांबी, रुंदी आणि उंची या प्रचलित तीन मितीबरोबर (Three Dimension) "काल" या चौथ्या मितीची ( Fourth Dimension ) संकल्पना मांडली . विज्ञानविश्वात ती स्थलकाल (Space and time) म्हणून ती प्रसिद्ध आहे. सर आयझॅक न्युटन यांची सरळ रेषेतील गती वैश्विक पातळीवर मोडीत काढली. कारण अवकाशातील सर्व ग्रह तारे एकमेकांभोवती वक्राकार फिरतात. त्यामुळे दुरवरील एखाद्या तटस्थ निरीक्षकाला त्यांची गती सरळ रेषेत असेल , असे होऊ शकणार नाही !!!
प्रकाशकिरण सरळ रेषेत जातात या संकल्पनेला त्यांनी छेद देत, गुरुत्वीय बलामुळे ते वक्र होतात, असा सिद्धांत त्यांनी मांडला आणि तो १९१९ मध्ये ते सिद्ध झाले. वस्तुमान (mass) असलेली कोणतीही वस्तू प्रकाशापेक्षा जास्त वेग घेऊ शकत नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रकाशाच्या वेगाकडे जाताना काळ संकोच ( मंदावतो ) पावतो आणि वस्तूमान वाढत जाते परिणामी वेग वाढवण्यासाठी लागणारी शक्ती वाढत जाते. प्रत्यक्ष प्रकाशाच्या वेगाने जाताना काळ थांबतो आणि वस्तूमान अनंत होऊन लागणारी ऊर्जाही अनंत होते !! एखादी व्यक्ती जर प्रकाशाच्या वेगाने जाऊ लागली तर काळ थांबल्याने त्या व्यक्तीच्या वयात वाढ होणार नाही !!
अवकाश आणि काल ( Space -Time ) एकमेकांसंलग्न असुन एखाद्या वजनदार ताऱ्याच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे सभोवतालचे अवकाश वक्राकार होते आणि त्या वक्राकार मार्गावरून त्या ताऱ्याभोवतालच्या वस्तू वा प्रकाशकिरण ताऱ्याभोवती फिरतात... जितके गुरुत्वाकर्षण जास्त तितके भोवतालचे अवकाश गोलाकार होत जाते.... अवकाश गोलाकार होत आक्रसत जाण्याचा शेवटचा टप्पा म्हणजे कृष्णविवर होय !! गुरुत्वाकर्षण आणि अवकाश - काल यांचे वक्राकार होणे या भौतिक अविष्कारास आईनस्टाईन यांनी वेगळ्या अंदाजात बघितले आहे
अवकाशातील एखादी घटना भिन्न संदर्भचौकटीतील व्यक्तींना एकसमान दिसणार नाही ती स्थलकाल सापेक्ष असेल....कोणतीच घटना निरपेक्ष नसते तर ती सापेक्ष असते हा अलबर्ट आईनस्टाईनच्या सिद्धांताचा गाभा आहे. आईनस्टाईनचे सिद्धांत समजण्यासाठी अमर्याद कल्पनाशक्ती आवश्यक आहे.
सर आयझॅक न्युटनचे भौतिक संशोधन हे मानवाच्या आवाक्यातील तसे पृथ्वी व ग्रहमाला येथे मर्यादित वेगाला लागू होतात. कारण दैनंदिन वा व्यवहारीक वेगाला न्युटनच्या नियमातील त्रुटी अत्यंत नगण्य असतात. परंतु अवकाश आणि अतिवेगवान स्थितीमध्ये न्युटनच्या नियमांना मर्यादा येऊन वस्तुनिष्ठ निष्कर्ष प्राप्त होत नाहीत .. आईनस्टाईनचे संशोधन आणि समिकरणे ही वैश्विक पातळीवर लागू होतात. ग्रहांच्या कक्षातील विसंगतीचे स्पष्टीकरण न्युटनच्या ऐवजी आईनस्टाईनच्या सिद्धांतामुळे मिळु शकले.
एक शास्रज्ञ म्हणून आणि एक मानवतावादी शांतताप्रिय व्यकी म्हणूनही आईनस्टाईन तितकेच महान होते. महात्मा गांधीच्या सौहार्दता आणि शांततावादी विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता... "महात्मा गांधीसारखी हाडामांसाची व्यक्ती या भुतलावर प्रत्यक्ष होऊन गेली" यावर भविष्यातील पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत असे त्यांनी म्हटले होते. अर्थातच त्यांचा रोख भविष्यातील टोकाच्या हिंसाचाराकडे होता !! भारतील संस्कृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे जग हे मिथ्या आणि आभासी आहे याला आईनस्टाईनच्या संशोधनाच्या वैश्विक आयामामुळे पुष्टी मिळते. कारण आज आपण अवकाशात जे काही ग्रह तारे पहातो ते सध्या तेथे मुळी नाहीच !! कारण त्या ग्रह ताऱ्यापासून कित्येक वर्षापुर्वी निघालेला प्रकाश, आपल्यापर्यंत आज पोहोचलाय, म्हणून ते दिसताहेत एवढेच, पण त्यांचे अस्तित्व सध्या त्या ठिकाणी नाही !!
जन्माने ज्यु असलेल्या आईनस्टाईन यांनी हिटलरच्या ज्यु द्वेषामुळे जर्मनी सोडून अमेरिकेचे नागरिकत्व घेतले व अमेरिकेत स्थलांतर केले . आणखी हजार पाचशे वर्षांनी बुध ग्रह ते नेपच्यून ग्रहापर्यंत नाॅनस्टाॅप शटल सर्व्हिस चालू झाली तर पृथ्वीजवळून जाताना त्या शटलमधील एक प्रवाशी पृथ्वीकडे बोट करुन शेजारच्या प्रवाश्याला सांगेल की, "अलबर्ट आईनस्टाईन येथे राहत होते " !!!! यावरुन आईनस्टाईनच्या संशोधन आणि सिद्धांतांचे महत्व अधोरेखीत व्हावे !!! अलबर्ट आईनस्टाईन हे एकमेव शास्त्रज्ञ आहेत की त्यांचा सन १९५५ मध्ये मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मेंदूचा आजही अभ्यास चालू आहे !!!
🙏..आईनस्टाईन यांचे काही विचारधन.. 🙏
या सर्वांचा मी आभारी आहे कारण त्यामुळेच त्या गोष्टी मी स्वतः करू शकलो.”
2.”मी सर्वांना सारखीच वागणूक देतो, तो कोणत्या विद्यापीठाचा कुलगुरू असो किंवा एखादा सफाई कामगार.”
3.”ज्यांनी कधी चुका केल्या नसतील त्यांनी कधी नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केलाच नसेल.”
4. “जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचे असेल तर माणसांवर किंवा गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता, तुमच लक्ष ध्येयावर केंद्रित करा.”
5. “प्रत्येकात काही विशेष गुण असतातच पण जर तुम्ही माश्याची परीक्षा त्याच्या झाडावर चढण्याच्या क्षमतेवर करू लागलात तर तुम्ही सर्व आयुष्य त्याला मुर्खच समजत राहाल.”
6. “जी गोष्ट तुम्ही सरळ साधेपणाने समजावू शकत नाही याचा अर्थ ती तुम्हाला नीट समजली नाही.”
7. हे भयानकपणे स्पष्ट झाले आहे की आपल्या तंत्रज्ञानाने आपली मानवता ओलांडली आहे.
8. धर्माशिवाय विज्ञान लंगडा आहे, विज्ञान नसलेले धर्म अंध आहेत.
9. ज्याने कधीच चूक केली नाही अशा व्यक्तीने कधीही नवीन काहीही प्रयत्न केले नाही.
10. ज्ञानाचा एकमात्र स्रोत म्हणजे अनुभव होय
11. सक्तीने शांतता राखून ठेवता येत नाही; ती केवळ समजून घेऊन प्राप्त केली जाऊ शकते.
12. माझी विशेष प्रतिभा नाही. मी केवळ उत्साही जिज्ञासू आहे.
13. कालपासून शिका, आजसाठी जगा, उद्यासाठी आशा करा. महत्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न करणे थांबवायचे नाही.
14. मूर्खपणा आणि अलौकिक बुद्धिमत्ता यांच्यातील फरक हा आहे की अलौकिक बुद्धिमत्तेला त्याच्या मर्यादा आहेत..... अर्थातच मुर्खपणाला नाहीत.
15. कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा खूप महत्वाची आहे.
16. प्रेमात कुणी पडले तर ते गुरुत्वाकर्षणामुळे पडले, असे समजून गुरुत्वाकर्षणाला दोष देऊ नका, असे मिष्कीलपणे नमुद करणारे अलबर्ट आईनस्टाईन एक आगळेवेगळे व्यक्तीमत्व होते.
श्री उत्तमराव निर्मळ सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग
अलबर्ट आईनस्टाईन... अनाकलनीय कोडे!!

1 

Share


Uttamrao Nivrutti Nirmal
Written by
Uttamrao Nivrutti Nirmal

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad