मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक, गितकार, अभिनेता अशा बहुआयामी कलाविष्कारांनी मंडीत असलेले अभिनेते दादा कोंडके यांचा आज.... १४ मार्च... पुण्यस्मरण दिन.... त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन 💐
¶ एकुण १६ मराठी , ४ हिंदी आणि १ गुजराथी असे २१ चित्रपट दादांनी दिले. लागोपाठ ९ मराठी चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवी आठवड्यांचे 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' त्यांनी केले.
गोकुळाष्टमीला जन्मलेल्या ह्या "कृष्णा" ने नावाचे सार्थक मराठी चित्रपट सृष्टीच्या पडद्यावर दाखवून दिले. बँड पथकातून सुरुवात करून हळूहळू "विच्छा माझी पुरी करा" व इतर वगनाट्ये, नाटके ह्यांनी सुरुवात केलेल्या दादांचे चित्रपट जीवन मेहनतीने साकारले गेले. नाटकांच्या निमित्ताने केलेल्या राज्यभराच्या दौऱ्यांनी दादांना सर्वसामान्यांसाठी करमणुकीचे महत्त्व व कोसा-कोसांवर बदलत जाणारी रसिकता कळली व हेच पुढे त्यांच्या यशाचे गमक सिद्ध झाले.
¶ ग्रामीण श्रमजीवी पिटातला प्रेक्षक हा त्यांचा हक्काचा प्रेक्षकवर्ग होता. दूरदर्शन अस्तित्वात नसलेल्या काळात दिवसभर घाम गाळून विरंगुळ्याच्या चार क्षणांसाठी पिटात शिट्या वाजवणारा वर्ग हा त्यांच्या चित्रपटांचा 'मायबाप' होता.......!!
¶मानसन्मान, किर्ती, प्रसिद्धी, पैसा, समाजमान्यता मिळालेल्या आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या दादा कोंडके यांच्या झळाळत्या प्रतिमेच्या अंतर्यामी एक दुःखाची पडछाया होती !! दादांच्या "एकटा जीव" या आत्मचरित्राच्या शेवटी त्यांच्या अंतर्मनातील उलघाल आणि अंतीम फलश्रुती दर्शविणाऱ्या, काही ओळी लिहील्या आहेत.....त्या अनुषंगाने काही सत्य, अर्धसत्य आणि बरेच काही कटूसत्य !!!!
¶दादा कोंडके यांच्या आत्मचरित्रातील सोबतच्या छायाचित्रात दिलेले कथन हे, अंतीम सत्य सांगते आणि ते प्रत्येकाला अंतर्मुख करणारे आहे.... मी त्यांचे "एकटा जीव "हे आत्मकथन वाचले आहे... त्यावेळीही, याच परिच्छेदावर निशब्द झालो होतो.... मला जसे समजतेय तसे दादा कोंडके यांचे प्रत्येक चित्रपट मी पहात आलोय.....ग्रामीण भागातील मी व आमची पिढी त्यांचे चित्रपट पहातच मोठी झाली...त्यांच्या पुढील चित्रपटाची आम्ही वाट पहायचो. ग्रामीण भागात त्यांना हाऊसफुल्ल लोकाश्रय होता....त्यात मी सुद्धा होतो. प्रत्येक चित्रपट सिल्व्हर ज्युबिली होता..... सबकुछ दादा कोंडके असा तो मराठी चित्रपट सृष्टीचा काळ होता....
¶रुपेरी पडद्यावरील दादा आणि आत्मकथनातील पदद्यामागचे दादा यातील जमीन अस्मानापेक्षा जादा अंतर आहे, हे त्यांचे चरित्र वाचताना जाणवते....... आणि हृदयातील त्यांची कोरलेली प्रतिमा अश्रुभरीत नजरेने सामोरी येते.... मनुष्य कुठल्याही क्षेत्रातील असो, तो कोट्याधिश असो वा सामान्य स्थितीतला असो, त्याला या धनदौलतीच्या जोडीला जीवापाड माया करणारी माणसं नसतील तर, ही सारी संपत्ती कवडीमोलाची आहे... पुढील जन्मात दादांनी पैशाच्या बदल्यात फक्त निरपेक्ष प्रेम करणारी माणसं मागितलीत, यावरुन सर्वांनीच बोध घ्यावा.... दादांच्या निर्व्याज्य, निरागस, निर्मळ स्वभावाचा, जवळ असलेल्यांनी गैरफायदा घेत त्यांच्या धनदौलतीवरच प्रेम केले... सोबत काम करणाऱ्यांनीच नव्हे, तर रक्ताचे म्हणवले जाणारेही त्याला अपवाद नव्हते. मग त्यात नामधारी कुंकू लावणारी "निलावती " असो वा आईच्या नावाला कलंक लावणारी चित्रपटातील "आये" असो, वा त्यांचा शिडी म्हणून वापर करणारी त्यांची सहकलाकार "हिट" अभिनेत्री असो वा अस्तनीतील "विजय" असो, कोणीही याला अपवाद नाही....या व्यक्ती भिन्न स्वभाव वैशिष्ट्यांच्या असल्या तरी, साध्या, सरळमार्गी, निष्पाप माणसाचा, आर्थिक स्वार्थीपोटी गैरफायदा घेणे, हा समान गुणधर्म त्यांच्यात आहे....अर्थात या गुणधर्माचे दर्शन सार्वत्रिक होत असते, हे वैश्विक सत्य आहे..... त्यामुळे त्यांचा तरी अपवाद का असावा !! दादांनी जनसामान्यांना खिळवून ठेवले, परंतु त्यांना घेरुन घेणाऱ्या दांभिकांनी, मात्र त्यांना सदासर्वकाळ खेळवले !!
¶आयुष्याच्या अंतीम टप्प्यावर हा ताळेबंद पुनर्विलोकीत करतांना काय वेदना होत असतील, हे दादाच जाणे !! कारण त्यात profit पेक्षा loss जास्त होता. नुसता loss नव्हे तर total loss होता....त्या ताळेबंदात सारे काही होते, पण माणसे नव्हती !!!.... त्यांच्या "तुमचं आमचं जमलं" या चित्रपटातील, "माझं माझं म्हणीत होतो त्यांनीच मला सोडलं.... जन्मोजन्मीचं गड्या तुझ्याशी नातं जोडलं .....चल रं वाघ्या रडू नको... पाया कुणाच्या पडू नको... दुनिया सारी जरी उलटली... मला कधी रं सोडू नको..." हे गाणं "वाघ्या" कुत्र्याला उद्देशून जरी असले, तरी वरील गाणे खरेतर ,त्यांच्या खाजगी आयुष्याबरोबरच, मनुष्य स्वभावातील एक चिरंतन सत्यच सांगत आहे....आणि ते सत्य म्हणजे माणसापेक्षा प्राणी/ पशु जास्त विश्वासपात्र असतात, गेलाबाजार ते विश्वासघात तरी करत नाहीत !!!
¶आपण ज्या सुखाचा पाठलाग करण्यात आयुष्याची दमछाक करुन घेतो , ते खरेतर मायावी कांचन मृगासारखे, सुखाच्या मायावी रुपात, दुःखच असते... परंतु हे समजेपर्यंत ,' आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा ' ची वेळ झालेली असते !!! दुर्दैवाने जमलेल्या गर्दीत राम राम घेणाऱ्यांपेक्षा, कोपरापासून राम राम घालणारेच जास्त दिसतात आणि याची दाहकता अग्नी ज्वालापेक्षाही कैकपटीने जास्त तीव्र असते...!!
.... दादा कोंडके यांच्या स्मृतीदिनी यातुन काही बोध घेता आला तर ती दादा कोंडके यांच्या स्मृतींना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल.. 🙏
श्री उत्तमराव निर्मळ सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग